Sunday, October 30, 2016

अवध कुमार (आजचा राम) आणि क्षत्रिय धर्म



अवधी भाषा म्हणजे, आदर, आतिथ्य आणि विनम्रतेची लखनवी तहजीब. 'पहले आप म्हणत' गाडी निघून गेली तरी चालेल. पण दुसर्याला महत्व देण्यात लखनवी माणूस कधीच कमी पडणार नाही. ज्या अवधमध्ये पराया लोकांना एवढा मान दिला जातो, तिथे वडिलधार्यांची विनंती म्हणजे जणू देवाचीच आज्ञा.  संत तुलसीदासांनी श्रीरामाचे चरित्र याच अवधी भाषेतच लिहिले. वडीलधार्यांची आज्ञा 'प्राण जाये पर वचन न जाये' या परंपरेला अनुसरून श्रीरामांनी आनंदाने वनवास स्वीकारला. पण तो काळ त्रेता युगातला होता. 

आज कलयुग आहे, आजचा राम वडिलधार्यांच्या आदेशाचे पालन करेल का?  श्रीराम काही विरोध न करता गुपचूप  वनात  का निघून गेले? कुणी त्यांना अन्यायचा विरोध करण्यासाठी प्रवृत्त का नाही केले? इत्यादी अनेक प्रश्न मनात आले. रामायण उघडून बघितले, त्या वेळीही श्रीरामांचे हितचिंतक सल्लागार होते. त्यांनी श्रीरामाला अन्यायाचा विरोध करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. या सल्लागारांचे म्हणणे होते,  वृद्धावस्था प्राप्त झाल्यावार राजाने आपल्या ज्येष्ठ पुत्राचा राज्याभिषेक करून वनात निघून जावे हाच क्षत्रिय धर्म आहे.  ज्येष्ठ पुत्र जर क्षत्रिय धर्मानुसार वागत नसेल तरच कनिष्ठ पुत्राचा सिंहासनासाठी विचार केला पाहिजे. श्रीरामाने असला कुठलाही अपराध केला नाही, सदैव क्षत्रिय धर्माचे पालन केले.  केवळ कनिष्ठ पत्नी कैकयी मध्ये आसक्त होऊन, तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्येष्ठ पुत्र श्रीरामांना वनात धाडणे म्हणजे अधर्मच. क्षत्रिय धर्म म्हणतो, अधर्माने वागणाऱ्या म्हातार्या बापाला कारावासात बंदिस्त करणे किंवा त्याचा वध करण्यात काहीच गैर  नाही. श्रीरामांनी क्षत्रियधर्म काय सांगतो, याचा यत्किंचित हि विचार केला नाही. सहर्ष  वनवास स्वीकारला.   

आज पुन्हा अवधचा राजकुमार धर्मसंकटात पडलेला आहे. म्हातारा झालेला बाप आणि वडीलधारी मंडळी ज्येष्ठ पुत्राला त्याच्या इच्छेनुसार राज्य करू देत नाही आहे. राजाच्या राजकारभारात ढळवा-ढळवी करणे, क्षत्रिय धर्मानुसार अधर्मच. प्रश्न एकच आजचा राजकुमार श्रीरामांप्रमाणे वडीलधार्यांच्या आदेशाचे पालन करेल कि अन्यायाविरुद्ध विद्रोह करेल. 

त्रेता युगानंतर, द्वापर युग झाले. द्वापरयुगात कृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश करताना म्हंटले, क्षत्रिय धर्म रक्षणासाठी, अधर्मी स्वकीयांचा वध करणे म्हजे धर्म. श्रीकृष्णाचा उपदेशाला अनुसरून अर्जुनाने तीक्ष्ण बाणांनी स्वकीयांचा वध केला. क्षत्रियधर्माचे रक्षण केले अर्थात राजपद प्राप्त केले. 

आज अवधकुमारच्या एका हातात रामायण आहे आणि दुसर्या हातात महाभारत. एक मार्ग गादीपासून दूर करणारा, काही वर्षांसाठी वनवासात जाण्याचा आणि  दुसरा मार्ग  राजपद प्राप्ती साठी रस्त्यात येणाऱ्या समस्त कंटकांना दूर करण्याचा, त्यात स्वकीय हि आलेच. 

अवधकुमार पुढे काय करणार यावर सर्वांची नजरे आहेत. रामायणाचा आदर्श कि महाभारतातल्या अर्जुनाचा आदर्श. वडीलधार्यांची आज्ञा पालन करणे अथवा क्षत्रिय धर्माचे पालन.   किंवा ते असे काहीतरी करतील ज्याने कवींना कलयुगात नवीन ग्रंथाची रचना करण्याची प्रेरणा मिळेल. 

No comments:

Post a Comment