Friday, September 8, 2017

एका प्यादा (कठपुतली/कठपुतला )ची जीवन गाथा




प्यादाला बोलवा 
प्यादाला न्हावू  घाला 
प्यादाला जेवू घाला
प्यादाला दक्षिणा द्या.


प्यादाचा वापर करा 
प्यादाला डोक्यावर बसवा 
काम झाले कि प्यादाला
पटावर शहीद करा.

मग
नावावर त्याच्या
मेणबत्या लावा
नावाने दुसर्यांच्या 
जोरात बोंबला.

(शेवटच्या क्षणी प्यादाला सत्य कळते, पण उशीर झालेला असतो) 
.


Wednesday, September 6, 2017

भू-भू भुंकणारे कुत्रे



कुत्र्यांची एक खासियत असते, कुणीही दिसले कि भुंकणे सुरु. एखादा हत्ती सारखा मोठा जनावर दुरून येताना दिसला कि यांचे भू-भू सुरु झालेच समजा. पण जसा-जसा तो जनावर जवळ येईल.  कुत्रे भुंकणे सोडून शेपटी टाकून दूर पळून जातात. कुत्र्यांचा स्वभावच दुसरे काय.  पण कधी एखादा हत्ती स्वकर्माने जमिनीवर पडला कि मग काय म्हणता राव झुंडीच्या झुंडी कुत्र्यांच्या एकत्र होऊन जमिनीवर पडलेल्या हत्ती वर तुटून पडतात. काही क्षणात  सर्व कुत्रे मिळून हत्तीच्या शरीराच्या चिंध्या-चिंध्या करतात. कुणाच्या हाती इवलासा मांसाचा तुकडा किंवा फक्त हाड हि लागले तरी जणू काही त्यानेच हत्तीची शिकार केली आहे असा अविर्भाव आणून जोरात वाघा सारखी डरकाळी फोडण्याचा प्रयत्न करतात. कितीही झाले तरी कुत्रा वाघ बनू शकत नाही. शेवटी तोंडातून भू-भूच निघणार. 

या झुंडीतल्या कुत्र्यांचे अनेक प्रकार असतात. काही कागदांवर भुंकतात. तर काही दृश्य आणि श्रव्य माध्यमातून भुंकतात. आपण हत्तीची कधी आणि कशी शिकार केली याचे रसभरून वर्णन करतात. दुसर्या कुत्र्यांचा झुंडींच्या हाती काही लागू दिले नाही किंवा ते कुत्रे हत्तीचीच मदत करत होते इतपर्यंत यांची मजल जाते. आपणच खरे हे दाखविण्यासाठी सोबत सबूत म्हणून मांसाचा तुकडा किंवा हाड हि दाखवितात.   

एक आणखीन हि प्रकार असतो, हे कुत्रे म्हणजे 'बेगानी शादी में अब्दुला दिवाना'.  फ़क्त वरील उल्लेखित कुत्र्यांचे  हत्तीच्या शिकारीचे वर्णन ऐकून, जणू काही आपणच हत्तीची  शिकार केली आहे असा आभास यांना होतो. हे पण शिकारीचे वर्णन आणि हत्तीच्या मांसाचे हाडाच्या स्वादाचे वर्णन एवढ्या खूबीने करतात कि दुसर्यानां वाटेल हेच कुत्रे प्रत्यक्ष घटनेच्या जागी होते आणि शिकार यांनीच केली. फरक एवढाच कि या कुत्र्यांनी कधी हत्तीला पाहिलेही हि नसते. मांसाचा किंवा हाडाचा तुकडा मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असो. या आभासी जगात वावरणाऱ्या कुत्र्यांचा वापर कागदावर आणि दृश्य श्रव्य माध्यमात भुंकणार्या कुत्र्यांच्या झुंडी स्वत:च्या स्वार्थासाठी नेहमीच करतात. अफवांचे पिक पसरवण्यासाठी किंवा कुणाचे चारित्र्यहनन या कुत्र्यांच्या मदतीने सहज करता येते. फक्त ठिणगी सोडा आग हे लावतील. पण हे कुत्रे स्कड मिसाईल सारखे असतात, कुठेही जाऊन पडतात.  आपल्या मालकांना हि चावायला कमी करत नाही. असो. 

हा लेख कुत्र्यांच्या स्वभावावर लिहिला आहे, अन्यथा घेऊ नये. तरी हि सर्वांची माफी मागतो.  

Saturday, September 2, 2017

पोष्टिक थालिपीठ


काल संध्याकाळी लेकीचा फोन आला. बाबा आज आमच्या हॉस्पिटल मध्ये पोष्टिक पदार्थ बनविण्याची प्रतियोगिता झाली. मी बनविलेल्या थालीपीठला पहिला पुरस्कार मिळाला. मी भाग घेण्याचे ठरविल्या बरोबरच  थालीपीठ बनविण्याचचा निश्चय केला. पुरस्कार नाही मिळाला तरी मराठमोळ्या थालीपिठाबाबत सर्वांना कळेल तरी. आमची सौ. दिवाळीच्या आधी भाजणीचे पीठ तैयार करते, ते जवळ-सात ते आठ महिने चालते.  साहजिकच आमच्या लेकीने तिच्या आईला विचारले. भाजणीचे पीठ संपले हे कळल्यावर तिची निराशा झाली. पण तीही माझ्या सारखी जिद्दी (आमच्या पटाईत खानदानची विशेषता, एकापेक्षा एक जिद्दी आणि सनकी). थोडा गुण लेकीत हि उतरला आहे. थालीपीठ बनवायचे ठरविले म्हणजे ठरविले. प्रतियोगिताचा एक दिवस आधी संध्याकाळी घरी परतताना तिला एका किरणाच्या दुकानात पतंजालीचा नवरत्न आटा दिसला आणि तिच्या डोक्याची ट्यूब लाईट पेटली.  गहू ,ज्वार, बाजरा, जौ, मक्का, चणा, सिंघाडा, चौलाई आणि सोयाबीन या पासून तैयार झालेला नवरत्न आटा. आता तिने थालीपीठ कसे केले तिच्याच शब्दांत. 

दोन वाटी नवरत्न आटा घेतला. एका कढईत (लोखंडी) रवा भाजतो तसा हा आटा ३-४ मिनिटे परतला.  अर्धी वाटी बेसन हि घेतले, तेही ३-४ मिनिटे परतले. अश्या रीतीने भाजणी तैयार केली व परातीत टाकली. एक चमचा ओवा, एक चमचा जिरे, १०-१२ काळी मिरीची पूड हि तैयार केली.  त्या नंतर एक पाव पालक आणि २ हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या  धुऊन कढई वर झाकण ठेऊन वाफवून घेतल्या. नंतर मिक्सरमध्ये पालक टाकून प्युरी तैयार केली.   भाजणीत पालकाची प्युरी, तैयार केलेली पूड, व अंदाजे मीठ टाकून पीठ मळून घेतले. पाणी गरजेनुसार टाकले.  गॅस वर तवा ठेवला. थोड्या मंद आंचेवर. तव्यावर अर्धा चमचा तेल लावून थालीपीठ थापून घेतले व २-३ मिनिटांसाठी झाकण ठेवले. पुन्हा परतून खरपूस भाजून घेतले. बाकी हास्पिटल मध्ये गेल्यावर सोबत टमाटो, काकडी, गाजर, ढोबळी मिरची पासून केलेली कोशिंबीरिची साईड डिश सोबत ठेवली.  एक आगळीवेगळी मराठमोळी व पोष्टिक डिश परीक्षकाला आवडली आणि तिला पहिले पारितोषिक मिळाले.