Sunday, December 18, 2016

अग्रपूजेचा मान - भाई भतीजावादाची पहिली कथा


कालचीच गोष्ट, गल्लीतली एक मुलगी घरी आली, पेढे घेऊनच. मी विचारले पढे कसले? ती म्हणाली, काका मला नौकरी लागली.  खरंच ती मुलगी अत्यंत हुशार आहे. या आधी हि तिने  दोन-तीन वेळा लिखित परीक्षा पास केली होती. पण दरवेळी साक्षात्कार मध्ये बाद झाली.  या वेळी साक्षात्कार नव्हता. (केंद्र सरकारच्या श्रेणी आणि साक्षात्कार घेणे बंद झाले आहे, नमो कृपा आणखीन काय) लिखित परीक्षा पास होताच तिला नौकरी लागली. असो. 

नौकरी मिळविण्यासाठी, त्या नौकरीसाठी अपेक्षित असलेल्या गुणांची परीक्षा हि द्यावीच लागते.  पण या शिवाय साक्षात्कार नावाचा एक प्रकार हि असतो.  परीक्षेत पहिला क्रमांक आला तरी साक्षात्कार मध्ये कमी मार्क्स देऊन परीक्षक उम्मेद्वाराला बाद करू शकतात अर्थात करतातच. मग ती नौकरी शिक्षकाची असो, पोलीस मधली भर्ती असो किंवा इस्पितळात नर्सची नौकरी. आपल्या माणसांना अर्थात भाई आणि भतीज्यांना नौकरी देण्यासाठीच बहुधा साक्षात्कार नावाचा प्रकार आपल्या देशात रूढ झाला असावा. 

रात्रीच्या वेळी पलंगावर पडल्या-पडल्या, भाई भतीजावादाची प्रथा आपल्या देशात केंव्हा सुरु झाली असेल, हा विचार करत होतो. अचानक ती पुराणकथा डोळ्यांसमोर चमकली. 

कोणत्या देवताला अग्रपूजेचा मान मिळायला पाहिजे, या साठी परीक्षा ठेवली होती. देवाधिदेव भगवान शंकर हे परीक्षक होते. जो सर्वात कमी वेळात पृथ्वी प्रदिक्षणा करेल त्या देवताला अग्रपूजेचा मान मिळणार होता. सर्व देवता आपापल्या वाहनांवर बसून पृथ्वी  प्रदिक्षणेसाठी निघाले.  पण गणेश मात्र तिथेच होता. शंकराने विचारले, गणेश, सर्व निघाले तू अजून इथेच का? तुला अग्रपूजेचा मान नको का? गणेश म्हणाला, पिताश्री, उंदिरावर बसून मी गरुडावर स्वार भगवान विष्णू  यांच्याशी स्पर्धा करू शकतो का? कदापि शक्य नाही.  हि तर वाहनांची स्पर्धा आहे,  ज्याचे वाहन जोरात धावणार ती देवता जिंकेल. यात देवांची हुशारी काय? गणेशचे म्हणणे ऐकून शंकराची विकेटच उडाली. शंकर म्हणाले, च्यायला हे माझ्या ध्यानातच नाही आले. पण आता काही उपयोग नाही. त्यावर गणेश म्हणाला, बाबा तुम्ही मनात आणले तर मला अग्रपूजेचा मान सहज मिळू शकतो. मी इतरांसारखा मूर्ख नाही, हे आत्ताच सिद्ध केले आहे. मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे कि नाही, या बाबत काही शंका असेल तर आईला विचारा. शंकराच्या नेमक्या त्या दुखात्या जखमेवर गणेशनी  बोट ठेवले होते.  चांगली गंगा डोक्यात बस्तान बांधून बसली होती आणि वामांगावर पार्वती देवी विराजमान. मस्त चालले होते. कसे काय पार्वतीला गंगेबाबत कळले. गणेशाची मदत घेऊन तिने, गंगेला दूर दक्षिणेत जायला बाध्य केले. खरे म्हणाल, शंकराला गणेशवर भारी राग होता, पण करणार काय, बायकोचा प्रिय पुत्र तो. त्याच्यावर राग काढणे शक्यच नव्हते. 

आपल्या पुत्राचे ते उपकार विसरणे पार्वतीला कदापि शक्य नव्हते. तिला राहवले नाही.  पार्वती शंकराला म्हणाली, एवढे म्हणतो आहे, तर गणेशला द्या अग्रपूजेचा मान. तुम्ही दिलेला निर्णय अमान्य करण्याची हिम्मत त्रिलोकात कुणाला हि नाही.  भगवान शंकर म्हणाले, पार्वती तुला कळत का नाही, इच्छा असूनही हि परीक्षा मी रद्द करू शकत नाही. तसे केले तर माझ्यावर भाई-भतीजावादचा आरोप लागेल. माझी इज्जत धुळीत मिळेल. 

गणेश म्हणाला, बाबा परीक्षा रद्द करायची गरज नाही.  हे बघा तुम्ही कुठे उभे आहात, पृथ्वीवरच ना.  भगवान शंकर म्हणाले, होय. मग मी तुमची प्रदिक्षणा केली म्हणजे, पृथ्वी प्रदिक्षणा हि झालीच समजा. पार्वती मैया लगेच म्हणाली, बघा  किती हुशार आहे, माझा गणेश.  आता तरी झाले ना तुमचे समाधान. गणेश, यांचा विचार बदलण्याआधी पटकन प्रदिक्षणा करून टाक.  गणेशने तत्काळ आपल्या आई वडिलांना साष्टांग नमस्कार केला आणि उंदिरावर बसून  त्यांच्या  भोवती एक चक्कर मारला आणि हात जोडून म्हणाला.  हे भगवान शंकर, मी सर्वात आधी पृथ्वी प्रदिक्षणा पूर्ण केली, मला अग्रपूजेचा मान मिळालाच पाहिजे.  बेचारे शंकर भगवान, काय करणार त्यांनी गणपतीला अग्रपूजेचा मान दिला.  सर्व देवता पृथ्वी प्रदिक्षणाकरून दमून भागून  परत आले. त्यांना कळले, भगवान शंकरांनी त्यांच्या पुत्राला अर्थात गणेशला सर्वप्रथम पृथ्वी परिक्रमा केली म्हणोन अग्रपूजेचा मान देऊन टाकला आहे. ज्या प्रमाणे विरोधीपक्ष संसदेत गोंधळ घालतात, तसेच देवतांनी हि या विरुद्ध भारी हल्लागुल्ला केला. पण त्याच्या काही उपयोग झाला नाही. त्या दिवसापासून  भारतात भाई- भतीजावादाची सुरुवात झाली.   

No comments:

Post a Comment