Sunday, October 25, 2015

नागाला दुध पाजण्याची, आहे आपली रिती




शत्रूच्या गोळ्यांनी
शहीद  सैनिक किती.

ओघळणाऱ्या रक्ताची 
किंमत शाई पेक्षा कमी.

कसुरी नागाने 
विष ओकले  किती.
दही -दुधाच्या नवैद्य
आनंदी दाखविला जी. 

शिवबाची लेकुरो हो
कशाला करता राडा 
गुलाम संगीत ऐकुनी 
ताल धरा हो त्यावरी.

एका गालावर चापटी 
दुसरा गाल पुढती 
नागाला दुध पाजण्याची 
आहे आपली  रिती.


Monday, October 19, 2015

श्रीरामाचा मित्र - भद्र - रामायणातले एक महत्वपूर्ण पात्र




वाल्मिकी रामायणातल्या उत्तरकांड मधील ४३व्या सर्गात श्रीरामांची त्यांच्या मित्रांसोबत होणार्या चर्चेचे वर्णन आहे. त्यात श्रीरामांचा मित्र भद्र सीता विषयी प्रजेचे मत बेधडकपणे श्रीरामांसमोर मांडतो. आपल्या मित्राचे बोलणे ऐकून श्रीरामाला आपल्या प्रिय पत्नी सीतेचा त्याग करावा लागला. रामकथेला कलाटणी देण्यात भद्राचे महत्वपूर्ण स्थान असूनही, अधिकांश लोकांना  भद्राचे नाव माहित नाही. 

म्हणतात न, राजाला मित्र नसतात. राजा अवतीभोवती वावरतात फक्त, चाटुकार, चारण, भाट आणि विदूषक. राजावर स्तुतिसुमने उधळून, निरनिराळ्या क्लुप्त्या करून राजाला प्रसन्न करणे, हेच त्यांचे उद्दिष्ट. राजा प्रसन्न झाला तर त्यांना त्यांचे हित साध्य करता येते.  नेहमी राजाला रुचेल असेच त्यांचे वागणे असते.

श्रीरामाचीहि मित्रमंडळी होती. दिवसभराच्या राजकाजातून दमल्यावर श्रीरामहि आपल्या मित्रांसोबत हास्य, विनोद, परिहास करत काही काळ घालवीत होते.  विजय, मधुमत्त, काश्यप, मंगल, कुल, सुराजि, कालिय, सुमागध, दंतवक्त्र आणि  भद्र हि श्रीरामांच्या मित्रांची नावे. असेच एके दिवशी श्रीरामाने आपल्या मित्रांना विचारले, प्रजाजनांचे राजपरीवारा बाबत काय मत आहे?  त्यावर श्रीरामांचा मित्र भद्र म्हणाला, रावणावर आपण जो विजय मिळविला आहे, त्या बाबत बर्याच गोष्टींची चर्चा प्रजाजन करतात.

भद्राचे म्हणणे ऐकून श्रीराम म्हणाले, भद्र, न कचरता सांग, प्रजाजन माझ्या विषयी कोणकोणत्या गोष्टी शुभ बोलतात आणि कोणत्या गोष्टी अशुभ बोलतात. शुभ गोष्टींचे मी आचरण करीन आणि अशुभ गोष्टींच्या त्याग करीन.



एवमुक्तस्तु भद्रेण राघवो वाक्यमब्रवीत्
कथयस्व यथातत्त्वं सर्वं निरवशेषतः ll९ll

शुभाशुभानि वाक्यानि कान्याहुः पुरवासिनः 
श्रुत्वेदानीं शुभं कुर्यां न कुर्यामशुभानि च ll१०ll

भद्र म्हणाला राम, प्रजाजन म्हणतात, युद्धात रावणाला मारून श्रीराम  सीतेला आपल्या घरी घेऊन आले. प्रजेच्या मनात सीतेच्या चारित्रा विषयी  शंका आहे.  रावणाने बलपूर्वक सीतेचे हरण केले, तिला घेऊन लंकेत आला. अंत:पुरातील रम्य अश्या अशोक वनात तिला ठेवले. ती रावणाच्या अधीन राहिली. एवढे असूनही श्रीरामाने तिचा स्वीकार कसा काय केला? लोक प्रश्न विचारतात, आता आम्हालाही स्त्रियांचे असे वागणे स्वीकार करावे लागेल कारण प्रजा राजाचे अनुसरण करते.  भद्राचा म्हणण्याचा आशय स्पष्ट होता, विवाह नंतर ही स्त्रियांनी पर-पुरुषांशी संबंध ठेवले, तरी तिचा त्याग करता येणार नाही. ती श्रीरामांचे उदाहरण देईल. परिणाम समाजात व्यभिचार माजेल. विवाह संस्थेला अर्थच उरणार नाही.

भद्राचे मत ऐकताच श्रीरामांना धक्काच बसला. अत्यंत दुखी होऊन श्रीरामांनी आपल्या अन्य मित्रांना त्यांचे मत विचारले. आजचा काळ असता तर सर्वांनी एकजुटीने भद्राच्या म्हणण्याचा निषेध केला असता. पण ते श्रीरामांचे सच्चे मित्र होते, त्यांनी अत्यंत दीनवाणीमध्ये म्हंटले, भद्राचे कथन सत्य आहे. जड अंत:करणाने श्रीरामांनी आपल्या मित्रांना निरोप दिला. संपूर्णपणे विचारकरून श्रीरामांनी आपले कठोर कर्तव्य निश्चित केले. प्रजेच्या मनातल्या शंका दूर करण्याकरिता आपल्या प्रिय पत्नी सीतेचा त्याग केला.

जर त्या दिवशी, भद्राने प्रजेमध्ये सीतेविषयी चाललेल्या प्रवादांबाबत, चिक्कार शब्द ही उच्चारला नसता, तर श्रीरामांनी सीतेचा त्याग केला नसता. पण या साठी भद्राला खोटे बोलावे लागले असते. भद्र श्रीरामांचा खरा मित्र होता, खोटे बोलणे त्याला शक्य नव्हते.  आपल्या हृदयावर दगड ठेऊन भद्राने श्रीरामांना कटू सत्य सांगितले. रामकथेला एक वेगळे वळण लागले. 

Tuesday, October 13, 2015

वाल्मिकी रामायण - रामसेतुचे पूर्ण सत्य



[रामसेतु बाबत अनेक भ्रम पसरलेले आहे. लोकांमध्ये व्याप्त भ्रम दूर करण्यासाठी  वाल्मिकी रामायणानुसार श्री रामांनी समुद्रावर सेतु कसा बांधला त्याचे वर्णन].

वाल्मिकी हे ऋषी होते. त्यांनी तटस्थ राहून रामायणाचे लेखन केले होते. त्यांना असत्य लिहिण्याचे काही कारण नव्हते. श्री रामांची जीवन कथेचे वर्णन करताना, सत्य काय तेच निष्पक्ष पणे मांडले होते.

आपल्या सर्वांनाच माहित आहे. सेतु हा नदी, नाले ओलांडण्यासाठी बांधला जातो. सपाट जमिनीवर सेतु बांधला जात नाही.  रामसेतु बाबत अनेक भ्रम समाजात पसरले आहे. आपल्या इतिहासाला भाकड कथा मानणारे, डोळ्यांवर विशिष्ट चष्मा लावलेले तथाकथित विद्वान, ज्यांच्या मते  धनुषकोडी ते तलाईमन्नार (श्रीलंका)  यांच्या मध्ये असणार १८ मैल लांबीच्या समुद्रात लाखो वर्षांपूर्वी प्रकृती निर्मित एक भोगोलिक संरचना आहे. या संरचनेला अडम ब्रिज किंवा रामसेतु असे ही म्हणतात. या अतिविद्वानांच्या अनुसार श्रीरामाने कुठला हि पूल समुद्रावर बांधला नव्हता.  दुसरी कडे धुर सनातनी लोक म्हणतात. हाच तो सेतु आहे जो श्रीरामानी समुद्रावर बांधला होता.

(रामसेततुचे चित्र)




दोन्ही बाजूंचे म्हणणे सत्य आहे. पण ते पूर्ण सत्य नाही. मला तर वाटते अधिकांश लोकांनी वाल्मिकी रामायण वाचण्याचे कष्ट हि केले नसावे.  रामसेतुचे चित्र पाहिल्यावर सामान्य माणसाला हि सहज कळते कि या सेतुचा किमान ३०% टक्के भाग आजहि समुद्र पातळीच्या वर आहे५०-६० हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आजच्यापेक्षा बरीच खाली होती, त्यावेळी  हत्ती, बिबट्या सारखे जंगली जनावरेहि  भारतातून या प्राकृतिक संरचने वरून चालत जाऊन श्रीलंकेत पोहचले असतील.   काही भारतीय इतिहासकारांच्या मते रामायण हे ७५०० हजार वर्षांपूर्वी घडले होते. त्या वेळी समुद्र पातळी आज पेक्षा निदान २० फूट आणिक खाली असेल.   त्या वेळी या प्राकृतिक संरचनेचा ७०-७५% भाग टक्के भाग समुद्राच्या वर असेल. उथळ समुद्र असला तरीही कित्येक ठिकाणी समुद्राची खोली १०-१५ मीटर खोल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या परिस्थितीत प्रकृती निर्मित पुलावरून श्रीरामांच्या वानरसेनेला शस्त्र-अस्त्र आणि शिदोरी घेऊन श्रीलंकेला जाणे अशक्यच होते.    

आता विचार करू श्रीरामांची वानर सेना समुद्र तटावर पोहचली. २०-२५ हजारांचे सैन्य निश्चित असेल.  एवढ्या मोठ्या सैन्याला समुद्र पार करायचा असेल तर शेकडोंच्या संख्येने नौका निर्मित करावी लागली असती. त्यात पुष्कळ वेळ ही लागला असता. पण समुद्र उथळ आणि खडकाळ असल्यामुळे नावेतून  पार करणे एक अवघड कार्य होते. खालील चित्रावरून स्पष्ट आहे, आज ही समुद्र पार करताना नौका मार्ग (ferry)  रामसेतु पासून पर्याप्त दूर आहे.





आपल्या देशात आज हि दुर्गम भागातले ग्रामीण, पावसाळ्यात नदी किंवा नाल्यावरचा पूल वाहून गेल्यास,  नदी नाल्यांवर, लाकडाचे ओंडके टाकून कामचलाऊ  पूल तैयार  करतात.  त्याच प्रकारे श्रीरामांनीहि जंगलातील वृक्ष, लता, गवत, दगड-धोंडे वापरून एक कामचलाऊ पूल बांधण्याचा निश्चय केला. जेणे करून सैन्य समुद्र पार करू शकेल.  अश्या प्रकारचे  पूल बनविण्याचे तंत्र अवगत असलेल्या नील नावाच्या वानराने हे कार्य पूर्ण करण्याचा बीडा उचलला.


वाल्मिकी रामायणात युद्धकाण्डातल्या २२व्या सर्गात ५४-७३  या वीस श्लोकांत  समुद्रावर पूल बांधण्याचे वर्णन केले आहे. यात रामनाम लिहिले दगड पाण्यावर तरंगले असे काहीच लिहिलेले नाही. वाल्मिकी रामायणानुसार, सहस्त्रो वानर जंगलात गेले.  अर्जुन, बेल, अशोक,  साल, बांबू, नारळ, इत्यादी अनेक जातींचे वृक्ष मुळापासून किंवा कापून   समुद्र किनार्यावर  घेऊन आले.  या शिवाय गवत, लता इत्यादी सुद्धा.  बलिष्ठ वानर मोठ्या-मोठ्या शिळा आणि पर्वतांना उपटून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर  घेऊन आले.  किनार्यावर कोलाहल व्याप्त होता - कोणी वानर  माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता.   गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते. अश्या रीतीने केवळ पाच दिवसात वानरांनी हा पूल पूर्ण केला.  श्रीरामाच्या सैन्याने या सेतुवरून समुद्र पार केला म्हणून या सेतुला लोक रामसेतु म्हणून ओळखतात.

वृक्ष, लता आणि दगडांचा उपयोग करून वीस पंचवीस हजारच्या सैन्येला उथळ समुद्रावर रामसेतुचा निर्माण करणे सहज शक्य होते. हा पूल कामचलाऊ असल्यामुळे काही वर्षांतच नष्ट झाला असेल.  आजच्या घटकेला अर्थात ७५०० वर्षानंतर रामसेतुचे अवशेष सापडणे अशक्यच. पण हे मात्र निश्चित श्रीरामांनी समुद्रावर सेतु बांधला होता.  कालांतरानी श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन कवींनी आपापल्या परीने सेतु बांधण्याचे प्रसंग  रंगविले.  


टीप:  वाल्मिकी रामायणातील  सेतु बांधण्याचे कार्य कसे संपन्न  झाले, युद्ध कांडातील, २२व्या सर्गातील काही श्लोक:

ते नगान् नागसंकाशाः शाखामृगगणर्षभाः ।
बभञ्जुः पादपांस्तत्र प्रचकर्षुश्च सागरम् ॥ ५५ ॥

ते सालैश्चाश्वकर्णैश्च धवैर्वंशैश्च वानराः ।
कुटजैरर्जुनैस्तालैः तिलकैस्तिमिशैरपि ॥ ५६ ॥

बिल्वैश्च सप्तपर्णैश्च कर्णिकारैश्च पुष्पितैः ।
चूतैश्चाशोकवृक्षैश्च सागरं समपूरयन् ॥ ५७ ॥

हस्तिमात्रान् महाकायाः पाषाणांश्च महाबलाः ।
पर्वतांश्च समुत्पाट्य यंत्रैः परिवहन्ति च ॥ ६० ॥


संक्षिप्त अर्थ: विशाल वानर जंगलात केले. तेथे जाऊन त्यांनी साल, अर्जुन, साल, अशोक, बांबू, नारळ  इत्यादी अनेक मोठ्या मोठ्या वृक्षाना मुळासकट किंवा तोडून समुद्र किनार्यावर आणले.  हत्ती समान विशाल वानरांनी मोठे मोठे पाषाण तोडून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर आणले.

समुद्रं श्रोक्षोयामासुः निपतंतः समंततः ।
सूत्राण्यन्ये प्रगृह्णन्ति व्यायतं शतयोजनम् ॥ ६२ ॥

दण्डानन्ये प्रगृह्णन्ति विचिन्वन्ति तथा परे ।
वानरैः शतशस्तत्र रामस्याज्ञापुरःसरैः ॥ ६४ ॥

मेघाभैः पर्वताभैश्च तृणैः काष्ठैर्बबंधिरे ।
पुष्पिताग्रैश्च तरुभिः सेतुं बध्नन्ति वानराः ॥ ६५ ॥

संक्षिप्त अर्थ:कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. सर्वत्र कोलाहल होता. गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते.  इति





Saturday, October 10, 2015

लढा विपरीत परिस्थितीशी – एका कुत्र्याची गोष्ट


बाबा रामदेवांनी भ्रष्टाचार विरुद्ध लढा पुकारला, सरकार विरुद्ध एका रीतीने युद्धच पुकारले. याचे परिणामहि त्यांना भोगावे लागले. सर्व सरकारी यंत्रणा हात धुऊन पतंजलीच्या मागे पडली. विभिन्न सरकारी विभागांच्या शेकडोंच्या संख्येने नोटीसा, कोर्ट केसेस, इतकेच नव्हे तर अनेक वेळा पतंजलीचे अकाऊंट सुद्धा सीज केल्या गेले. आज एका वाहिनी वर एका कार्यक्रमात, एका पत्रकाराने आचार्य बाळकृष्ण यांना विचारले, त्या वेळच्या विपरीत परिस्थितीतहि पतंजलीची ‘दिन दुनी रात चौगुनी’ उन्नति कशी झाली. याचे रहस्य काय?

आचार्य म्हणाले तुम्हाला एका कुत्र्याची गोष्ट सांगतो. फार पूर्वी इंद्रप्रस्थ नगरीत एक कुत्रा  रहात होता. त्याची इच्छा हरिद्वार येथे जाऊन गंगेत स्नान करायची होती. त्यांनी आपली इच्छा आपल्या बायकोला बोलून दाखविली. त्याच्या बायकोनेहि त्याला सहर्ष हरिद्वारला जाण्याची परवानगी दिली. हरिद्वार इंद्रप्रस्थ पासून २५० किमी दूर आहे. जायला ३ दिवस आणि यायला ३ दिवस असे किमान सहा दिवस लागणार होते. सोबत सहा दिवसाची शिदोरी आपल्या गळ्यात टांगून त्या कुत्र्याने दुसर्या दिवशी सूर्य उजाडताच हरिद्वारच्या दिशेने प्रयाण केले.

आपल्या सर्वांना माहित आहे, प्रत्येक कुत्र्याचा एक इलाका असतो. आपल्या इलाक्यात कुणा दुसर्या टोळीच्या कुत्र्याला तो प्रवेश करू देत नाही. जसे त्या कुत्र्याने आपला इलाका ओलांडला आणि दुसर्या कुंत्र्यांच्या इलाक्यात प्रवेश केला. तेथील कुत्रे त्याच्या मागे लागले.  त्या कुत्र्या समोर एकच प्रश्न होता, परत फिरावे कि हरिद्वारच्या दिशेने यात्रा सुरु ठेवावी. कुत्र्याने पुढे जाण्याच्या दृढनिश्चय केला.  जीव मुठीत घेऊन दुसर्या कुत्र्यांना  चुकवत तो हरिद्वारच्या दिशेने धावत सुटला. धावत धावत   तो तिसर्या कुत्र्यांच्या इलाक्यात पोहचला, तेथील कुत्रे हि त्याच्या मागे धावले. अश्या रीतीने अनेक इलाक्यांच्या कुत्र्यांना चुकवत, धावत-धावत, तो ३ तासातच हरिद्वारला जाऊन पोहचला आणि गंगेत उडी टाकली.  गंगेत स्नान केल्यावर पाहतो तर काय, तेथील कुत्रे त्याच्या स्वागतास सज्ज होते. पुन्हा सर्वशक्तीनिशी तो इंद्र्प्रस्थच्या दिशेने धावत सुटला. सर्यास्तापूर्वीच तो घरी देखील पोहचला. त्याच्या बायकोने त्याला विचारले, स्वामी तुम्ही हरिद्वारला जाणार होता, अजून येथेच कसे? तो म्हणाला, मी हरिद्वारला जाऊन सुद्धा आलो. तिच्या संतुष्टीसाठी सोबत आणलेले गंगाजळहि तिला दाखविले. कुत्र्यांच्या मेहरबानीने त्याने सहा दिवसांचा प्रवास एकाच दिवसात पूर्ण केला.

जशी मदत दुसर्या कुत्र्यांनी ६ दिवसांचा प्रवास एका दिवसात पूर्ण करण्यास त्या कुत्र्याला मदत केली तसेच सरकारच्या मेहरबानी(?) मुळे पतंजलीचे उत्पाद घरा-घरात पोहचले.

Saturday, October 3, 2015

पराजित योद्धा

 

अपराजित जगज्जेता  
पकडले त्याने काळाला.
 दंभ अमरतेचा
विजयी गुंगीचा.


कळलेच नाही त्याला
काळ कसा निसटला 
सूर्यास्त कसा  झाला.

अखेर
हात रिक्तच राहिले
  पराजित योद्धाचे.




नेता

Thursday, October 1, 2015

प्रेमाचा वर्षाव


व्याकूळ चातक  
विरही मीरा 
दग्ध धरती 
भूक बळीची

आसुसलेल्या 
डोळ्यांना
एकच आस 
प्रेमाचा वर्षाव.