Tuesday, June 14, 2016

हिमाचली पदार्थ - पोष्टिक आणि स्वास्थ्यवर्धक - झोल



हिमाचल मध्ये मंडी जिल्ह्यातील  सक्रेण घाट. चहु बाजूला उंच आणि कठीण हिरवेगार पर्वतराजी. या भागात पाऊस हि भरपूर पडतो.  पाऊस झाला कि पर्वत इथे नेहमीच ढासळतातच. पावसाळी  दिवसात तर बाहेरच्या जगाशी  संबंध हा नेहमीच तुटतो.    

या भागात  वसाहत विरळ आहे.  इथले लोक  उंचपुरे हृष्ट्पुष्ट आणि काटक शरीरयष्टीचे असतात. माझ्या लेकीचे सासर हि याच भागात आहे. झोल, हा तांदूळापासून बनणारा पोष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहे, शिवाय बनवायला अत्यंत सौपा. तांदूळा खेरीज  मक्याच्या कणसाचे दाणे किंवा सोयाबीन  इत्यादी  कडधान्याचा वापर हि झोल बनविताना होतो. नुसत्या तांदुळाचा हि झोल बनविता येतो. 

साहित्य: तांदूळ २ वाट्या (तुकडा तांदूळ जास्ती चांगला), मक्याच्या कणसाचे दाणे १ वाटी, मेथी दाने ६-७, काळी मिरी जिरे पूड १ चमचा किंवा स्वादानुसार आणि मीठ. (जिरे मिरे पुडच्या जागी  चाट मसाला हि वापरू शकतात किंवा दोन्ही हि).  लोणी काढलेली छाछ, किंवा १/२ किलो दह्याची थोड़े पानी टाकून केलेली लस्सी किंवा बाजारात मिळणारी अमूलची लस्सी ४०० gmचे २ पॅकेट.

गावात हा पदार्थ  चुल्ह्या वर बनवितात. पण शहरी माणसाजवळ टाईम नाही व शिवाय कुकर हि घरी असतोच. 

आधी मक्याच्या दाण्यांना एका खलबत्यात थोडे कुटून घ्या. एका दाण्याचे २-३ तुकडे झाले तरी चालतील.   कुकरमध्ये तांदूळ आणि मक्याचे कुटलेले दाणे आणि मेथी दाणा टाकून  दीड गिलास पाणी टाकून गॅस वर ठेवा. एक सिटी झाल्यावर गॅस बंद करून, थोडे थंड झाल्यावर भाताला पळीने घोटून घ्या. थोडी लस्सी त्यात घाला. नंतर  मंद गॅसवर ठेऊन हळू-हळू सर्व लस्सी त्यात घाला. (अंदाजाने आपल्याला जास्त पातळ आणि जास्त घट्ट झोल करायचा नाही आहे). पळीने सतत चालविणे आवश्यक आहे अन्यथा लस्सी फाटू शकते. नंतर त्यात जिरे-मिरे पूड आणि स्वादानुसार मीठ हि टाका. (सर्व करताना चाट मसाला हि टाकल्या जाऊ शकतो).  उकळी आल्यावर गॅस बंद करा.  

उन्हाळ्याच्या दिवसात हा पेय थंड करून आणि हिवाळ्यात गरमागरम पिण्याची पद्धत आहे. उन्हाळ्यात फ्रीज मध्ये दोनेक दिवस झोल सहज टिकतो. 

1 comment:

  1. ha prakar kharach khupach poshtik shivay tasty pan aahe.. yechat soybean pan taku shaktat an asla tar fresh mint ani coriander leaves ni garnish kru shaktat...

    ReplyDelete