Thursday, December 22, 2016

शर्यत : ससा आणि कासव



मोगलीचे जंगल होते. एक काळाकुट्ट ससा आणि एक पांढरे शुभ्र कासव एका  रिंगणात धावत होते. शर्यत होती जंगी. अचानक शिट्टी वाजली. शर्यत संपली. ससा आणि कासव होते तिथे थांबले. गोल-गोल होते रिंगण, कोण जिंकले, कोण हरले, प्रश्न होता बिकट.  हत्ती म्हणाला ससा धावतो वेगात, तोच आहे विजेता. तवाकी म्हणाला, मला वाटते बहुतेक पांढरे कासव जिंकले असावे. निर्णयासाठी सर्वांनी, महाराज शेरखानकडे बघितले. शेरखान हि बुचकळ्यात पडला, त्याने शर्यतीची नियमावली बघितली. शेरखान म्हणाला, काळा ससा धावतो, जोरात पण कासव आणि सस्याच्या शर्यतीत नेहमीच जिंकतो कासव, असेच लिहिले आहे यात.  आजच्या शर्यतीचा विजेता आहे पांढरा कासव.

अचानक माझे स्वप्न भंगले, अर्थ काही कळेना. शेरखान म्हणतो, बहुधा तेच सत्य असावे.  आपले काय म्हणणे आहे. 

Sunday, December 18, 2016

अग्रपूजेचा मान - भाई भतीजावादाची पहिली कथा


कालचीच गोष्ट, गल्लीतली एक मुलगी घरी आली, पेढे घेऊनच. मी विचारले पढे कसले? ती म्हणाली, काका मला नौकरी लागली.  खरंच ती मुलगी अत्यंत हुशार आहे. या आधी हि तिने  दोन-तीन वेळा लिखित परीक्षा पास केली होती. पण दरवेळी साक्षात्कार मध्ये बाद झाली.  या वेळी साक्षात्कार नव्हता. (केंद्र सरकारच्या श्रेणी आणि साक्षात्कार घेणे बंद झाले आहे, नमो कृपा आणखीन काय) लिखित परीक्षा पास होताच तिला नौकरी लागली. असो. 

नौकरी मिळविण्यासाठी, त्या नौकरीसाठी अपेक्षित असलेल्या गुणांची परीक्षा हि द्यावीच लागते.  पण या शिवाय साक्षात्कार नावाचा एक प्रकार हि असतो.  परीक्षेत पहिला क्रमांक आला तरी साक्षात्कार मध्ये कमी मार्क्स देऊन परीक्षक उम्मेद्वाराला बाद करू शकतात अर्थात करतातच. मग ती नौकरी शिक्षकाची असो, पोलीस मधली भर्ती असो किंवा इस्पितळात नर्सची नौकरी. आपल्या माणसांना अर्थात भाई आणि भतीज्यांना नौकरी देण्यासाठीच बहुधा साक्षात्कार नावाचा प्रकार आपल्या देशात रूढ झाला असावा. 

रात्रीच्या वेळी पलंगावर पडल्या-पडल्या, भाई भतीजावादाची प्रथा आपल्या देशात केंव्हा सुरु झाली असेल, हा विचार करत होतो. अचानक ती पुराणकथा डोळ्यांसमोर चमकली. 

कोणत्या देवताला अग्रपूजेचा मान मिळायला पाहिजे, या साठी परीक्षा ठेवली होती. देवाधिदेव भगवान शंकर हे परीक्षक होते. जो सर्वात कमी वेळात पृथ्वी प्रदिक्षणा करेल त्या देवताला अग्रपूजेचा मान मिळणार होता. सर्व देवता आपापल्या वाहनांवर बसून पृथ्वी  प्रदिक्षणेसाठी निघाले.  पण गणेश मात्र तिथेच होता. शंकराने विचारले, गणेश, सर्व निघाले तू अजून इथेच का? तुला अग्रपूजेचा मान नको का? गणेश म्हणाला, पिताश्री, उंदिरावर बसून मी गरुडावर स्वार भगवान विष्णू  यांच्याशी स्पर्धा करू शकतो का? कदापि शक्य नाही.  हि तर वाहनांची स्पर्धा आहे,  ज्याचे वाहन जोरात धावणार ती देवता जिंकेल. यात देवांची हुशारी काय? गणेशचे म्हणणे ऐकून शंकराची विकेटच उडाली. शंकर म्हणाले, च्यायला हे माझ्या ध्यानातच नाही आले. पण आता काही उपयोग नाही. त्यावर गणेश म्हणाला, बाबा तुम्ही मनात आणले तर मला अग्रपूजेचा मान सहज मिळू शकतो. मी इतरांसारखा मूर्ख नाही, हे आत्ताच सिद्ध केले आहे. मी सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे कि नाही, या बाबत काही शंका असेल तर आईला विचारा. शंकराच्या नेमक्या त्या दुखात्या जखमेवर गणेशनी  बोट ठेवले होते.  चांगली गंगा डोक्यात बस्तान बांधून बसली होती आणि वामांगावर पार्वती देवी विराजमान. मस्त चालले होते. कसे काय पार्वतीला गंगेबाबत कळले. गणेशाची मदत घेऊन तिने, गंगेला दूर दक्षिणेत जायला बाध्य केले. खरे म्हणाल, शंकराला गणेशवर भारी राग होता, पण करणार काय, बायकोचा प्रिय पुत्र तो. त्याच्यावर राग काढणे शक्यच नव्हते. 

आपल्या पुत्राचे ते उपकार विसरणे पार्वतीला कदापि शक्य नव्हते. तिला राहवले नाही.  पार्वती शंकराला म्हणाली, एवढे म्हणतो आहे, तर गणेशला द्या अग्रपूजेचा मान. तुम्ही दिलेला निर्णय अमान्य करण्याची हिम्मत त्रिलोकात कुणाला हि नाही.  भगवान शंकर म्हणाले, पार्वती तुला कळत का नाही, इच्छा असूनही हि परीक्षा मी रद्द करू शकत नाही. तसे केले तर माझ्यावर भाई-भतीजावादचा आरोप लागेल. माझी इज्जत धुळीत मिळेल. 

गणेश म्हणाला, बाबा परीक्षा रद्द करायची गरज नाही.  हे बघा तुम्ही कुठे उभे आहात, पृथ्वीवरच ना.  भगवान शंकर म्हणाले, होय. मग मी तुमची प्रदिक्षणा केली म्हणजे, पृथ्वी प्रदिक्षणा हि झालीच समजा. पार्वती मैया लगेच म्हणाली, बघा  किती हुशार आहे, माझा गणेश.  आता तरी झाले ना तुमचे समाधान. गणेश, यांचा विचार बदलण्याआधी पटकन प्रदिक्षणा करून टाक.  गणेशने तत्काळ आपल्या आई वडिलांना साष्टांग नमस्कार केला आणि उंदिरावर बसून  त्यांच्या  भोवती एक चक्कर मारला आणि हात जोडून म्हणाला.  हे भगवान शंकर, मी सर्वात आधी पृथ्वी प्रदिक्षणा पूर्ण केली, मला अग्रपूजेचा मान मिळालाच पाहिजे.  बेचारे शंकर भगवान, काय करणार त्यांनी गणपतीला अग्रपूजेचा मान दिला.  सर्व देवता पृथ्वी प्रदिक्षणाकरून दमून भागून  परत आले. त्यांना कळले, भगवान शंकरांनी त्यांच्या पुत्राला अर्थात गणेशला सर्वप्रथम पृथ्वी परिक्रमा केली म्हणोन अग्रपूजेचा मान देऊन टाकला आहे. ज्या प्रमाणे विरोधीपक्ष संसदेत गोंधळ घालतात, तसेच देवतांनी हि या विरुद्ध भारी हल्लागुल्ला केला. पण त्याच्या काही उपयोग झाला नाही. त्या दिवसापासून  भारतात भाई- भतीजावादाची सुरुवात झाली.   

Wednesday, December 14, 2016

अमिट लक्ष्मणरेखा




वासनामयी डोळ्यांनी 
पाहिले तिच्याकडे मी. 
नवयौवना कोमलांगी 
मीलनोत्सुक रमणी  
नोट नवी कोरी ती
दोन हजाराची.


विरहात जळूनी
कासावीस झाले प्राण 
तरीही 
विवश होतो मी 
अलंघनीय होती 
सुट्ट्या पैश्यांची ती 
अमिट  लक्ष्मणरेखा.  




Tuesday, December 13, 2016

क्षणिका : ओढ वसंताची



गोठल्या श्वासांना
गळत्या पानांना 
ओढ वसंताची 



स्वप्न रात्रीचे 
क्षणात विरले. 
प्रवास पुढचा 
वाटसरूचा. 









Friday, December 9, 2016

स्वार्थाच्या बाजारी मैत्री अशी रंगली



सावळ्याच्या प्रेमात 
 पडली  राधा  बावरी 
काळ्या रंगात रंगुनी 
यमुनाही झाली काळी.

द्वारकेचा राजा आला 
सुदामच्या द्वारी 
काळी लक्ष्मी झाली 
जनखात्यात पांढरी.


यमुनेच्या काठी 
अवसेच्या  राती 
स्वार्थाच्या बाजारी 
मैत्री अशी रंगली. 



द्वारकेचा राजा = काळा पैसे वाला
सुदाम =  गरीब माणूस
दिल्ली यमुनेच्या  काठावर आहे.



Tuesday, December 6, 2016

दिल्ली कथा : अल्पावधीचा कुटीर उद्योग


(लोकांच्या अनुभवावर)

दहा नोव्हेंबरची गोष्ट कार्यालयात आपल्या रूम मध्ये बसलो होतो अचानक सुब्बु रूम मध्ये शिरला, जवळपास ओरडतच म्हणाला, पटाईतजी क्या आपको मालूम है,  RBI के सामने तो कुटीर उद्योग शुरू हो गया है, कुटीर उद्योग???. प्रथम सुब्बुला काय म्हणायचे आहे मला काहीच उमजले नाही. हा कुटीर उद्योग आहे तरी काय पाहण्यासाठी मी स्वत: लंच मध्ये कार्यालयातून बाहेर पडलो. आरबीआयच्या समोर भली मोठी रांग पैसे बदलण्यासाठी लागलेली होती. तीच परिस्थिती जनपथ वर असलेल्या सर्व बँकांची होती. पण एक जाणवले, लाईनीत लागणारे अर्ध्यापेक्षा जास्त लोक या पूर्वी कधीच  बँकांच्या लाईनीत लागले नसतील. घूँघट काढलेल्या बाया (बहुतेक राजस्थानी), पर्दानशीं स्त्रिया, आपल्या सोबत चिल्ल्या-पिल्ल्याना घेऊन लाईनीत उभ्या होत्या. बहुतेक लोक जुन्या दिल्लीतले दिसत होते.  सुब्बुच्या म्हणण्याप्रमाणे ह्या लोकांनी कुटीर उद्योग सुरु केला आहे.  स्वत:च्या आधारकार्डच्या उपयोग करून लोकांचे ४००० रुपये बदलून काही दिहाडी कमविण्यासाठी हे गरीब लोक बँकांच्या लाईनीत उभे होते.  एका  मोटारबाईक जवळ दोन चार लोकांचा घोळका दिसला. बहुतेक लाईनीत लागलेल्या स्त्रियांसोबत ते आले असावे. हिम्मत करून मी विचारले "क्या रेट चाल रिया है, मियां." त्याने लगेच उत्तर दिले, ५०० रुपैया, चाहे हजार बदलो चाहे ४००० हजार.  "रेट कुछ जियादा लग रिया है". तो: एक माणसाची पूर्ण दिवसाची दिहाड़ी, शिवाय चाय-पानी आणि जास्त वेळ लागल्यास नाश्ता हि द्यावा लागणार. त्या हिशोबाने काही जास्त घेत नाही आहे, सर्वत्र हाच रेट आहे.  "पैसा बदलून मिळेल याचा काय भरोसा?" तो: माझा मोबाईल न. आणि आधार कार्डची फोटो कापी मी तुम्हाला देणार, आता तर झाले. ऐसे कामों में भरोसा करना हि पड़ता है. "किती बदलून देऊ शकता?"  तो: पाच दहा लाख, त्याहून जास्ती काम आपल्या बसचे नाही. असो. असाच प्रकार दिल्लीत अधिकांश ठिकाणी दिसला.  

रेडक्रॉसच्या इमारती  समोर एक वयस्कर अपंग भिकारी बसलेला दिसतो.  घरी जाताना बहुतेक त्याच्या हातावर एक दोन रुपयांचे नाणे मी ठेवतो. तेवढेच पुण्य. पण आज काही तो दिसला नाही. बहुतेक तो हि या कुटीर उद्योगात उतरला असावा.  १७ तारखेला तो भिकारी पुन्हा रेडक्रासच्या इमारती समोर बसलेला दिसला. बहुतेक १६ तारखेला बोटांना स्याही लावल्यामुळे आता त्याला नोट बदलणे  शक्य नव्हते. मी सहज त्याला विचारले, "कुठे होता एवढे दिवस." तो म्हणाला साब, लाईनीत लागलो होतो.  "कितने नोट छापे." दात दाखवत तो म्हणाला, सब मोदीजी कृपा है. नेहमीप्रमाणे त्याच्या हातावर २ रुपयांचे नाणे ठेवत मी पुढे निघालो. (खरे म्हणाल तर देण्याची इच्छा नव्हती. पण विचार केला हा कुटीर उद्योग अल्पकालीन आहे, ह्याचा मूळ धंधा तर भिक मागण्याचाच). ७-८ दिवसात लाईनीत उभे राहून गरिबांनी श्रीमंतांचे तीस एक हजार कोटी नक्कीच बदलून दिले असतील आणि सहा-सात हजार कोटी कमविले हि असतील. काही विरोधीपक्ष नेता लोक RBI समोर धरना द्यायला आले होते. लोकांनी त्यांना पळवून लावले, कारण त्यांच्या येण्यामुळे लाईन तुटली. गरिबांची दिहाडी मारल्या गेली. त्यांना राग येणार साहजिकच होत. पुढे नेत्यांनी लाईनीत लागलेल्यांना भडकवायचे सोडून दिले. 


दुसरा कुटीर उद्योग म्हणजे जनधन योजनेचा दुरुपयोग. अंदाजे किमान ४० ते ५० लक्ष लोकांनी श्रीमंतांचे काळे धन स्वत:च्या खात्यात टाकून उजळ केले असावे. कारण या अवधीत पंचवीस हजार कोटींच्या अधिक रक्कम या खात्यांत जमा झाली. २० ते २५ टक्के कमिशन  या कुटीर उद्योगात हि गरिबांना मिळाले असेल. असो.  दोन एक दिवसांपूर्वी पंतप्रधान म्हणले गरिबांनी हा पैसा परत करायची गरज नाही. त्यांनी हा पैसा स्वत: जवळच ठेवला पाहिजे आणि काळा पैश्येवाल्यांना अद्दल घडवली पाहिजे.  

काहीही म्हणा, काही दिवस तरी, गरीब लोकांना एक नवीन कुटीर उद्योग मिळाला.  मोठ्या प्रमाणात लोकांनी या बहती गंगेत हात धुऊन घेतले.  

Sunday, December 4, 2016

लाईन कथा : स्वामी तिन्ही जगांचा, आटा बिना उपाशी


सध्या सौ. बाहेर गावी अर्थात महाराष्ट्रात सॉरी विदर्भात गेलेली आहे. डोक्यावरचे केस पांढरे झाले असले तरीही या वयात मजबूरी में पुन्हा एकदा लाईनीत उभे राहण्याची वेळ  आली. शांतपणे बँकेच्या लाईनीत उभा झालो. बँकेच्या लाईनीत उभे असलेले अनेक तरुण जीव अधीर आणि तणावग्रस्त दिसले. बहुतेक त्यांची रांगेत उभे राहण्याची पहलीच वेळ असेल. बालपणाचे राशनच्या लाईनीतले किस्से सांगून त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करू लागलो. त्या काळी वडिलांचा पगार बहुतेक २०० रुपयांचा जवळपास होता.  दुकानात राशन नसले तरी राशन येण्याची वाट पाहत दोन-दोन, तीन-तीन दिवस लाईनीत आपली जागा रोखून उभे राहावे लागायचे. अर्थातच आम्ही सर्व भावंडे  आळीपाळीने लाईनीत उभे रहायचो. राशन आल्यावर नेहमीच भांडणे इत्यादी व्हायचची.  शेवटी महाभारताचे युद्ध जिंकून निकृष्ट दर्जेचा भरपूर कचरा असलेला गहू किंवा मिलो मिळायचा.  पण काहीही म्हणा पोटाची खळगी मात्र भरायची. हे वेगळे नवी पिढीच्या लोकांना हे किस्से कपोल कल्पना वाटत असतील. तरीही त्यांचे भरपूर मनोरंजन तर झालेच असेल आणि लाईनीत उभे राहण्याचा काही तणाव  काही अंशी कमी झाला असेल. 

अखेर काही तासांनी २००० रुपयांची नवी कोरी नोट घेऊन गल्लीतल्या वाण्याच्या दुकानात गेलो. तिथे चक्की फ्रेश आटा होता, मिलचा आटा होता, विदेशी आटा होता, पांढरा शुभ्र आटा होता, भुरे रंग का  स्वदेशी आटा होता, विटामिन वाला आटा होता, नौ अनाज वाला बाबाजींचा पोष्टिक आटा हि होता.  नव्हते  फक्त सुट्टे.  अखेर आटा न घेता रिकाम्या हाताने घरी परतलो.

घरी येऊन कधी नव्या कोर्या २००० हजारच्या नोट कडे बघितल तर कधी बँकेच्या पासबुक कडे.  कधी नव्हे ते, महिन्या अखेर खात्यात भरपूर रक्कम दिसत होती.  श्रीमंत होण्याची जाणीव झाली.  आजीने सांगितलेली एक कहाणी  आठवली. एकदा एका दरिद्री माणसाने नदी काठावर लक्ष्मीदेवीला प्रसन्न करण्यासाठी तपस्या सुरु केली.  अखेर लक्ष्मीदेवी प्रसन्न झाली. ज्या वस्तूला तो स्पर्श करेल ती सोन्याची होईल, असा वर त्याला दिला.  त्या माणसाने डोळे उघडून एका दगडाला स्पर्श केला. तो दगड तत्क्षणी सोन्याचा झाला. युरेका युरेका म्हणत तो आनंदाने उड्या मारत घरी पोहचला आणि बायकोला समोर पाहताच जवळ जवळ ओरडलाच  अग ये, लक्ष्मी देवी प्रसन्न झाली आपण  श्रीमंत झालो आणि आनंदाने बायकोला मिठी मारली. दुसर्याच क्षणी त्याला कळले मिठीत बायको नाही, अपितु तिची सोन्याची मूर्ती आहे. वेड्या सारखा तो सर्वत्र हात लावत सुटला. त्याचे जग सोन्याचे झाले होते. एक भयाण सत्य समोर आले. अन्न पाण्याविना तो तडफडत मरणार होता. असो. 

रात्री फ्रीज उघडून थंडगार पाणी प्यालो. बेडरूम मध्ये जाऊन AC सुरु केला. मखमली बिछान्यावर झोपण्याचा प्रयत्न करत गुणगुणू लागलो: 

स्वामी तिन्ही जगाचा 
आट्या बिना उपाशी. 


Monday, November 21, 2016

दिल्लीकरांची व्यथा








चिमण्यांची चिव चिव नाही
कावळ्यांची कावं कावं आहे .


पहाटेच्या वाऱ्यालाही


पेट्रोलचा दुर्गंध आहे. 



सुकलेल्या नळांना 
पाण्याची तहान* आहे.
विजेचा झटका बघा 
 घामाने कासाविस आहे. 

कचऱ्याच्या ढिग्यार्यांवर   


डुकरांचा वाद आहे.


डॉक्टरांच्या मदतीला आज

डेंगू आणि मलेरिया आहे. 

क्षयग्रस्त  फुप्फुसाना  आता  
यमराजाचीच वाट आहे. 

 दारूचा सुकाळ आहे
नित नवे परवाने आहे
नशा विरुद्ध लढ्याचा 
झिंगणारा आगाज* आहे. 







टीप: 
तहान = वर्षभर आधी रस्त्यावरची नळाची पाईपलाईन तुटली अजूनही ठीक झाली नाही. हि परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. 
आगाज =   एका वर्षात थोक भावात  दारूचे परवाने  व बारचे परमिट दिले दिले.  यालाच म्हणतात नशा विरुद्ध युद्ध. 








Sunday, November 20, 2016

काहीच्या काही कविता - चंचला लक्ष्मी




सोन्याची तिजोरी 
चोरांनी लुटली. 

नोट कागदी 
कचर्यात गेले. 

मुद्रा आभासी 
होणार आभासी.

चंचला लक्ष्मी 
नाही कुणाची.  

चंचला लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे.  तिचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी करा. सात दरवाज्यात बंद केले तरी ती हातातून निसटणारच. 

   



Sunday, November 13, 2016

हम सब चोर हैं (आपण सर्व चोर)- एक जाणीव


आपल्या देशात ९४ टक्के आर्थिक व्यवहार रोख  होतो. देशात फक्त १ टक्के लोक आयकर भारतात. त्यात हि ९० टक्के आयकर देणारे संगठीत क्षेत्रातले कर्मचारी आणि मजबूरी में इमानदार सरकारी बाबू आहेत. काय करणार सरकार न विचारता पगारातून आयकर कापून घेते. बाकी अधिकांश थोक  आणि फुटकर व्यापारी आपला धंधा रोख करतात. मला आठवते, २०१३ मध्ये मुलीचे लग्न ठरले, चांदणी चौक येथे एका मित्राच्या ओळखीच्या दुकानात कपडे विकत घ्यायला गेलो. ज्या दुकानात रोज २५-३० लाखांचा व्यवहार होत होता, त्या दुकानदाराने डेबिट कार्ड नाकारले. ATM मधून पैशे काढून नगदी द्यावी लागली. निश्चितच हा दुकानदार आयकर भरत नसणार. लाखोंची रोज उलाढाल करणारे चांदनी चौक सदर बाजारातले अधिकांश व्यापारी आयकर इत्यादी भरत नाहित. (चांदनी चौक आणि सदर बाजार देशातील सर्वात मोठे थोक व्यापारचे केंद्र आहेत). बाकी देशात हि हीच परिस्थिती आहे, ९९ टक्के थोक आणि फुटकर व्यापारी आयकर भरत नाही किंवा अत्यंत कमी भरतात (मोठे मोठे शोरूम जिथे ई-मनी स्वीकारल्या जाते, मजबूरी में काही प्रमाणात कदाचित आयकर भरत असतील). आजच्या digital युगात इमानदार व्यापारीला रोख मध्ये आर्थिक व्यवहार करण्याची गरज नाही. हजार रुपयांच्या वरची खरीदारी ई-मनी द्वारा सहज होऊ शकते. यात चोरी आणि डकैतीची भीती हि नाही. तरीही आयकर इत्यादी सरकारी कर चुकविण्यासाठीच देशात ९४ टक्के आर्थिक व्यवहार रोखमध्ये होतात. याचा अर्थ एकच निघतो, आपल्या देशात अधिकांश लोक कर चोरी करतात.  

देशात १४.६ लक्ष कोटी १००० आणि ५००च्या नोटा आहेत. त्यातले किमान ७-८ लक्ष कोटी रूपये  आयकर इत्यादी सरकारी कर चुकवून जमा केलेला आहे.  गेल्या ८ नोव्हेंबरला प्रधानमंत्री मोदीनी १०० अणि ५००च्या नोट चलनातून बंद करण्याची घोषणा केली.   त्या क्षणापासून बातम्या ऐकतो, आहे, जुन्या नोटांचा वापर लोक संपती कर, विजेचे आणि इतर पाणीपट्टी, संपती कर इत्यादी थकित बिले भरण्यासाठी करत आहेत.    सूरत असो वा ठाणे सर्व नगरपालिकांची तिजोरी भरत आहे. 

मनात एक प्रश्न आला, आधी या लोकांनी बिले का नाही भरली. कारण स्पष्ट आहे, सरकारी बिले भरायची नसतात. सरकारी कर कधी द्यायचा नसतो. कधी न कधी राजनेता बिल माफी देतातच (दिल्लीत आमच्या इमानदार सरकारने ४-५ हजार कोटींची वीज आणि पाणीपट्टी माफ केली). आमच्या सारखे नियमित बिले भरणारे  इमानदार मूर्ख बनले. आता नोटा रद्द झाल्या, रद्दी  कागज सरकारच्या माथी मारून बिले भरणे म्हणजे एक प्रकारची कर माफीच. काल पर्यंत ३ लक्ष कोटी रुपयांचे चलन बँकांनी बदलून दिले तरीही हि मोठ्या मोठ्या रांगा संपत नाही आहे, कारण स्पष्ट आहे. बहुतेक गरीब जनतेचे निष्क्रिय जनधन खाते मोठ्या प्रमाणात जागे झाले आहेत. कमिशन घेऊन पैसा जमा करण्याचा खेळ सुरु झाला आहे. आधार कार्डचा उपयोग गरीब जनता,  करबुडव्यांचे  दररोज  ४००० काळे रुपये (५०० रुपये कमिशन घेऊन) स्वच्छ करून देत आहेत. काही हि म्हणा गरिबांची काही कमाई तरी होत आहे. हि गोष्ट वेगळी ते अश्याप्रकारे या कर बुडव्यांना मदत करीत आहेत. छोटे- मध्यम व्यापारी आपला काळा पैसा कमिशन देऊन किंवा परिचितांना लाईनीत उभे करून पांढरा करून घेतील.  बाकी ज्यांचा तिजोरीत भरगच्च काळा पैसा आहे. त्यांना सर्व पैसा काळ्याचा पांढरा करणे संभव नाही अशेच लोक अणि कंगाल झालेले नेता आरडाओरडा करीत आहे आणि नित नव्या अफवा पसरवितआहेत(सध्या गादीवर नाहीत, पुन्हा भरगच्च पैसा मोठ्या प्रमाणात नवीन नोटांत गोळा करणे शक्य नाही). किमान २-३ लक्ष कोटी रुपय्या अग्नीत जाळणार किंवा गंगेत बुडणार हे निश्चितच. 

आज सकाळीच एक ओळखीचा एक मित्र   भेटला, तो म्हणाला पटाईतजी कुछ भी कहो मोदीजीने देश के लोगोंको अहसास करा ही दिया की वे सब चोर हैं आणि जोरात हसला. मला ही हसू आले.   किती हि कटू असले तरी हेच आजचे सत्य आहे. 

Sunday, October 30, 2016

काहीच्या काही - मधु आणि मधुमाशी


मला मधुमाश्यांची भयंकर भीती वाटते. कारण हि तसेच आहे, बालपणीची गोष्ट १२-१३ वर्षांचा असेल. दिल्लीच्या बिर्लामन्दिराच्या मागे असलेल्या जंगलात मित्रांसोबत फिरत होतो. अचानक समोरून मधुमाश्यांचे भले मोठे सैन्य चालून येताना दिसते.  कुणीतरी बहुधा त्यांची खोड काढली असावी. पण मधुमाश्यांच्या न्यायच अजब, गुन्हेगार कुणी का असेना, जो समोर दिसेल त्याला डसा. जीव मुठीत घेऊन पळालो. बहुधा उसेन बोल्टचा रिकार्ड सुद्धा मोडला असेल. ओलम्पिक असते तर नक्कीच सुवर्णपदक मिळाले असते. तरीही शरीरावर कित्येक ठिकाणी मधुमाश्यांच्या चुंबनांचे वेदानामयी काटे उमटलेच.  या घटनेनंतर एखाद दुसरी मधुमाशी दिसली तरी अंगावर काटे येतातच. 

कालचीच गोष्ट सकाळी-सकाळी अंगणातल्या झेंडूंच्या फुलांना पाहत होतो. एक मधुमाशी चेहऱ्याजवळ घोंघावत आली चक्क मानवी आवाजात म्हणाली, 'ए थेरड्या' बघतोस काय, समोरची बादली उचल आणि फुलांवर पाणी घाल. क्षणभर मी गोंधळलोच, काय करावे सुचेनासे झाले. ती पुन्हा ओरडली 'मुकाट्याने पाणी फुलांवर टाकतो, कि दाखवू इंगा'. बालपणीची आठवण जागी झाली. दचकून म्हणालो, घालतो बाबा, पण एक सांग फुलांवर पाणी कशाला घालायचे. मुर्खा एवढे कळत नाही, फुल पाण्यात भिजले कि त्यातले परागकण हि भिजतील. भिजलेले पराग पियुन मला 'पातळ आणि भरपूर मधु' बनविता येईल.  स्वस्त असे पातळ मधु विकून आमचा मालक हि चांगली कमाई करेल. 

काही इलाज नव्हता, मुकाट्याने फुलांवर पाणी घालू लागलो. अचानक दुसर्या दिशेने दुसरी मधुमाशी वेगाने येताना दिसली. जवळ येऊन तीही ओरडली, पांढरेकेस वाल्या, ते पाणी घालणे थांबव आधी. मला काही समजेनासे झाले, पहिल्या मधुमाशी कडे बघितले, दुसरी जोरात ओरडली, 'कळत नाही का, फेक ती बादली. मी चुपचाप पाण्याची बादली खाली ठेवली. हिम्मत करून तिला विचरले,  ती फुलांवर  पाणी घालायला सांगते आणि तू पाणी घालू नको म्हणते, का? हा काय प्रकार आहे.  दुसरी मधुमाशी म्हणाली, वाळक्या फुलांच्या पराग पिऊन मी चांगले घट्ट असे मध बनविते. हिच्या सारखे, मधात पाण्याची भेसळ नाही करीत. आमचा मलिक दर्जेदार घट्ट मध विकतो. मी फुलांना पाणी घालणे थांबविले आहे, हे पाहून पहिल्या मधुमाशीला राग आला, ती माझ्यावर जोरात डाफरली, फुलांच्या वर पाणी घालतो कि नाही थेरड्या कि तुला शिकवू धडा? दुसरी तेवढ्याच त्वेषाने ओरडली, तिचे ऐकू नको, माझ्या दंश तिच्यापेक्षा जालीम आहे. काय करावे मला सुचले नाही, शेवटचा मार्ग पाण्याची बादली खाली ठेऊन खोलीच्या दिशेने धूम ठोकली. कानावर फक्त ऐकू आले, पळतो आहे हरामखोर, सोडणार नाही तुला. 

आई...ई, करत जोरात ओरडलो. डोळे चोळीत उठलो. सौ. पण  दचकून जागी झाली. काय झाले?  मी म्हणालो, बहुतेक मधुमाशी डसली वाटते. सौ.ने काही नाराजगीने माझ्याकडे बघितले आणि म्हणाली, इथे बंद खोलीत कुठून मधुमाशी येणार, डास चावले असतील. काहीच्याबाही विचार करत राहतात आणि असले भुक्कड स्वप्न तुम्हाला पडतात. माझी हि झोपमोड होते. बाय द वे चावली कुठे? मी म्हणालो, चावली नाही ग. गालाचे चुंबन घेतले. सौ. पुढे काही बोलली, नाही चुपचाप अंगावर पांघरून घेऊन, पाठ फिरवून झोपून गेली. स्वत:ला मनोमन दाद दिली, बायकांची बोलती बंद करायचा चांगलाच अनुभव आहे, अस्मादिकांना. 

सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे फिरायला गेलो. येताना ओळखीच्या किरणाच्या दुकानासमोर थांबलो. समोर रेकवर मधाच्या बाटल्या ठेवलेल्या दिसत होत्या, चाचपत-चाचपत हळूच त्याला विचारले, हे मध पातळ वाले आहे, कि घट्टवाले?  त्याने विचित्र नजरेने मजकडे पाहिले आणि तेवढ्याच हळू आवाजात विचारले, अंकल, आज सुबह सुबह ही.... डोक्यावर हात मारला..च्यायला मधुमाशींच्या चक्करमध्ये येऊन मद्य.ssपी ठरलो (काका, मद्याला शिवत सुद्धा नाही, हे आता कुणाला खरे वाटेल). 

डिस्क्लेमर: या कथेचा विज्ञापनांशी काही एक संबंध नाही. 

अवध कुमार (आजचा राम) आणि क्षत्रिय धर्म



अवधी भाषा म्हणजे, आदर, आतिथ्य आणि विनम्रतेची लखनवी तहजीब. 'पहले आप म्हणत' गाडी निघून गेली तरी चालेल. पण दुसर्याला महत्व देण्यात लखनवी माणूस कधीच कमी पडणार नाही. ज्या अवधमध्ये पराया लोकांना एवढा मान दिला जातो, तिथे वडिलधार्यांची विनंती म्हणजे जणू देवाचीच आज्ञा.  संत तुलसीदासांनी श्रीरामाचे चरित्र याच अवधी भाषेतच लिहिले. वडीलधार्यांची आज्ञा 'प्राण जाये पर वचन न जाये' या परंपरेला अनुसरून श्रीरामांनी आनंदाने वनवास स्वीकारला. पण तो काळ त्रेता युगातला होता. 

आज कलयुग आहे, आजचा राम वडिलधार्यांच्या आदेशाचे पालन करेल का?  श्रीराम काही विरोध न करता गुपचूप  वनात  का निघून गेले? कुणी त्यांना अन्यायचा विरोध करण्यासाठी प्रवृत्त का नाही केले? इत्यादी अनेक प्रश्न मनात आले. रामायण उघडून बघितले, त्या वेळीही श्रीरामांचे हितचिंतक सल्लागार होते. त्यांनी श्रीरामाला अन्यायाचा विरोध करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला. या सल्लागारांचे म्हणणे होते,  वृद्धावस्था प्राप्त झाल्यावार राजाने आपल्या ज्येष्ठ पुत्राचा राज्याभिषेक करून वनात निघून जावे हाच क्षत्रिय धर्म आहे.  ज्येष्ठ पुत्र जर क्षत्रिय धर्मानुसार वागत नसेल तरच कनिष्ठ पुत्राचा सिंहासनासाठी विचार केला पाहिजे. श्रीरामाने असला कुठलाही अपराध केला नाही, सदैव क्षत्रिय धर्माचे पालन केले.  केवळ कनिष्ठ पत्नी कैकयी मध्ये आसक्त होऊन, तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी ज्येष्ठ पुत्र श्रीरामांना वनात धाडणे म्हणजे अधर्मच. क्षत्रिय धर्म म्हणतो, अधर्माने वागणाऱ्या म्हातार्या बापाला कारावासात बंदिस्त करणे किंवा त्याचा वध करण्यात काहीच गैर  नाही. श्रीरामांनी क्षत्रियधर्म काय सांगतो, याचा यत्किंचित हि विचार केला नाही. सहर्ष  वनवास स्वीकारला.   

आज पुन्हा अवधचा राजकुमार धर्मसंकटात पडलेला आहे. म्हातारा झालेला बाप आणि वडीलधारी मंडळी ज्येष्ठ पुत्राला त्याच्या इच्छेनुसार राज्य करू देत नाही आहे. राजाच्या राजकारभारात ढळवा-ढळवी करणे, क्षत्रिय धर्मानुसार अधर्मच. प्रश्न एकच आजचा राजकुमार श्रीरामांप्रमाणे वडीलधार्यांच्या आदेशाचे पालन करेल कि अन्यायाविरुद्ध विद्रोह करेल. 

त्रेता युगानंतर, द्वापर युग झाले. द्वापरयुगात कृष्णाने अर्जुनाला गीतोपदेश करताना म्हंटले, क्षत्रिय धर्म रक्षणासाठी, अधर्मी स्वकीयांचा वध करणे म्हजे धर्म. श्रीकृष्णाचा उपदेशाला अनुसरून अर्जुनाने तीक्ष्ण बाणांनी स्वकीयांचा वध केला. क्षत्रियधर्माचे रक्षण केले अर्थात राजपद प्राप्त केले. 

आज अवधकुमारच्या एका हातात रामायण आहे आणि दुसर्या हातात महाभारत. एक मार्ग गादीपासून दूर करणारा, काही वर्षांसाठी वनवासात जाण्याचा आणि  दुसरा मार्ग  राजपद प्राप्ती साठी रस्त्यात येणाऱ्या समस्त कंटकांना दूर करण्याचा, त्यात स्वकीय हि आलेच. 

अवधकुमार पुढे काय करणार यावर सर्वांची नजरे आहेत. रामायणाचा आदर्श कि महाभारतातल्या अर्जुनाचा आदर्श. वडीलधार्यांची आज्ञा पालन करणे अथवा क्षत्रिय धर्माचे पालन.   किंवा ते असे काहीतरी करतील ज्याने कवींना कलयुगात नवीन ग्रंथाची रचना करण्याची प्रेरणा मिळेल. 

Thursday, October 20, 2016

हिमाचली पदार्थ - भटुरे (कणकीचे भटुरे)



भटुरे नाव ऐकल्यावर  मैद्याचे  छोले भटुरे आठवतील. पण हिमाचलच्या मंडी जिल्ह्यात सक्रेणादेवीच्या मंदिराजवळ असलेल्या गावात भटुरे बनविण्यासाठी  मैद्याच्या जागी कणकीचा वापर होतो. बहुतेक सकाळी नाश्त्यासाठी हे भटुरे केले जातात.  या भटुरर्यांचे वैशिष्ट्य म्हणजे  हे भटुरे तळून किंवा तव्यावर भाजून केले जातात.  (भटुरे बनवितानाचे फोटो खाली दिलेले आहे, कुणाचा चेहरा दाखविणार नाही या अटीवर फोटो काढले होते). मैद्याच्या भटुरर्या सारखे हे भटुरे पण फुलतात. आपल्या मराठमोळ्या पोळी एवढे मोठे पण दुप्पट जाड नक्कीच असतात. आपण आपल्या पद्धतीने भटुर्यांचा आकार निश्चित करू शकतो. चित्रावरून भटुरे कसे बनतात याचा अंदाज घेता येईल. 



साहित्य: एक पेला कणिक, अर्धी वाटी उडीत डाळ, अर्धी वाटी चणा डाळ, आले १/२ इंच, लसूण १०-१२ पाकळ्या, मिरची २-३, अर्धा चमचा काळी मिरी, १/२ चमचा जीरा पावडर. स्वादासाठी *कोथिंबीर आणि मीठ. गोडे तेल आवश्यकतानुसार. हिमाचल मध्ये सरसोंचेच तेल वापरतात (*या भागात भाबरी नावाची झुडूपा सारखी वनस्पती असते. भाबरीला कढीपत्या सारखे छोटी-छोटी पाने असतात. भाबरीच्या पानांना एक प्रकारचा सुगंध असतो. भाबरीचा प्रयोग चटणी सारखा किंवा पकौडे इत्यादींचा स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. भाबरीच्या काळ्या रंगांच्या बियांचा हि वापर स्वादासाठी केला जातो. गावात खालेल्या भटूर्यात भाबरीच्या पानांचा आणि बियांचा वापर केला  होता. शहरात भाबरी बाजारात मिळणार नाही.  त्या जागी कोथिंबीर वापरता येईल). 

कृती:   उडीत डाळ आणि  चणा डाळ, रात्रीच भिजवून ठेवायची.  सकाळी कणिकत खमीर मिसळून कणकीला भरपूर मळावे किमान दहा एक मिनिटे. नंतर मळलेल्या कणकीला खमीर उठण्यासाठी एक ते दीड तास झाकून ठेवा.  


सारण बनविण्यासाठी मिक्सरमध्ये, रात्र भर  भिजलेली  उडीत डाळ, चणा डाळ आले, लसूण, मिरची, काळी मिरी, जीरा पावडर टाकून जाडसर पिसून घ्या. स्वादानुसार मीठ. (पाटा-वरवांट्यावर जाडसर पिसल्या जाते). खाताना आल आणि लसणाच्या तुकड्यांचा स्वाद जिभेला आला होता. 

कढईत तेल गरम झाल्यावर. कणकीच्या गोळ्यांची पारी करून त्यात सारण टाकून हाताने, किंवा पोळी सारखे लाटून भटुरा तैयार करून, मध्यम आचेवर तेलात तळून घ्या. ज्यांना तळलेले चालत नाही. एका तव्यावर थोडे तेल लाऊन मध्यम आचेवर वर भटूरे दोन्ही बाजूनी भाजून घ्या. हे भटुरे छोल्या सोबत खायला चांगले लागतात.  (हे भटुरे डाळींएवजी पनीर इत्यादी टाकून हि आपण करू शकतो. सारणात काय टाकायचे हे सर्वस्व आपल्यावर आहे.  कृतीत परंपरागत पद्धत दिली आहे).

(भाबरी)

हिमाचली पदार्थ - पोष्टिक आणि स्वास्थ्यवर्धक - झोल



सक्रेणादेवीचा फोटो 


Monday, October 17, 2016

चिव काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट


एक होती चिवताई इटुकली-पिटुकली. चिव-चिव करत आंगणात यायची, चिवताई ये दाणा खा, पाणी पी आणि भुर्रर्र उडून जा. आजी! चिवताई खरंच असते का? कशी दिसते?  हुशार ग माझी सोनुटली, तुझ्या  बाबांना सांगते, चिवताईचा फोटू आणायला.... एक होता काऊ, काळाकुट्ट, मोठे मोठे पंख, नेहमी चिवताईला त्रास द्यायचा. हा! हा! हा!, आजी किती ग!खोट्ट-खोट्ट बोलते तू, काऊ असते व्हाईट-व्हाईट, लांग-लांग टेल, मोठी-मोठी शिंग. बाबा म्हणतात, काऊचे दूध हेल्दी-हेल्दी, गोडंगोड. बाबा माझ्या साठी काऊचे दूधच आणतात. आजी ग, खोट्ट बोलणार्याला गाॅड, पनीशमेंट देतो. एक विचारू आजी, गाॅडने तुझे दात तोडले का? म्हणत सोनुटली तिथून पसार झाली. काहीही म्हणा, आमची सोनुटली भारी खोडकर, भारी हुशार. तिला मूर्ख बनविणे सौपे नाही, आजी मनातल्या मनात पुटपुटली. 

आजीने डोळे बंद केले. गावातले घर.. सोनुटली, आजीच्या मांडीवर बसलेली, चिव-चिव करीत आंगणात चिवताई आल्या, दाणे टिपू लागल्या. चिवताई ये दाणा खा, म्हणत सोनुटलीने हात उघडला, एक चिवताई आली, तिने सोनुटलीच्या तळहातावरचा दाणा टिपला आणि भुर्रर्र उडाली. आजी-आजी, चिवताईने दाणा टिपला म्हणत सोनुटलीने उडड्या मारीत जोरात टाळ्या वाजविल्या, आंगणातल्या चिमण्या चिव-चिव करीत उडाल्या. घाबरट कुठल्या, सोनुटली जोरात हसली.   

आजीने डोळे उघडले. ACवाल्या फ्लेटचे दार-खिडक्या सदैव बंद असतात. आंगणच नाही, तर चिवताई कुठून येणार... गोष्ट अर्धवटच राहिली. 

एक होती चिव, एक होता काऊ.  चिवचे घर होते मेणाचे, काऊचे घर होते शेणाचे, (असे फक्त गोष्टीतच असते).  एकदा काय झाSSले... जोरात पाऊस आला. काऊचे घरटे वाहून गेले .... मोठ्या शहरात वाहून गेली,... चिव-काऊची खोट्टी-खोट्टी गोष्ट .... 

Thursday, October 6, 2016

डॉक्टर ए.आर. शहाणे आणि श्राद्धाचा ब्राम्हण




नुकताच गेलेल्या  पितृपक्षातली गोष्ट. बर्याच महिन्यांनी मला माझा एक जुना मित्र भेटला. डॉक्टर ए.आर. शहाणे त्याचे नाव.  नावाप्रमाणेच अत्यंत हुशार. विषय कुठलाही असो, ज्ञान पाजायला नेहमीच उत्सुक. पण या वेळी त्याचा चेहरा  मरगळलेला होता.  मी विचारले कसली चिंता करतो आहे. तो म्हणाला तुला माहितच आहे, दरवर्षी मी पितरांना प्रसन्न करण्यासाठी ब्राम्हणाला घरी जेवायला बोलवितो, दान-दक्षिणा देतो. मी म्हणालो, त्यात एवढे उदास असण्याचे कारण काय. तो म्हणाला, गेल्या वर्षी हा ब्राम्हण पितृपक्षात घरी आला होता, जेवण झाले, दक्षिणा दिली. त्या वर त्याचे समाधान झाले नाही. जाताजाता माझ्या ५ वर्षाच्या मुलाच्या नाकावर मुक्का मारला आणि म्हणाला या वर्षी तुझ्या मुलाचे  नाक तोडले आहे पुढच्या वर्षी तुझ्या  मुलाची तंगडी तोडणार आहे.  मी म्हणालो, एक मुस्कटात का नाही लावली त्याला? तो उतरला, एक तर अतिथी आणि त्यात ब्राम्हण. कसा मारणार त्याला. मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेलो, नाकाचे हाड तुटले होते, सर्जरी करावी लागली. मी म्हणालो, झाले गेले विसरून जा. आता त्या ब्राम्हणाला पुन्हा घरी बोलवू नको, इतरांना हि तसे करायला सांग.  चांगली अद्दल घडव त्याला. त्या वर तो म्हणाला, असे कसे करू शकतो, जुने संबंध आहेत, त्याच्या सोबत. त्याला वाळीत टाकणे केंव्हाही उचित नाही. येत्या रविवार मी त्यालाच घरी बोलविणार आहे. 

आता काय म्हणणार, अश्या उच्च शिक्षित विद्वान माणसाला. मी कपाळावर हात मारला, डोळ्यांसमोर, पायाला प्लास्टर बांधलेल्या अवस्थेत त्याच्या मुलाचा चेहरा डोळ्यांसमोर तरळला. 


टीप: ब्राम्हण  ???

Saturday, October 1, 2016

आतंकवाद अणि कठपुतली बाहुल्या (फ़िल्मी सितारे)


मला आठवते १९८०-९० दशकात मुंबईतल्या सिनेसृष्टीत '"दाऊद के इशारे के बिना यंहा पत्ता भी नहीं हिलता" अशी वाच्यता होती.  तस्करी आणि उगाही (वसूली)चा पैसा दाऊद सिनेसृष्टीच्या माध्यमातून दुसर्या धंद्यात वळवायचा. दाऊद सारख्या तस्कारांमुळे आपल्या देश्यातील कोटीपेक्षा जास्त तरुण नशेच्या आहारी गेले, हजारोंच्या संख्येने  अपराधी बनले, हे वेगळे. तरीही सिनेसृष्टीने दाऊदचे स्वागत केले. मोठे-मोठे मल्टी स्टारर् सिनेमे बनू लागले, त्यांत बहुतेक वसुली आणि तस्करीचा पैसाच लागत असे, अशी वाच्यता होती. नट आणि नट्यांना दाऊदच्या चरणी सर्वस्व अर्पित केल्याशिवाय सिनेसृष्टीत काम मिळत नाही, अश्या आशयाच्या गाॅसिप सिने पत्रिकांमध्ये वाचायला मिळायचे 

१९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट झाले. शेकडोंच्या संख्येत मुंबईत लोक मारल्या गेले. दाऊद फरार झाला.  आता वाटले होते, सिनेसृष्टीत दाऊदचा प्रभाव कमी होईल. पण तसे घडले नाही. दाऊदची पकड सिनेसृष्टीवर अधिक मजबूत झाली. देशप्रेम, स्वाभिमान इत्यादी विसरलेले, केवळ पैश्यांसाठी नट आणि नट्या परदेशात असलेल्या  दाऊदच्या चरणी नाक घासण्यात आणि दरबारात  ठुमके धन्यता मानू लागले. 

आता प्रश्न येतो आपली जनता आणि सरकार काय करत होती. दुसरा कुठलाही देश असता, तर अश्या कलाकारांवर सिनेसृष्टीत काम करण्यावर कायम बंदी टाकली असती किंवा आतंकवादीशी संबंध ठेवण्यासाठी त्यांना जेलमध्ये धाडले असते. (आपली सरकारने अश्या कलाकारांवर का कार्रवाई केली नाही, हेच समजत नाही).  जनतेने हि  अश्या कलाकारांचा बहिष्कार केला पाहिजे होता. पण असे घडले नाही. मुंबईचे वाघ म्हणविणार्या नेत्यांनी अश्या कलाकारांचा बहिष्कार करण्याच्या धमक्या वैगरे दिल्या होत्या असे ऐकिवात आहे.  बहुतेक त्यांच्या धमक्यांना दाऊद समर्थित सिनेसृष्टीने 'कुत्र्यांचे भुंकणे' याहून जास्त भाव दिला नसावा. ज्या मुंबईत शेकडों लोक मृत्युमुखी पडले, त्याच मुंबईत अनेक नेता किंवा दरबारात ठुमके लावणारे दाउदच्या आशीर्वादाने निवडणूक जिंकले अश्याही वाच्यता आहेत. (उत्तर प्रदेशातील  गवर्नर श्री  राम नाईक यांनी तर उघडपणे आरोप लावले आहेत).  

यानंतर हि मुंबईत अनेक आतंकवादी घटना  घडल्या.  २००८च्या हल्ल्यात जनतेसोबत अनेक पोलीस अधिकारी हि मारल्या गेले. तरीही कराचीत बसलेल्या दाऊदचे नियंत्रण आपल्या सिनेसृष्टीवर कमी झाले नाही. आता तर पाकिस्तानी कलाकार हि सिनेसृष्टीत दिसू लागले.  पण भारतात काम करीत असताना, इथे घडणाऱ्या आतंकवादी घटनांचा विरोध त्यांनी कधीच केला नाही.  विषयांतर होईल, पण मला आठवते, अलिबाबा चालीस चोर मधले चोर हि ज्या घरात दरोडा टाकायचा असेल त्या घरातले मीठ खात नसे. इथले  मीठ खाऊन हि, इथल्या आतंकवादी घटनांचा जर पाकी कलाकार  विरोध करीत नाही,  तर त्यांना इथे काम देण्यात काय अर्थ. खरे म्हणाल तर सिनेसृष्टीने जी मुंबईमध्ये आहे निदान त्यांनीतरी पाकी कलाकारांवर १९९३ नंतरच बहिष्कार टाकायला पाहिजे होता. आपल्या दुर्दैवाचे कारण असलेल्या दाऊदच्या कठपुतली कलाकारांना डोक्यावर घेऊन नाचणारी मुंबईकर/ देशातील सिनेप्रेमी जनतेला काय म्हणावे.   

आज काश्मिरात आपले सैन्याचे जवान शहीद झाले.  आपल्या देशाचे मीठ खाणार्या पाकी कलाकारांनी या घटनेची निंदा केली नाही. उलटपक्षी पाकिस्तानांत परतून, आपल्या देशाची निंदाच केली, असे ऐकिवात आहे. अश्या पाकी कलाकारांचा बहिष्कार करण्याएवजी, सिनेमा सृष्टीतील सर्व मोठे कलाकार, पाकिस्तानी कलाकारांचे समर्थन करीत आहे. कारण स्पष्ट आहे, हे सर्व कलाकार आतंकवादी मालकाच्या इशार्यावर नाचणाऱ्या बाहुल्या आहेत. पाकी कलाकारांसोबत अश्या बाहुल्यांचा हि बहिष्कार आपल्या सिनेसृष्टीने/ आपण केला पाहिजे, हीच आपल्या शहीद  सैनिकांना खरी श्रद्धांजली असेल. 

Monday, September 19, 2016

पाकिस्तानला धडा शिकविण्याचे काही अहिंसक उपाय


पाकिस्तानला  चांगले ठाऊक आहे, भारतीय नेता गीदड भभकी देण्यापलीकडे काही करत नाही.  भारतीय संसदेवर आक्रमण झाले, मुंबई हल्ला  झाला तरी आपण काहीच केले नाही. पाकिस्तानशी कसे वागावे यावर सल्ला देणारा भारतीय थिंक टेंक म्हणजे आंग्ल भाषा जाणारे अधिकारी, विशिष्ट विश्वविद्यालयांंत शिकलेले विचार जंतू.  या  लोकांना देशापेक्षा स्वत:च्या हिताची जास्त चिंता असते. पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी  भारताने नमते घ्यावे असाच त्यांचा नेहमी सल्ला असतो. आपले राजनेता त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवतात आणि त्यानुसार रणनीती आखतात. शिवाय भारतीय बुद्धीजीवी (बुद्धी नसलेले) आणि मिडिया (?) पाकिस्तानशी संबंध कसे  चांगले करावे यावरच जोर देतात. 

युद्ध हा शेवटच पर्याय असतो. कधी कधी युद्धात विजयी सुद्धा पराजित ठरतो. हजारोंच्या संख्येने सैनिकांचा जीव जाऊ शकतो. देशाला हि अतोनात नुकसान होते.  पण आपल्या सैनिकांचे रक्त काही पाणी नाही. त्याकडे आपण दुर्लक्ष  करणे हि उचित नाही  (आतापर्यंत आपण हेच करत आलो आहे).  पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी युद्धाशिवाय जे काही उपाय करता येणे शक्य आहे, शीघ्र केले पाहिजे. 

भारताने स्पष्ट करावे जो पर्यंत पाकिस्तान आतंकवादी हाफिज सईद, मसूद अझहर इत्यादींना भारताच्या हवाली करत नाही तो पर्यंत कुठली हि वार्ता भारत पाकिस्तानशी करणार नाही. अर्थात अश्या घोषणांचा पाकिस्तानवर काहीही प्रभाव पडणार नाही. मग पुढे काय?

गांधीजीनी अहिंसा आणि असहयोगचा मंत्र दिला होता.  आपण गांधीचींचा असहयोग मंत्राचा वापर 'सरकारात इच्छा शक्ती असेल तर उद्याच पासून सहज करू शकतो.  म्हणतात न,  प्रेमात आणि युद्धात सर्व क्षम्य असतो. पाकिस्तान जर  नंगा झाला आहे तर  असहयोग मंत्राचा वापर करताना नीती मर्यादा विसरून नग्न व्हायला हरकत नाही. पाकिस्तानी जनतेला कळेल असे उपाय केले पाहिजे. 

बॉलीवूडचा प्रभाव पाकिस्तानी जनतेवर आहे. पाकिस्तानी कलाकार आणि गायकांना भारतात काम करायला तत्काळ पाबंदी लावली पाहिजे. या शिवाय त्यांचे गाणे इत्यादी भारतातल्या कुठल्याही प्रसार माध्यमांत दाखविण्याची बंदी मग गुलाम अली का असोना.

पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणे सोडावे व  देशात प्रसार माध्यमांना पाकिस्तानी क्रिकेट दाखविण्यावर पाबंदी लावावी.  या शिवाय जो  देश पाकिस्तान सोबत क्रिकेट संबंध ठेवेल किंवा मालिका खेळेल त्या सोबत भारत  खेळणार नाही असे धोरण आखण्यात क्रिकेट बोर्डला बाध्य करणे. मग वर्डकप का असेना. (८०% रेवेन्यु आपण देतो, बेशरम बनायला हरकत नसावी).  

जगाला स्पष्ट सांगावे सिंधू नदी समझौता भारताला मान्य नाही. आज पासून भारत आपल्या गरजेचे पाणी वापरल्यानंतर उरलेलेच पाणी पाकिस्तानला देणार. तत्काळ रावी- व्यास लिंक नहर बनविण्याची घोषणा करावी. (उद्याच करता येते). युनो किंवा इतर अंतराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानने किती हि ओरड केली तरी त्या कडे लक्ष्य देण्याची गरज नाही. या घटकेला कुठलाही देश आपल्यावर दबाव टाकू शकत नाही. स्पष्ट सांगावे आतंकवाद पोसाणार्यांना आम्ही पाणी देऊ शकत नाही. पाणी  किंवा आतंकवाद हे गणित पाकिस्तानला मान्य करावेच लागेल. युद्ध पुकारणे पाकिस्तानच्या बसचेही नाही, हे ध्यानात ठेवा. तसे असते तर काश्मीर वरून केंव्हाच युद्ध सुरु केले असते. 

शिवाय इतर अन्य उपाय पण उद्या पासून अमलात आणू  शकतो, उदा: वाघा बोर्डर वरची सेरेमनी बंद करता येते. केलीच पाहिजे.  समझौता गाडी, बस सर्विस तत्काळ प्रभावाने बंद करावी. या सेवा बंद झाल्याने जास्त नुकसान पाकिस्तानचे आहे. 

अर्थातच  तथाकथित  बुद्धीजीवी  वरील उपायांचा विरोध करतील.  पण अश्या मूर्खांची पर्वा करायची गरज नाही.  क्रिकेट आणि पाण्याची भाषा पाकिस्तानी जनतेला व राजनेत्यांना  चांगलीच कळेल.  

Sunday, September 11, 2016

विदर्भ- शेतकर्यांचे अच्छे दिन आले




सुखी आणि समृद्ध प्रदेश अशी विदर्भाची ओळख होती. पण गेल्या काही दशकांपासून, विदर्भ म्हणजे आत्महत्या करणार्या शेतकऱ्यांचा प्रदेश. रोजगार साठी वणवण हिंडणारी वैदर्भीय जनता.  वारंवार पडणारे दुष्काळ आणि पाऊस पडला तरी शेतमालाला मिळणार कमी भाव. शेतीवर आधारित अन्य उद्योगांचा अभाव.  बळीराजा आणि ग्रामीण जनते समोर एकच पर्याय उरला होता. शहरात जाऊन रोजगार शोधणे किंवा कर्जबाजारी होऊन आत्महत्या करणे. विदर्भातल्या गावांत दलित आणि आदिवासी लोकांची संख्या जास्त. तरीही शेतकर्यांची राजनीती करणारे किंवा दलितांचे कैवारी कुणाचे हि लक्ष्य यावर गेले नाही. शेतकरी नेत्यांनी राजनीतीची उडी, ऊसाचा भाव, वीज माफी, कर्जमाफी सारख्या आंदोलनांच्या पुढे  गेली नाही.  दलितांच्या कैवार्यांनी हि वोट बँकची राजनीती केली पण दलित आदिवासी ग्रामीण जनतेला स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी कुणीही काही केले नाही.  त्यांना हि चांगले माहित आहे, एकदा जर ग्रामीण जनता आपल्या पायांवर उभी राहिली तर त्यांच्या समाज विभाजक राजनीतीचा अंत होईल.  याच कारणांमुळे विदर्भातले शेतकरी सर्वात जास्त आत्महत्या करतात. 

आपल्या देशाचे सौभाग्य किंवा विदर्भातल्या जनतेची पुण्याई म्हणा. हरियाणाच्या पवित्र भूमीत जन्मलेल्या एका योगीला विदर्भातल्या शेतकर्यांची परिस्थिती दिसत होती. विदर्भातल्या शेतकर्यांना आणि ग्रामीणांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा संकल्प या योगीने केला. जनतेला पोषक आणि नैसर्गिक अन्न मिळावे आणि शेतकर्यांच्या जीवनात हि समृद्धी यावी हाच, या योगीचा उद्देश्य. 

योगायोगच म्हणा, १० सेप्टेम्बर विश्व आत्महत्या प्रतिबंधक दिवस (World Suicide Prevention Day) म्हणून जगात साजरा केल्या जातो. याच दिवशी मिहान औद्योगिक क्षेत्राच्या बाहेर २३० एकर जमिनीवर पतंजली फूड पार्कचा  शिलान्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या फूडपार्क मध्ये १०,००० लोकांना प्रत्यक्ष आणि ५०,००० लोकांना अप्रत्यक्ष रूपेण रोजगार मिळणार आहे. पतंजली फूडपार्क दर वर्षी २००० शेतकर्यांना प्रशिक्षण देणार आहे. आत्महत्याग्रस्त परिवारातील लोकांना फूडपार्कमध्ये रोजगार देण्याचा निश्चय केला आहे.  विदर्भात ५०% हून जास्त जंगल आहे,   जडी-बुटी वर आधारित फूडपार्क, हजारोंच्या संख्येने वनवासी लोकांना अतिरिक्त रोजगार मिळवून देणार आहे. या शिवाय लाखों शेतकर्यांचे आयुष्य हि बदलणार आहे.  पुढ्या सहा महिन्यातच  या फूड पार्कच्या   काही युनिट सुरु करण्याचा पतंजलीचा निश्चय आहे.  दोन वर्षांच्या पूर्ण झाल्यावर  नागपूर  येथील फूडपार्क  जगातील सर्वात मोठा फूडपार्क ठरेल. 

साहजिकच आहे, एकदा एक मोठा उद्योग आला, कि विदर्भात अन्य उद्योग पाठोपाठ येतीलच. भविष्यात  विदर्भातील लोकांना रोजगार साठी परप्रांतात जावे लागणार नाही. शेतकर्यांचे उत्पन्न वाढल्यावर, त्यांची करी शक्ती वाढेल आणि इतर उद्योगांचा हि विकास होईलच. निश्चितच विदर्भातल्या शेतकऱ्यांचे आणि जनतेचे अच्छे दिन आले  आहे. 






Sunday, September 4, 2016

स्वादिष्ट आटा नूडल्स






काल संध्याकाळी सौ. बाहेर गेलेली होती. आमच्या चिरंजीवांना नूडल्स खाण्याची इच्छा झाली. आईच्या गैर हजेरीत, बाबा त्याच्या अशा खादाडीच्या इच्छा पूर्ण करतात हे त्याला चांगलेच माहित होते.  मी म्हणालो नूडल्स करून देईल. पण  मैदा वाले नूडल्सच्या  जागी कणकीचे नूडल्स मिळतात का कुठे बघ. चिरंजीव उतरले, मला काही प्रोब्लेम नाही. पण नूडल्स स्वदिष्ट झाले पाहिजे आणि तो घरा  बाहेर पडला. 

घरात कांदे होते,  टमाटर हि होते, प्रत्येकी दोन-दोन घेतले.  फ्रीज मध्ये फ्रेंच बिन्स हि होत्या. ७-८ शेंगा त्याही घेतला. मनात विचारकेला पाहू शेंगा नूडल्स मध्ये कश्या लागतात. बहुतेक या आधी कुणी नूडल्स मध्ये शेंगा टाकल्या नसतील.  एक हिरवी मिरची हि घेतली.  सर्व साहित्य बारीक चिरून ठेवले.  आमचे  चिरंजीव पतंजलीचे दोन पेकेट दहा दहा रुपये वाले आटा नूडल्स ( ६० ग्रॅम प्रत्येकी) घेऊन घरी परतला. 

गॅस वर  पॅन ठेवले. त्यात दोन चमचे तेल टाकून, तेल गरम झाल्यावर १/२ चमचे जीरा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली.  मग कांदे टाकून थोडे परतून घेतले, नंतर बारीक चिरलेले टमाटर आणि शेंगा त्यात घातल्या. स्वाद करता मीठ (फक्त भाजी पुरता). तीन ते चार मिनिटात भाजी तैयार झाली. 

गॅसच्या दुसर्या शेगडीवर, एका भांड्यात १ लिटर पाणी टाकून, उकळायला ठेवले. पाणी उकळू लागल्यावर, त्यात १/४ चमचे हळद  आणि चिमूटभर हिंग, १/२ चमचा चाट मसाला आणि थोडे मीठ (नूडल्सच्या हिशोबाने) आणि नूडल्स सोबत मिळालेला मसाला टाकला. शेवटी त्या पाण्यात नूडल्स टाकले. नूडल्स शिजायला २-३ मिनिटे लागतात. त्यानंतर गॅस मंद करून पॅन मधून भाजी काढून, नूडल्स शिजत असलेल्या भांड्यात  घातली. सर्व साहित्य भांड्यात व्यवस्थितपणे ढवळून घेतले.  

गॅस बंद करून गरमा-गरम नूडल्स आम्ही बाप-लेकाने मिळून फस्त केले. नूडल्स खरोखरच स्वादिष्ट झाले होते. शेंगांमुळे स्वाद हि मस्त आला होता. 




भाज्यांचे लोणचे


Friday, September 2, 2016

गाडीला अपघात होऊ दे बाप्पा ..


यंदा बळीराजाला कांदे  ५ पैशे किलोच्या भावाने  विकायची पाळी आली. आता डाळींचे भाव हि गडगडले. पहिले बळीराजा दुष्काळात मेला आता पाण्यात नक्कीच बुडणार आहे. प्रभूंच्या  कृपेने  रेल्वे ९२ पैश्यात १० लाखांचा विमा यात्रेकरूंना देणार आहे. जगण्याला कंटाळलेला निराश बळीराजा जर तिकीट घेऊन रेल्वेच्या गाडीत बसला तर त्याच्या मनात काय विचार येतील: 

गाडीला अपघात 
होऊ दे बाप्पा 
मला मरण 
येउ दे बाप्पा. 

विम्याचे पैशे 
मिळू दे बाप्पा.
मुलांचे शिक्षण 
होईल बाप्पा. 

शहरात नौकरी 
मिळू दे  बाप्पा.
उपासमार 
थांबेल बाप्पा. 


Thursday, September 1, 2016

ताजी क्षणिका - आठवली मग जात त्याला



दिल्लीत आजकाल  काय  चालले  आहे, काही  कळत  नाही.    आज एका मंत्र्याची (महिला आणि बाल कल्याण मंत्री) सीडी समाचार वाहिनींवर दाखविल्या गेली, त्याला त्यागपत्र द्यावे लागले. आपल्या बचावासाठी त्याला जात आठवली:   

महिला कल्याण करता करता 
सीडीत अटकला आपला  नेता 
गादी गेली, धम्म पडला 
आठवली मग जात  त्याला. 

Tuesday, August 30, 2016

आई: प्राणापेक्षा प्रिय बाळ



लहानपणी एक बोध कथा वाचली होती. कथेचा सार होता, माणूस मुळातच स्वार्थी आहे.  आई सुद्धा आपले प्राण वाचवायला आपल्या बाळाची बळी देऊ शकते. कथा होती, एक माकडीण नदीच्या एका बेटावर होती. अचानक पाणी वाढू लागले. तिला काय करायचे हे उमजेना. तिने आपल्या पिल्याला उचलून काळजाशी धरले. पण पाणी सतत वाढतच होते. तिने माणसासारखे उभे राहून आपल्या पोराला डोक्यावर ठेवले. पण पाणी काही वाढायचे थांबेना. तिच्या डोक्यावरून पाणी जाऊ लागले. अखेर आपला जीव वाचविण्यासाठी तिने आपल्या पोराला  आपल्या पायाखाली ठेवले.  आपल्याच अपत्याचे बलिदान देऊन तिने आपला प्राण वाचविला. कथेचा सार होता, जेंव्हा प्राणावर बेतते, तेंव्हा आई सुद्धा आपल्या अपत्यांचा त्याग करते.  खंर म्हणाल तर मला हि कथा कधीच पटली नाही. 

थोडा मोठा झाले, डिस्कव्हरी वाहिनीवर जनावरांवर आधारित मालिका पाहताना कित्येकदा अनुभव आला, आपल्या पिल्लांना वाचविण्यासाठी लहानशी हरिणी सुद्धा हिंस्त्र पशूंची झुंज देते. एकदा तर एका डुक्करीने आपल्या अपत्यांना वाचविण्यासाठी, आपल्या प्राणांची  आहुतीही दिल्याचे बघितले.  काही लोकांचे म्हणणे आहे, जनावरांना बुद्धी नसते. जगण्याचा आनंद म्हणजे काय हे त्यांना माहित नसते म्हणून जनावरांची आई आपल्या पिल्लांच्या रक्षणासाठी कधीच स्वत:च्या प्रांणांची पर्वा करीत नाही. 

कधी-कधी वर्तमानपत्रांत वाचायला मिळते. आपल्या मुलांना विष देऊन आईने आत्महत्या केली. मानवीय आई तर जनावरांच्यापेक्षा जास्त बुद्धिमान. ज्या अपत्यांना स्वत:च्या गर्भात वाढविले आहे, ती त्यांचा  प्राण कसा घेऊ शकते. आईला तर तिचे बाळ प्राणापेक्षा प्रिय. काय कारण असेल? प्रत्येक माणसाला भविष्यात पुढे काय ठेवले आहे, याची थोडीफार कल्पना असतेच. आपल्या पोरांचे लालन-पालन करण्यास असमर्थ आईला, आपल्या मुलांना भुकेने तडफडताना बघविले नाही, किंवा हिंस्त्र मानवीय जगापासून आपल्या अपत्यांचे रक्षण करण्यास असमर्थ राहिल्यामुळे कदाचित तिने  हे टोकाचे पाऊल उचलले असेल. 

दोन दिवस आधी सोशल मिडीया वर एक आई आपल्या बाळाला  बदडते आहे, असा विडीयो फेसबुक इत्यादी वर दिसू लागला. माझा एक मित्र म्हणाला या कलयुगात आई सुद्धा दुष्ट असते. आई आणि दुष्ट, मला त्याचे विधान पटले नाही. मी त्याला म्हंटले, बहुतेक सासरच्या जाचांना कंटाळून, मानसिक संतुलन हरवलेली स्त्री असे करू शकते. अन्यथा कुठलीही आई आपल्या बाळाला मारू शकत नाही. 

कालच टीवीवर एक बातमी बघितली.  नौका विहार करताना, एका स्त्रीचा बाळ सरोवरात पडला. आपल्या बाळाला वाचविण्यासाठी तिने पाण्यात उडी घेतली.  स्वत: पाण्यात बुडाली, पण एक हात उंच करून कितीतरी वेळ तिने आपल्या बाळाला पाण्याच्या वर ठेवले.  तिचा बाळ वाचला, पण तिला वाचविता आले नाही. तिने स्वत:हून मृत्यला कवटाळले, आपल्या बाळाला वाचविण्यासाठी.  तिने पुन्हा सिध्द केले, आई जनावरांची असो वा माणसाची, आपल्या बाळाच्या रक्षणार्थ स्वत:च्या प्राणांची आहुती द्यायला सदैव तैयार असते. 

Sunday, August 28, 2016

थोडी गूढ कथा -पिकनिक




मनोज आणि मोनिका व त्यांची दोन मुले,  राहुल वय साडेतीन वर्ष आणि रोहित २ वर्ष. एक छोटासा सुखी महानगरीय परिवार.  पण मोनिकाला एकच खंत होती. गेल्या चार वर्षापासून एकदाही मनोज आणि मोनिकाला एकत्रित सिनेमा पाहायला किंवा कुठे फिरायला जाणे जमले नव्हते. दिल्लीतल्या त्या प्रसिद्ध मल्टीप्लेक्स सैराट हा सिनेमा लागला होता. मनोजला कसे हि करून बायको सोबत सिनेमा बघायचा होता. कारण एकच, दोघांचाहि घरच्यांच्या इच्छे विरुद्ध प्रेम विवाह होता. 

म्हणतात न "जहाँ चाह वहाँ राह". गेल्या रविवारची गोष्ट. मनोज मोनिकला म्हणाला. आज आपण सिनेमा बघायला जाऊ. मोनिका, या दोन शैतानांचे काय करायचे,  सिनेमा बघू देतील हे.  मनोज: आपण दोघे राजाराणी सारखे मस्त सिनेमा बघू. राहुल आणि रोहितची काळजी तू करू नको. मी बघून घेईन. 

ऑटोत बसून मनोज परिवारासह त्या प्रसिद्ध माॅल वर पोहचला. मॉल मध्ये असलेल्या मल्टीप्लेक्स वर सैराट लागलेला होता. त्याच फ्लोर वर एक बालवाडी होती. तिथे लहान मुलांचे भरपूर खेळणे होते. घोडागाडी, गाडी, कार, घसरगुंडी, विडीओ गेम्स, टीवी वर सुरु असलेल्या कार्टून फिल्म्स अर्थात लहानमुलांना आवडणाऱ्या सर्व गोष्टी होत्या. स्कर्ट घातलेल्या सुन्दर सुन्दर दीदी ही होत्या. हे सर्व पाहून राहुल जाम खुश झाला. मनोज राहुलला म्हणाला, आम्ही परत येत पर्यंत तू आणि रोहित मस्त पैकी इथे खेळ. भूक लागली कि दीद खायला हि देईल. तो पर्यंत आम्ही फिरून येतो. बाबा तुम्ही का नाही इथे थांबत राहुल म्हणाला. बेटा इथे फक्त लहान मुलेच खेळू शकतात. तुला गाडी चालवायची होती न. आपल्या घरात तर जागा नाही. तू इथे मनसोक्त गाडी चालव. रोहितवर हि थोड लक्ष ठेव. काही लागल कि  या दीदीला  सांग. आम्ही येतोच. 

मुलाना बालवाडीत सोडून मनोज आणि मोनिकाने सैराट सिनेमाचा आनंद घेतला. घरी परतल्यावर, मनोज, मोनिकाला म्हणाला, बघ तुझ्या नवर्याची शक्कल. आता तर म्हण, हुशार आहे तुझा नवरा. मोनिका हि गालात हसली. आपल्या बायकोला खुश पाहून मनोज म्हणाला, पुढच्या रविवारी आपण बुद्ध गार्डनला जाऊ, लग्नापूर्वीच्या गमती-जमती करू. मोनिका: तुझ्या जिभेला काही हाड आहे कि नाही. मनोज: लग्नाआधी तूच म्हणायची 'देखने वाले जलते हैं तो जलते रहे'.  तेंव्हा तर लग्न हि नव्हते झाले, आता तर लायसेन्स आहे. मला सध्या तुझ्याशी बोलायला वेळ नाही, म्हणत मोनिका स्वैपाकघरात घुसली. मनोज मात्र जाम  खुश होता. मुलांना बालवाडीत खेळण्यासाठी सोडून आपण मौज करू शकतो. हे त्याला कळले होते. 

रात्रि मोनिकाने बघितले, राहुल झोपताना कण्हत होता. काय झाले राहुल, तिने विचारले.  राहुलने आपल्या पायाकडे बोट दाखविले.  त्याच्या पायावर सूज आलेली होती. राहुल घसरगुंडीवरून पडला होतो. मोनिकाने विचारले, राहुल आधी का नाही सांगितले, बालवाडीवाल्यांना जाब विचारला असता. राहुल उतरला, आई, तिथली दीदी  म्हणाली, तुझ्या आई-बाबांना सांगू नको, नाही तर ते तुला इथे खेळायला येऊ देणार नाही. आई मला गाडी चालवायला आवडते. आता मोनिका का काय बोलणार. तिला सिनेमा बघायचा होता, मौज करायची होती म्हणून तिने मुलांना खेळाचे लालच दिले होते.????? 


टिप: पात्र कळले तर गूढ  हि कळेल.