Saturday, July 30, 2016

अंधविश्वास भाग (3) - सार्थक लढा



एक दिवस रस्त्याहुन जाताना कानांत पडले "यह डॉक्टर के बस का नहीं है, नीम वाले बाबाके यहाँ झाडा लगवा लो. बच्चा ठीक हो जायेगा." दिल्ली देशाची राजधानी. बाह्यदिल्ली जिथे दिल्लीतले ७०% टक्क्याहून अधिक रहिवासी  राहतात, तिथे लोकांचा विश्वास  डॉक्टरपेक्षा नीमवाल्या बाबावर/ बंगाली बाबांवर  विश्वास जास्त. काय कारण असावे हा विचार मनात आला.  

निरोगी व्यक्ती कष्ट करू शकतो, संसाराची गाडी चालवू शकतो. रोगी माणसाला हे शक्य नाही. रोगांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न प्रत्येक माणूस हा करणारच.  आता आपण आपल्या देशातील चिकित्सा सुविधांकडे  बघू. दिल्ली देशाची राजधानी. इथे देशातील सर्वात चांगली चिकित्सा सुविधा जनतेला उपलब्ध आहे, असा भ्रम देशातील अन्य राज्यांच्या लोकांच्या मनात असणे स्वाभाविक आहे. पण इथली परिस्थिती हि देशातील इतर शहरांसारखीच आहे.

मी उत्तम नगर इथे राहतो.  या भागात राहणारे अधिकांश लोक छोटा-मोटा रोजगार करतात किंवा फेक्ट्रीत काम करून  महिन्याचे ८-१० हजार रुपये किंवा दिवसाचे २००-३०० रुपये कमवितात. आता कल्पना करा हा सामान्य माणूस आजारी पडला. जवळपास असलेल्या सरकारी स्वास्थ्य केंद्र किंवा हॉस्पिटलमध्ये गेला. काय होईल. हॉस्पिटलमध्ये लोकांची भारी भीड. ३-४ तासांनी डॉक्टर त्याला पाहणार. नंतर औषधांच्या लाईनीत १-२ तास त्याला उभे राहावे लागणार. काही औषधी मिळतील. काही मिळणार नाही. औषधींचा दर्ज्याबाबत काही सांगण्यात अर्थ  नाही.  आजार बरा हो न  हो, पण त्याचे त्या दिवसाच्या दिहाडीचे नुकसान होणार हे निश्चित.

उत्तम नगरमध्ये प्रशिक्षित MBBS डॉक्टर हि आहेत. त्यांची किमान फी ३०० रुपये आहे. (माझा फेमिली डॉक्टर हि ३०० रुपये घेतो. चांगल्या कॉलोनीत अर्थात जनकपुरी येथे डॉक्टर ५००-७०० रुपये फी घेतात). एवढी फी घेतल्यावर डॉक्टर किमान ३०० रुपयांची औषधी  लिहिणारच. सामान्य जनतेला MBBS डॉक्टरकडे जाणे परवडणे शक्य नाही. आता उरले, स्वयंभू झोला छाप डॉक्टर. दिल्लीत किमान पन्नास हजाराहून जास्त झोला छाप डॉक्टर असावेत, असा अंदाज आहे.  हे डॉक्टर ५० रुपयांत   औषधी देतात. स्वस्त असल्यामुळे सामान्य गरीब जनता अश्याच डॉक्टरांकडे जाते. आता ८-१० दिवस औषध घेऊन आजार बरा नाही झाला तर हा गरीब माणूस काय करणार. शेवटचा उपाय म्हणून तो ‘नीमवाल्या बाबाकडे जाऊन झाडा लाऊन घेणार’. नीमवाला बाबा काही मागत नाही. तुमची श्रद्धा हीच त्याची बरकत (कमाई).

आपल्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती असल्यामुळे अधिकांश आजारातून आपण बरे होतोच. पीलिया, डेंगू इत्यादी आजारांपासून हि लोक बरे होतात. अर्थात शरीराला त्याची किंमत हि मोजावी लागतेच. सतत आजारांमुळे माणसाची रोगप्रतिकार शक्ती कमी होत जाते. पण झाडा लावल्यामुळे आजारी व्यक्ती रोगमुक्त झाला, याचे श्रेय नीमवाल्या बाबाला मिळणारच. हळू हळू त्याची लोकप्रियता वाढत जाणार. चांगले श्रीमंत लोक पण हि त्याचा कडे जाऊन ‘झाडा’ लाऊन घेणार.  नीमवाला बाबा किंवा बंगाली बाबा कुणाचे रोग दूर करीत नाही, तरी हि लोक रोगांपासून मुक्त होण्यासाठी त्यांच्या कडे जातात.   

बाबालोकांचा विरोध करून अंधविश्वासाविरुद्ध लढा जिंकणे शक्य नाही. नीमवाल्या बाबा/ बंगाली बाबांकडे जाण्यापासून लोकांना थांबवायचे असेल तर चांगली, विश्वसनीय आणि सामान्य गरीब जनतेच्या खिशाला परवडणारी चिकित्सा सुविधा लोकांपर्यंत पोहचवावी लागेल. 

काही महिन्यांपूर्वी डॉक्टर प्रकाश आमटे यांचा जीवनावर आधारित सिनेमा बघितला होता. भामरागडसारख्या दुर्गम भागात, जादूटोणा करणारऱ्या तांत्रिकांकडे जाणे लोकांची मजबुरी होती. उत्तम डॉक्टर, उत्तम चिकित्सा सुविधा लोकांपर्यंत पोहचली. लोकांचे तांत्रिकांकडे जाणे आपसूक बंद झाले.  

जनतेला रोगमुक्त करणे, अंधविश्वासाविरुद्ध लढ्याची पहिली पायरी आहे. 

क्रमश: 

Thursday, July 28, 2016

काहीच्या काही वात्रटिका - पैलवान झाला चित


 पुन्हा एकदा पानिपत घडले (नरसिंह यादव महाराष्ट्राचा पैलवान होता) 


रिंगणात उतर्ण्यापूर्वीच 
पैलवान झाला चित.

सोनीपतच्या मैदानात 
नरसिंह झाला शहीद. 


सकाळ दुपार संध्याकाळ ओठांवर एकच नाव 

मरा मरा म्हणत 
वाल्या झाला वाल्मिकी. 

नमो नमो म्हणत 
सीएम होईल  का 
प्रधान मंत्री.

Wednesday, July 20, 2016

पाहुण तुमी कोण गावचं?



या गावचं, त्या गावचं
पाहुणं तुमी  कोण गावचं?

लाल गावचं कि हिरव्या गावचं
पिवळ्या गावचं कि तिरंग्या गावचं.
निळ्या गावचं कि टोपी गावचं.

पाहुणं म्हणे, ऐका  राव 
मान मोठा मिळे ज्या गावात  
चरायला मिळते सारे रान 
तोची आहे आमुचा गाव. 

 सरडा आमचा गुरु भाई 
त्याच्या  सवे रंग बदलतो. 
शिकारीच्या गावी 
मुक्काम ठोकतो. 

या गावचं, त्या गावचं
पाहुणं तुमी  कोण गावचं?


टीप:  या कवितेचा  राजनेत्यांशी काही एक संबंध नाही. 

Saturday, July 16, 2016

तीन क्षणिका - स्त्री



(१)

 वस्त्रांत देह स्त्रीचा
पुरुषांनी  गुंडाळला. 
भोगदासी झाली स्त्री 
त्या क्षणापासूनच.


(२)

पद्मिनीने म्हणे 
चितेत उडी घेतली. 
आगीत वासनेच्या 
नाही ती जळाली. 


(३)

देह वासनेचा 
अग्नीत हा जाळला
उरले फक्त आता 
अमर प्रेम तराणे.





Saturday, July 9, 2016

अंधविश्वास भाग (२) - नकारात्मक लढा


http://vivekpatait.blogspot.in/2016/07/blog-post_7.html

अंधविश्वास - सार्थक लढा (भाग १) -अंधविश्वास म्हणजे काय?


नकारात्मक लढा 

एकदा नागपूरला एका लग्नात गेलो असताना, एक पुणेरी ग्रहस्थ मला भेटले होते. सहज अंधविश्वासावर चर्चा सुरु झाली. त्यांनी आपला एक अनुभव सांगितला. पुण्यात एका संस्थेने, अंधविश्वास विरोधात कार्य करणार्या एका संस्थेच्या महानुभावला बोलविले होते. सुरवातीला त्या महानुभावांनी आपल्या संस्थेचा परिचय दिला. भोंदू बाबांच्या विरोधात चाललेल्या त्यांच्या संस्थेच्या कामांची तपशील दिली. त्यांच्या संस्थेच्या कार्यात येणार्या अनेक संकटांचे विवरण हि दिले. समाजात पसरलेल्या अंधविश्वासांवर बोलताना मात्र ते रस्ता भटकले. थोडक्यात म्हणावे तर त्यांनी सत्यनारायण कथेचा माखौल तर उडविलाच पण अनेक पौराणिक कथांची खिल्ली हि उडविली. तिथे बसलेल्या लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली. ह्या सदग्रहस्थांचा उद्देश्य अंधविश्वासांबाबत लोकांना जागरूक करणे आहे कि सनातन  धर्माच्या विरुद्ध प्रचार करणे. सारांश एवढेच, त्यांची मेहनत फुकट गेली. काय चुकल त्या विद्वान माणसाचे. लोक अंधविश्वासी का बनतात हे  त्यांना माहित नव्हते. जर मूळ समस्याच माहित नसेल तर तिचे समाधान कसे  सांगणार.  


समस्येचे मूळ कारण माहित नसल्यामुळे पौराणिक कथा आणि सत्यनारायण कथेचा माखौल उडवून आपण लोकांना जागृत करत आहोत असे त्यांना वाटले. जुन्या काळातल्या पौराणिक कथा, मग त्या देवी देवतांच्या, राक्षस, अप्सरांच्या असो  किंवा चान्दोबातल्या, या कथांमध्ये चमत्कार असतात.  या चमत्कारांचा उद्देश्य लोकांना सत्य आणि धर्माच्या रस्त्यावर चालण्याची प्रेरणा देणे असतो. ह्या कथा वाचून कोणी हि अंधविश्वासी बनत नाही किंवा भोंदू बाबांच्या जाळ्यात हि अटकत नाही. 

एक आणखीन मोठी  घोडचूक हि ह्या संस्था नेहमीच करतात. प्रत्येक समाजात जन्म ते मृत्य अनेक प्रकारचे संस्कार असतात. धार्मिक संस्कारांचा अंधविश्वास याशी काही एक संबंध नाही.  धार्मिक संस्कार आणि अंधविश्वास हे दोन्ही वेगळे विषय आहेत.  आपण समाजाचा हिस्सा आहोत, दर्शवण्यासाठी लोक समजासोबत आपले सुख आणि दुख वाटतात. इथे लोक खोट्या प्रतिष्ठेसाठी किंवा समाज काय म्हणेल यासाठी आपल्या चादरीपेक्षा (क्षमतेपेक्षा) जास्त खर्च करतात.  हि मूळ समस्या आहे. मुलाचे नाव ठेवणे असो किंवा श्राद्ध, आपण गाव जेवण हि घालू शकतो किंवा कमीत-कमी खर्चात घरातल्या घरात हि करू शकतो. काही नसेल तर पत्र-पुष्प देवाला वाहून हि आपण सर्व संस्कार करू शकतो.  शिवाय सर्व धार्मिक परंपरांचे पालन केलेच पाहिजे असे बंधन आपल्या सनातन धर्माने कुठेच घातलेले नाही. समाजाला  या दृष्टीकोनातून जागृत करण्याची गरज आहे. संस्कारांचा विरोध करण्यात काहीच अर्थ नाही.  आज आपण केक कापून वाढदिवस साजरा करतो. कारण समाजात काळानुसार संस्कार आणि परंपरा बदलत राहतातच. (इथे केक घरी कापायचा कि हॉटेलमध्ये जाऊन, हाही खर्चाचा विषय आहे, अंधविश्वासाचा नाही). 

धार्मिक अथवा पारंपारिक संस्कार यांना अंधविश्वासांशी जोडणे मुळातच चुकीचे आहे.  ह्या मुळेच लोक या संस्थांना धर्मविरोधी समजतात.  

या संस्थांचा दुसरा उद्देश्य भोंदू बाबांविरोधात कार्रवाई करणे.  यात संघर्ष हा आलाच. संघर्ष म्हंटला कि संघर्षरत दोन्ही बाजूंचे नुकसान होणारच. पण कधी-कधी निर्दोष लोकांचा बळी  हि यात जातोच.   जो पर्यंत  लोक उपाय सांगणार्या बाबांना  स्वखुशीने दक्षिणा  द्यायला तैयार आहे, तो पर्यंत भोंदू बाबांचे प्रस्थ कमी होणार नाही. एक आत गेला कि दुसरा त्याची जागा घेईलच.  समस्येचे समाधान लोकांना या बाबांकडे जाण्यापासून थांबविणे यात आहे. पण त्या साठी मूळ समस्या माहित असायला पाहिजे ना. 

सारांश, अधिकांश अंधविश्वास विरोधी संस्थांचे धोरण नकारात्मक आणि दुसर्यांच्या विरोधावर आधारित असल्यामुळे अपेक्षित परिणाम हि मिळत नाही परंतु  शत्रू मात्र भरपूर पैदा होतात. 


क्रमश: 


















Thursday, July 7, 2016

अंधविश्वास - (भाग १) -अंधविश्वास म्हणजे काय?


सामान्य माणूस काही आंधळा नाही आहे, कि डोळे बंद करून कुणावर विश्वास ठेवेल. सामान्य माणसाचा जगण्याचा  उद्देश्य असतो -  सुखी संसार, स्वस्थ्य शरीर आणि भरपूर पैसा. दुसर्या शब्दात स्वास्थ्य, सुख आणि समृद्धी या तीन बाबी भौतिक जगात महत्वाच्या. 

खान-पान, जीवनमान, व्यायाम इत्यादी बाबींचा प्रभाव आपल्या शरीरावर पडतोच. स्वस्थ्य राहण्यासाठी व्यायाम किंवा शारीरिक मेहनतीचे कामे करावी लागतात.  खाण्यापिण्या वर हि नियंत्रण ठेवावे लागते. हे जर जमले नाही तर मनुष्य आजारी पडतोच. एकदा आजार झाला कि दीर्घकाळ औषध-उपचार हि करावा लागतो, पथ्य हि पाळावे लागतात. भरपूर पैसा हि खर्च होतोच. योगाचे म्हणाल तर तो ही नियमितपणे दीर्घकाळ करावा लागतोच.   बहुतेक  लोकांना हे जमत नाही. त्यांना सौपा उपाय पाहिजे. मग जर कुणी झाड-फूंक, गंडा, ताबीज बांधून किंवा उपाय सांगून आजार बरा करत असेल तर साहजिकच आहे, लोक त्याच्या मागे धावणारच. 

सुख प्रत्येकालाच हवे असते. चांगली बायको/नवरा, आज्ञाकारक मुले,  घरा बाहेर हि नौकरी- धंद्यात सर्वकाही आपल्या मनासारखे घडावे असे प्रत्येकाला वाटणे साहजिकच आहे. पण संसार म्हंटले कि समस्या या येतातच. मुलीचे लग्न ठरत नाही, मुलगा घर सोडून चालला जातो, बायकोचे प्रेम मिळत नाही. नौकरी धंद्यातल्या समस्या, राजनेता असेल तर विरोधकांचे षडयंत्र इत्यादी.  कधी-कधी दुसर्याचे सुख पाहून हि माणूस दुखी होतो. आयुष्यातल्या समस्या स्वत: सोडवाव्या लागतात. त्या साठी कधी-कधी स्वत:ला बदलावे लागते. दुसर्यांना समजून घ्यावे लागते. योग्य मार्ग आणि योग्य दिशेने प्रयत्न करावे लागते. पण जर कुणी उपाय सांगणारा, ज्योतिषी किंवा तंत्र-मंत्र करणारा बंगाली तांत्रिक तुमच्या समस्या चुटकीसरशी सोडविणार असेल तर साहजिकच आहे, तुम्ही त्याच्या मागे धावणारच.   

पैसा हि सर्वांना पाहिजेच. पैसा कमविण्यासाठी कुठला तरी रोजगार, शेती इत्यादी करावीच लागते. त्या साठी ज्ञान, योग्य मार्गदर्शन आणि अविरत परिश्रम हे करावेच लागते.  आता जर कुणी पैश्यांचा पाऊस पाडणारा, लॉटरीचा आणि सट्ट्याचा अंक सांगणारा, गुप्त धनाचा ठाव ठिकण्याची माहिती देणारा इत्यादी भेटला तर मेहनत करायची काय गरज. घर बसल्या पैसा भेटेल. ज्योतिषी, तांत्रिक, बाबा लोक अश्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढ्तातच. 

स्पष्टच आहे, बिना ज्ञान, परिश्रम करता, माणसाला सुख समृद्धी आणि स्वास्थ्य पाहिजे असेल तर तो सौपा शोधतो. ज्योतिषी,  तांत्रिक, बंगाली बाबा इत्यादींचा नादी लागतो. शेवटी आपले सर्वस्व हरवून बसतो. 
  
सौप्या भाषेत सांगायचे तर भौतिक संसारिक समस्यांचे समाधान अभौतिक रीतीने शोधणे म्हणजेच  अंध विश्वास.  

क्रमश: 


Tuesday, July 5, 2016

अकुंच्या - पकुंच्या ....



आमची छकुली (आमची नात) आता पाच महिन्यांची  होत आली आहे. तिच्या हिरड्या सळसळू लागल्या आहे, जे समोर दिसेल त्या वर तोंड मारायचे,  तोंडात घालून चोखून बघायचे. मग स्वत:च्या पायाचा अंगठा का असेना.  काल गम्मत म्हणून कारले तिच्या तोंडात दिले. थुर्रSS करत विचित्र तोंड बनविले आणि भोंगा पसरला. बहुतेक रडताना विचार करत असेल, आजोबा, काही दिवस थांबा, मला मोठी होऊ द्या, बघून घेईल तुम्हाला, काय समजता स्वत:ला. 

च् च् च् करत तिला दोन्ही हातानी वर उचलले, तिच्या नाकाला आपले नाक रगडले. हा तिचा आवडता खेळ. आज मात्र  तिने पटकन माझे नाक आपल्या तोंडात टाकले, सळसळत्या हिरड्यानींं जोरात चावा घेण्याचा प्रयत्न केले. छी! छी!छी! नाकुचा चावा घेते, गंदी बच्ची, तुझी आई सुद्धा अशीच करायची. बहुधा आमच्या लेकीने ऐकले, हसत हसत तिने विचारले, बाबा, खरोखरच! मी नाकु खायची? 

लेकी कडे बघितले, क्षणात काळात मागे पोहचलो. दीड-एक वर्षाची असेल माझी मनी,... अकुंच्या- पकुंच्या पिकले पान कोण खातो?  आSई. अकुंच्या- पकुंच्या सडके पान कोण खातो?  बाबा.  हट्ट, बाबा तर पान खातच नाही. तुला माहित आहे, मनी, गंदे बच्चे पान खातात, बाबा तर अच्छे बच्चे आहेत. तिच्या चेहर्यावर प्रश्न चिन्ह. मग मी हळूच म्हणायचो, माहित आहे मनी, सडके पान न तुझी नानी खाते. आईला सांगू नको, नाही तर तुझी आई माझी पिट्टी-पिट्टी करेल. तिला काही समजो न समजो, पिट्टी -पिट्टी शब्द मात्र चांगला समजायचा.  ती जोरात हसायची.  

मला अस शून्यात हरवलेले पाहून लेकीने दोन्ही हातानी माझे डोके आपल्या कुशीत घेतले. डोक्यावरून हात फिरविला. त्या स्पर्शात आईची माया जाणवली. लेकी किती लवकर मोठ्या होतात... आई बनतात... वाटले क्षणात लहान बाळ होऊन आईच्या कुशीत दडून जावे... पण या शरीराचे काय, लहानाचा मोठा झालो, आता केस हि पांढरे झालेले आहेत... पण अजूनही स्वत:ला छोटेसे बाळ समजणाऱ्या आतल्या जीवाला हे सत्य कोण सांगणार?  काही क्षण असेच गेले. 

आपल्या कडे कुणाचे लक्ष नाही पाहून, अं Sअूं SS अूं  करून छकुलीने आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. अ लेSS ले छकुली.  सॉरी. चला आपण पुन्हा आजोबांचे नाकु खाऊ. तिला दोन्ही हातानी उचलले, नाकाला नाक घासले.... नाकु खाणार छकुली! चिमुकल्या छकुलीच्या चेहर्यावर हास्य पसरले, अगदी तिच्या आई सारखे....