Sunday, May 31, 2015

नदीचे भविष्य


 पूर्वी पाणी असलेल्या नद्या आज कोरड्या झालेल्या आहेत. एवढेच काय अनेक महाकवी कालिदास यांना आवडणारी क्षिप्रा नदीचे पात्र ही कोरडे पडले आहे. नर्मदेच्या पाण्यामुळे ती कशीतरी श्वास तरी घेते आहे.  पण गावाकडच्या  अनेक लहान लहान नद्या केंव्हाच दिवंगत झाल्या आहेत  किंवा नाल्याच्या स्वरूपात वाहतात आहे. उदा: नागपूरची नाग नदी (लोक या नदीला नालाच म्हणतात).


हिमाच्छादित मुकुट माझा 
वितळून गेला केंव्हाच

हिरवे वस्त्र जरतारी
जीर्णशीर्ण झाले आज. 

गोड पाण्याचा भंडार
उदरात नाही आज.  

हे समुद्राकांशी नदी 
नाही मजजवळ जीवन प्रवाह.
विरून जावे लागेल तुला 
मनुष्यकृत वाळवंटात



गुरं-ढोरं पुरात गेली वाहून
पीक सगलं खलास झालं
पुढे वाचण्यासाठी ....

वरुण राजाला साकडं





 




Saturday, May 30, 2015

जंगल पूर्वीचे आज महानगर झाले

जंगल  पूर्वीचे 
आज महानगर झाले 
पहिल्या पेक्षा जास्त 
खतरनाक झाले. 


भरल्या पोटी वाघ 
करत नव्हता शिकार. 
बेधुंध कार आज 
कधीही घेते प्राण. 

तेंव्हा दरवळत होता 
सुगंध मलयज गिरीचा.
पेट्रोलच्या वासाने आज 
कासावीस होतो प्राण.

कांव कांव कावळ्यांचे
घरटे उंच मीनारांवर
अंगणातली चिवताई 
कुठे हरवली आज.

***
रेशमी कोशात शोधले
मधाचे मोहोळ त्याने ......
पुढे वाचण्या साठी 

ऐसेच जीवन जगते

 



Thursday, May 28, 2015

गूढ कथा: अक्कल दाढ

 
(काल्पनिक कथा)

काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट फाईल वाचत होतो. फाईल वाचताना दाढ दुखत आहे, असे वाटू लागले.  काही वेळातच  दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर डोक्यात वेदनाही. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. . दाढेच्या दुखण्यामुळे रात्री व्यवस्थित जेवता ही आले नाही. गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली. 

सकाळी उठून ओळखीच्या दातांच्या डॉक्टरकडे गेलो. पेशंटसाठी असलेल्या खुर्ची वर बसलो. डॉक्टरांनी दात तपासले आणि लगेच  निर्णय ही सुनावला. दाढेला किडा लागला आहे, दाढ काढावी लागेल. मी विचारले, डॉक्टर, दाढ न काढता, किड्याचा इलाज करता येईल का? डॉक्टर मिस्कील पणे हसले आणि म्हणाले, तुमच्या दाढेला साधा-सुद्धा नाही, जीव घेऊ अकलेचा किडा लागला आहे. त्वरित नाही काढला तर हा किडा मेंदूत शिरेल. तिथे जाऊन अकलेचे तारे तोडेल. त्याच्या परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. तुमच्या पांढर्या शुभ्र वस्त्रांवर चिखलाचे डाग दिसू लागतील. काही दिवसांतच तुमचा चेहरा ही काळा ठिक्कर पडेल. अवेळी सरकारी सेवेतून निवृत्त व्हावे लागेल. पेन्शन ही मिळणार नाही. मुले ही तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवतील. भिक्षा मागत दारी-दारी फिरावे लागेल. माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले, खरोखरंच असेल घडले तर? ओम भिक्षां देही शब्द कानात घुमू लागले. घाबरून मी जवळपास ओरडलोच, डॉक्टर, काढून टाका ती दाढ, अकलेच्या किड्या सकट. डॉक्टरांनी दाढेला सुन्न करण्यासाठी इंजेक्शन दिले आणि पकडीने एका झटक्यात दाढ उपटली. दाढ निघाल्यावर दुखणे ही थांबले. शरीर आणि मन शांत झाले. कार्यालयात पोहचल्यावर ती फाईल लाल फितीत व्यवस्थित बांधून अलमिरात ठेऊन दिली. संध्याकाळी घरी आल्यावर मस्त पैकी थंडगार पाण्याने स्नान केले. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून, आरश्यासमोर उभा राहिलो.  आरश्यात मला माझा चेहरा काळा ठिक्कर पडलेला का दिसत होता, हे मात्र मला समजले नाही. 
 

Saturday, May 23, 2015

विरहणी आणि वीज


उन्हाळ्यात सर्वांच्या अंगांची लाही लाही होऊ लागते, त्यात  विरहाने व्याकूळ विरहणीची दशा काय झाली, कल्पनाच करणे अशक्य.  १०० डिग्री सेंटीग्रेड तापलेल्या या विरहणीच्या शरीराचा काय बरा उपयोग  होऊ शकतो, अशी खट्याळ कल्पना मनात आली.


विरहणीच्या डोक्स्यावरी 
मी पाण्याची धार धरली 
वाफेचा उसळत्या डोंबावरी 
चालविला जनरेटर  भारी
अशी म्या वीज वाचविली.

ज्ञानियाचा पाठीवर 
भाजली होती पोळी 
विरहणीच्या पाठीवर 
मी *पिज्जा बेक केला. 
अशी म्या वीज वाचवली.

(* युग बदलले आता पोळीच्या जागी पिज्जा)

पण कधी कधी असे ही होऊ शकते 

विरहणीच्या अंगाला 
मजनूने हात लावला 
करंट ४४० लागला 
मजनू  खलास  झाला. 

सरडा आणि इतर क्षणिका

 

Sunday, May 17, 2015

एक उनाड उन्हाळी दिवस - सीपीचा सेन्ट्रल पार्क आणि अमलतास



मे आणि जून  ह्या दोन महिन्यात सूर्य क्रोधाने लाल होऊन आग ओकीत असतो. या आगीत जिथे धरणी माताच होरपळून जाते, तिथे पृथ्वीवरील प्राण्याची काय बिसात.  दिल्लीत रस्त्यावर फिरणार्या आवारा गायी व कुत्रे  दिवसभर सूर्याच्या क्रोधापासून स्वत:ला वाचविण्यासाठी सावली आणि पाण्याच्या शोधात भटकत राहतात. दुपारच्या वेळी तर झाडावर पक्षी ही झाडाच्या कोटरात दुबकून राहतात. 

दुपारचे तीन वाजले होते, सीपीच्या मेट्रो स्टेशनहून  बाहेर पडलो.  सीपीच्या सेन्ट्रल पार्कमध्ये भरपूर हिरवळ आहे.  झाडे- झुडपे ही पुष्कळ आहेत.  पार्कच्या जवळून जाताना नेहमीच झाडावर असलेल्या  पक्ष्यांची किलबिल ऐकू येथे. तर दुसरीकडे त्यांच्या खाली भारी संख्येने बसलेल्या  प्रेमी जोड्यांची गुटरगूं ही ऐकू येते. पण आज पार्कमध्ये स्मशान शांतता पसरलेली होती. सिनेमातला खलनायक जास्तीसजास्त तीन एक तास नायक- नायिकेला एका दुसर्यापासून दूर ठेवतो. पण क्रोधाने भडकलेला सूर्यदेव तर तब्बल दोन महिन्यांसाठी प्रेमी-प्रेमिकांना विरहव्यथा भोगण्यास विवश करतो. मनात विचार आला, दोन महिन्याचा विरह आजच्या इनस्टेन्ट जमान्यातल्या प्रेमी-प्रेमिकांवर भारीच पडणार. या अवधीत कदाचित् कित्येकांना आपल्या प्रियकराचा विसरही ही पडत असेल. अचानक  डोक्यावर एक पिवळे धम्म फुल पडले. वर बघितले, ऐन उन्हाळ्यात ही अमलतास बहरलेले होते. असे पिवळ्या धम्म फुलांनी नटलेले अमलतास पाहून 'फिर छिड़ी रात बात फूलों की रात है या बरात फूलों की' हे गाणे आठवले. पण  इथे तर 'जेठ कि दुपहरिया में बात फूलों की,  प्यार की बात, बात फूलों की'.  मी सहजच  अमलतासला विचारले,  सूर्याच्या  तेजाने समस्त धरती होरपळून गेली आहे. वेली आणि झाडे सुकून कांतिहीन झालेली आहे. तू मात्र प्रफुल्लित आणि आनंदी दिसत आहे. या प्रचंड उन्हाळ्यात ही वसंताचा आनंद उधळीत आहे. क्या बात है. अमलतास खळखळून हसला. फुलांचा वर्षाव माझ्या अंगावर झाला, तो म्हणाला वासंतिक प्रेमाला अजूनही मी आपल्या हृदयात जपून ठेवले आहे. विरह माझ्या जवळ फटकत ही नाही.  पहा कोकिळा आज ही माझ्या फांदीवर बसून प्रेमाचे गाणे म्हणते आहे

खरंच, ज्याचे हृदय प्रेमानी भरलेले आहे. तो विरहात  ही प्रफुल्लित आणि आनंदी राहतो.  मनात विचार आला, या सेन्ट्रल पार्कमध्ये प्रेमाच्या हितगुज करण्यार्या प्रेमी जोडप्यांनी  दोन महिने आपले प्रेम जपून ठेवले तर  वर्षा ऋतूत  त्यांच्या प्रेमाला  पुन्हा नवे अंकुर फुटतील. अमलतास प्रमाणे त्यांचे प्रेम ही बहरेल. आपल्या मनात चाललेल्या या विचारांचे माझे मलाच हसू आले. सहज आकाशाकडे बघितले, क्रोधाने आग ओकणारा सूर्यदेव आता निस्तेज आणि तेजहीन दिसत होता. सूर्य तोच होता, तीच प्रचंड विरहाची आग, पण पाहण्याचा दृष्टीकोन बदलला किती फरक पडतो.   

सिनेमाचे गाणे आठवण्याचा प्रयत्न करत पुढे चालू लागलो.


Thursday, May 14, 2015

एक आठवण - गोटू आणि क्रिकेटचा चेंडू


तेंव्हा माझे वय १२ वर्षांचे असेल.   अर्थात थोडा मोठा झालो होतो.   खेळायला मित्रांसोबत गल्लीच्या बाहेर जाऊ लागलो. जुन्या दिल्लीत आमचे खेळायचे ठिकाण म्हणजे मोरीगेटच्या बाहेर यमुने पर्यंत पसरलेले विस्तीर्ण बगीचे.  मोरीगेटच्या बाहेरच क्रिकेट खेळण्यासाठी एक मोठे मैदान होते.  मैदानाच एक भाग स्टीफन कॉलेजचा होता.  म्हणून त्या मैदानाला लोक  स्टीफन ग्राउंड म्हणून  ओळखायचे. सुट्टींच्या दिवसांत   २५-३० क्रिकेट टीम मैदानात खेळत असे. एवढ्या भीड-भा मध्ये कोणत्या क्षणी डोक्स्यावर कुठून चेंडू येऊन लागेल याची  कल्पना करणे ही शक्य नव्हते.  आम्ही ५-६  मराठी मुले, काही मोहल्यातली आणि  दोन-चार मुस्लीम मुले ही येऊन जाऊन आमच्या टीम मध्ये मध्ये खेळत असे. सर्वच गरीब किंवा निम्न मध्यमवर्गीय असल्यामुळे प्रत्येकी १०-२० पैशे गोळा करून खेळण्यासाठी २-३ रुपये जमवून काॅर्कचा  चेंडू विकत घ्यायचो.   त्या वेळी क्रिकेटचा चेंडू १-१४ रुपयांना मिळत असे.    श्रीमंत मुलांचे पांढरे शुभ्र वस्त्र, चांगल्या दर्जाच्या बेट्स आणि त्याहून वेगळे म्हणजे ते क्रिकेटच्या चेंडूने क्रिकेट खेळायचे. त्यांना  पाहून आम्हाला इर्षा होणे साहजिकच होते. क्रिकेटच्या चेंडूने खेळण्याची आपली इच्छा कधी पूर्ण होईल हे वाटत नव्हते.  

एक दिवस असाच मैदानात गोटू भेटला.  माझ्याच वयाच्या असेल.  त्याच्या जवळ क्रिकेटचे २-३ चेंडू होते. त्याने आणलेल्या  चेंडूंचा दर्जा पहून आम्हाला ही राहवले नाही. त्याला सहज विचारले, कितीला देतो.  १ रूपये से ५ रूपये तक की गेंद अपने पास है. लेना है तो बोलो.  माझ्या मित्राला शंका आली त्याने विचारले, कहाँ से लाते हो इतनी सस्ती  गेंदे. तो ऐटीत म्हणाला, अपनी जानपहचान है, DDCA में(Delhi District Criket Association).  DDCAवाले मेच संपल्यावर जुने चेंडू  ओळखीच्या लोकांना स्वस्तात विकतात. काही चेंडू तर एक-दोन ओवर जुने सुध्दा असतात. असे चेंडू तो डझनच्या भावाने  विकत घेतो.  २-४ ओवर जुना, अर्थात नवीन चेंडू  3-4 रुपयांना विकतो. थोडे जुने चेंडू असेल तर मिळेल त्या किमतीला अर्थात १-२ रुपयांना.  अर्थातच आम्ही ही कधी १ रुपया तर कधी दीड आणि अगदी नवा कोरा चेंडू असेल तर ३ रुपये देऊन ही  त्याच्या कडून क्रिकेटचे चेंडू विकत घेऊ लागलो. गोटू क्रिकेट ही चांगला खेळायचा, कधी-कधी सकाळच्या वेळी तो आमच्या सोबत ही खेळत असे. २-३ दिवसांनी कळले गोटू हे त्याचे टोपण नाव होते. खरे नाव असलम  होते. तो   बल्लीमारान या भागात राहायचा.

शाळेला हिवाळ्याच्या सुट्या लागल्या, गोटूने   वादा करून ही चेंडू आणून दिला नाही.  नंतर कळले आमच्या साठी आणलेला  चेंडू त्याने २ रुपयांना दुसर्या टीमला  विकला होता.  या वर माझ्या मित्राने त्याला जोरदार झाडले.  अखेर त्याने सांगितले आज सकाळी ११ वाजता तो फिरोजशाह कोटला येथे  जाणार आहे.  चेंडू भेटले तर उद्या सकाळी चेंडू आणून देईल.  आमचा त्याच्यावर विश्वास बसला नाही. मी आणि माझ्या मित्राने ठरविले आपण ही तिचे जाऊ, पाहू कुणा कडून हा चेंडू विकत घेतो. एकदा कळले कि आपल्याला ही त्या माणसाकडून थेट थोक मध्ये चेंडू विकत घेता येतील. आपण ही चेंडू विकून पैसा कमवू.  सकाळी ११च्या सुमारास मी आणि माझा मित्र पायी-पायी चालत दिल्लीगेट वर पोहचलो. पूर्वी फिरोजशाह कोटला स्टेडियम आज सारखे मोठे नव्हते. एक रस्ता दिल्लीगेट हून राजघाट कडे जातो. एका बाजूला जुन्या दिल्लीची भिंत. भिंतीच्या मागे दरियागंज आणि  समोर बगीचा.  रस्त्याच्या दुसर्या बाजूला फुटबाल स्टेडियम, बस स्थानक आणि एक गल्ली सरळ  फिरोजशाह कोटला स्टेडियम कडे जाते. गल्ली आणि स्टेडियमच्या भिंती यांच्या मधल्या भागात एक लहानसे मैदान होते.   मैदानाच्या एका भागात अभ्यासासाठी काही नेट्स आणि मध्ये एक क्रिकेटची पिच होती. तिथे बहुतेक DDCAच्या लीग मचेस  व्हायच्या.  आम्ही तिथे पोहचलो तर बघितले, राजघाट कडे जाणारा रस्ता आणि स्टेडियम कडे जाणार्या गल्लीच्या टोकावर  गोटू बसलेला होता.  मैदानात क्रिकेटची मेच सुरु होती. आम्हाला पाहताच तो चाचपला. म्हणाला, धन्धेका राज जानने आये हो क्या? भरोसा नहीं है मुझपे.  मी म्हणालो, भरोसा असता तर इथे कशाला आलो असतो. बाकी तुझ्या धंद्यात आम्ही टांग नाही अडविणार. आम्हाला फक्त चेंडू पाहिजे. तो म्हणाला सध्या मच सुरु आहे, काही काळ इथे उन्हात बसावे लागेल. मी म्हणालो, इतक्या दुरून मच पाहाण्यापेक्षा  थोड पुढे झाडाखाली हिरवळीवर बसू. खेळ व्यवस्थित बघता येइल.  तो फक्त हसला आणि म्हणाला, अब आ ही गये हो तो चुपचाप यहाँ बैठो और तमाशा देखो.  आम्ही ही त्याच्या सोबत चुपचाप बसलो. थोड्याच वेळाने, फलंदाजाने एक जोरदार फटका मारला आमच्या दिशेने चेंडू वेगात उसळी मारून रस्त्यावर  आला. गोटू जणू काही याच क्षणाची वाट पाहत होता. त्याने धावत जाऊन चेंडू उचलला आणि जोरात ओरडला, भागो, भागो. काही क्षण आम्हाला काहीच समजले नाही, पण त्याला रोड  पार करून पळताना बघितले  आणि आम्ही ही त्याच्या मागोमाग धूम ठोकली.  भिंती समोर असलेल्या बगीच्यात ही बरीच मुले क्रिकेट खेळत होती.  त्यांची परवा न करता पळत-पळत आम्ही भिंतीत असलेल्या लहानश्या भेगेतून  आत  शिरलो आणि सुटकेचा निश्वास टाकला. गोटू आम्हाला पाहत हसत म्हणाला, क्यों मजा आया ना. अबे बेवकूफों की तरह क्यों बैठे रहे. थोड़ी और देर हो जाती तो,पकडे जाते. बहुत मार पड़ती है. कभी कभी तो पुलिस को  भी सौंप देते हैं. जान हथेली पर रख कर गेंद जुटता हूँ तुम्हारे लिए. फिर भी भरोसा नहीं करते हो. मनात विचार आला, पकडल्या गेलो असतो तर....  आपली काही  चुकी नसताना ही भरपूर मार खावा लागला  असता.   घरी जर हा प्रकार कळला असता तर.  त्याची कल्पनाच करणेच अशक्य होते. क्रिकेट खेळणे तर बंद झाले असते, हे निश्चित.  थोड्या वेळाने,  मी गोटूला विचारले एवढा धोका पत्करून तू चेंडू चोरून आणून विकतो. मिळालेल्या पैश्याचे तू काय करतो. काही क्षण तो माझ्या कडे बघत राहिला, त्याचे डोळे पाणावले, तो म्हणाला घर पर   मुझसे छोटे दो भाई और एक बहन भी है. दो साल पहिले  मेरी माँ गुजर गयी, बाप ने दूसरी शादी की है.  त्याचा बाप संध्याकाळी साप्ताहिक बाजारांमध्ये भाजीची रेडी लावतो.  तो बापाला त्याच्या कामात मदत करतो.  पण बापाची नजर भारी. तो  त्याला  एक छदाम ही कधी देत नाही.   घरी सावत्र आई त्याच्या लहान  भावंडानां धड खायला ही देत नाही.  बापाला काही म्हंटले तर तो त्यांच्या वरच ओरडतो. कधी-कधी हात ही उगारतो.   या जान जोखिम मध्ये टाकून मिळवलेल्या  पैश्यानी तो लहान भावंडाना सावत्र आईच्या न कळत  खायला आणून देतो.  पुढे काय बोलावे, हे त्या वयात मला कळणे शक्य नव्हते. मुकाट्याने मी आपल्या घराकडे निघालो. जाताना त्याला आजची  घटना कुणाला ही सांगणार नाही याचे वचन दिले.  त्या  हिवाळी   सुट्ट्यात  आम्ही त्याला दिलेले वचन पाळले ही. पुढे  उन्हाळी  सुट्ट्यात तो आम्हाला मोरीगेटच्या मैदानात चेंडू विकताना दिसला नाही.  

या वर्षीचे  आय पी एलचा मेच पाहत असताना, कुणास ठाऊक,  तब्बल ४२ वर्षांनतर त्याची  आठवण आली.   काय करत असेल तो. ...


आजचा कवी

Friday, May 8, 2015

एक दिवसाची गोष्ट - सोनेरी किरणे

  नांगल ते धौला कुआँ या ५ किमी रस्त्याच्या दोन्ही बाजूला कडू लिंबाची झाडे आहेत.  अधिकांश झाडे फार जुनी अर्थात अंग्रेजांच्या काळातील असतील.  काल रात्री वादळ आणि पाऊस आला होता.  अश्या वादळी पाऊसात जुनी झाडे नेहमीच पडतात.  संध्याकाळी कार्यालयातून परतताना, चार्टर  बस  क्रिबीपेलेसच्या लाल बत्ती वर थांबली. खिडकीतून बाहेर पाहिले रस्त्याच्या  बाजूला एक  वाळलेले, पोखरलेले  झाडाचे खोड पडलेले होते.  बहुतेक काल रात्रीच्या वादळात कोलमडून  पडले असावे.  गेल एकदाच हे  ही झाड म्हणत मी हळहळलो. गेल्या ३० वर्षांपसून मी या रस्त्यावरून जात आहे, पूर्वी  हे झाड हिरवेगार होते. संध्याकाळी कार्यालयातून परतताना, लाल बत्ती वर चार्टर बस थांबली कि कित्येक बाबू खिडकीतून हात लांब करून, झाडाच्या लहान-लहान फांद्या तोडण्याचा प्रयत्न करायचे.  काही चक्क बस वर चढून, फांद्या तोडायला कमी करायचे नाही.  अर्थातच, दातून साठी.  बस थांबली असताना पक्ष्यांची किलबिल ही ऐकू यायची.  पण वेळ सदा एक सारखा राहत नाही, काही वर्षांपूर्वी झाडाला वाळवी लागली. वाळवीने झाड पोखरून टाकले. एक-एक करून फांद्या गळून पडल्या.  संसारापासून अलिप्त तपस्वी सारखे दिसायचे ते सुकलेले झाडाचे खोड.   आज ते ही गेल. अचानक लक्ष्य त्याच जागेवर दीड-दोन फुट उंच एक कडू  लिंबाच्या लहानश्या रोपट्याकडे गेले.  अरेच्या हे कुठून आले, एका दिवसात रोपटे एवढे वाढत नाही.  काही महिन्याचे हे निश्चित असेल.  झाडाच्या सावलीत वाढणाऱ्या या रोपट्या कडे आपले लक्ष कसे  गेले नाही.  झाड गेल्याचे दुख कुठच्या कुठे पळाले.    काही वर्षात ह्या रोपट्याचे ही मोठे झाड होईल.  एक मोठ्या बहरलेल्या झाडाचे चित्र डोळ्यांसमोर तरळले.   आनंदाने युरेका-युरेका म्हणत जोरात ओरडायचे  वाटले.  पण काय करणार, सभ्यतेच्या बुरख्यात राहणार्यांना, आनंद ही मोठ्याने ओरडून व्यक्त करता येत नाही.


जीवन पार्कच्या स्थानकावर बस थांबली,  बस मधून उतरून घराकडे पायी चालत जाऊ लागलो.  एका गल्लीत घराबाहेर खाटेवर एक म्हातारी झोपलेली दिसायची. आजकाल तिच्या सोबत दीड-दोन वर्षाची एक चुणचुणीत पिटुकली, बहुतेक तिची नात असावी  सोबत खेळताना दिसायची.  कालचीच गोष्ट,  त्या गल्लीतून जाताना, ती पिटुकली आपल्या हातातले बिस्कीट  म्हातारीला दाखवत म्हणत होती,  दादी, आप भी लों ना चीजी (खाऊ).  तिची दादी प्रेमाने तिच्या डोक्यावर फिरवीत म्हणाली, आपने खा लिया न, समझो मेरा पेट भर गया.  अचानक पिटुकलीचे   लक्ष्य माझ्या कडे गेले,  हातानी बिस्कीट उंचावत आनंदाने ती म्हणाली, चीजी (खाऊ) आणि  दुडदुड धावत धावत घरात गेली.  मला हसूच आले, म्हातारीकडे पहिले. अस्ताचलच्या सूर्याचे सोनेरी किरणे तिच्या चेहऱ्यावर  पसरली होती.  तिचे डोळे बंद  होते.   तिचा चेहरा संतुष्ट, शांत आणि आनंदी दिसत होता.  काही क्षण मी तिला पाहतच राहिलो.  अचानक एका आवाजाने तंद्रा भंग झाली. अंकल क्या हुआ, एका दहा एक वर्षाच्या मुलाने विचारले. कुछ नहीं,  म्हणत मी तिथून पाय काढला.  आज त्या गल्लीतून जाताना  सदानकदा  घरा बाहेर असलेली खाट दिसत नव्हती. त्या जागी  घरा बाहेर  एका सतरंजीवर  पांढऱ्या  वस्त्रात आणि पडलेले चेहरे करून लोक बसलेले दिसले.  काय झाले असावे मला याची कल्पना आली.   पण घरात काय घडले  याची कल्पना इवल्याश्या पिटुकलीला कशी असणार. ती नेहमीप्रमाणे हातात बिस्कीट घेऊन इकडे तिकडे दुडदुड धावत होती.  तिचे लक्ष्य माझ्याकडे गेले, हातातले बिस्कीट दाखवत म्हणाली, अंकल, चीजी लोगे,  मला राहवले नाही, तिच्या डोक्यावरून हात फिरवित म्हणालो, आप के लिये है चीजी, आप ही खाओ.  तेवढ्यात तिची आई बाहेर आली,  तिने तिला उचलले आणि   घरात नेले. मी पुढे निघालो.  न जाणे का,  डोळे  पाण्याने डबडबले. डोळ्यावरून चष्मा काढला आणि रुमालाने  डोळे पुसले. सहज वर आकाशात बघितले, अस्ताचालच्या सूर्याचे सोनेरी किरणे सर्वत्र पसरली होती.  मनात म्हंटले, उद्या उगविणाऱ्या सूर्याची किरणे ही सोनेरीच असणार.  संहार आणि सृजनाची दोन्हीची साक्षी ही सोनेरी किरणे.    


निळे फुलपाखरू - घरात घडलेली सत्य घटना





Monday, May 4, 2015

एक आठवण - उन्हाळ्याच्या तो दिवस

गेल्या १०-१२ वर्षांपासून दिल्लीत ही नागपूर सारखा उन्हाळा पडू लागला आहे. मे महिन्यातच तापमान ४५ अंशापर्यंत जाते. सोफ्यावर बसून विजय वर्तमान पत्र वाचत होता, लू लागून मरणार्यांच्या आंकड्यांवर त्याची नजर गेली. वाचता-वाचता, अतुलचा चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर तरळला. पाच वर्षांपूर्वीचीच मे महिन्यात असाच उन्हाळा होता. आकाशात सर्वत्र पसरलेली राजस्थान मधून येणारी लाल धूळ आणि प्रचंड गरम वारे, दिवसाकाठी घर बाहेर निघणे दुष्कर होते.  

त्या दिवशी शनिवार होता, विजय काही कामानिमित्त, आर के पुरम येथे स्थित भिकाजीकामा पेलेस येथे गेला होता.  काम संपवून, दीड एक वाजेच्या सुमारास बस घेण्यासाठी तो बस स्थानकावर आला. बाहेर प्रचंड तापलेले होते, जोराचे गरम वारे ही चालत होते. तेवढ्यात विजयला अतुल पायी-पायी येताना दिसला. अतुल, विजयचा लंगोटी यार होता.  दोघांचे बालपण जुन्या दिल्लीत गेले होते. दोघांचे शिक्षण ही एकाच शाळेत झालेले. पुढे विजय सरकारी नौकरीत लागला आणि अतुल एका कंपनीत सेल्समन. त्याला कामानिम्मित बाहेर हिंडावे-फिरावे लागायचे. तरी महिन्याकाठी ते एक दोनदा तरी ते भेटायचेच. कुठले ही काम एका दुसर्याचा सल्ला घेतल्याशिवाय ते करायचे नहीं. सात-आठ महिन्यापूर्वी अतुलचे लग्न झाले होते. बायको मुंबईकर होती. लग्नानंतर घरी पटले नाही, म्हणून बायको सोबत जनकपुरी येथे भाड्याच्या फ्लेट घेऊन वेगळा राहू लागला होता. त्याला पाहताच विजयने विचारले, कुठून  येतो आहे. अतुल म्हणाला, सेक्टर १२ पासून येतो आहे, इथे भिकाजी कामात काही काम आहे.  विजय ने विचारले, अतुल, बस का नाही घेतली. अतुल, एक-दीड किलोमीटर अंतर साठी बस काय घ्यायची. जेवढा वेळ बसची वाट पहावी लागणार, तेवढ्या वेळात तर आपण पायी पोहोचतो सुद्धा. विजय, अरे ते ठीक आहे, पण उघड्या डोक्स्यानी का फिरतो आहे,  डोक्स्यावर काहीतरी घालायला पाहिजे होते, उगाच लू लागेल. अतुल हसत म्हणाला, यार, माझ्या कामात उन्हातान्हात फिरावेच लागते. आता उन्हाची सवय झाली आहे. लू काय बिगाडेल आपल्या सारख्यांचे.  विजयला त्याच्या बोलण्याचा रागच आला, दिवसाचे दीड वाजले आहे,  बाहेर भयंकर तापलेले आहे, प्रचंड गरम वारे चालत आहे आणि या गाढवाला त्याची काही फिक्र नाही, कमीत-कमी रुमाल तरी त्याने डोक्यावर बांधायचा होता. तो रागातच म्हणाला, लेका गाढवा तुझ्या लग्नाला वर्ष  ही झाले नाही आहे, कशाला वर जाण्याचा खटाटोप करतो आहे. वहिनीचा तरी जरा विचार कर. असाच नंग्या डोक्स्याने उन्हातान्हात फिरेल तर, गाढवा तू लू लागून वर जाशील, तिथे वर गेल्या वर विचार यमराजाला, लू क्या बिगाडेगी. अतुल जोरात हसत म्हणाला, जिसके लंगोटिया यार मरने की दुआ देते हों, उसे दुश्मनों की क्या जरुरत. काळजी करू नको, तुझी इच्छा पूर्ण होणार नाही. तेवढ्यात उत्तम नगरची बस येताना दिसली, दोघांचे बोलणे तुटले,  अतुलला टाटा करून विजय घरी परतला.


 दुसर्या दिवशी अर्थात रविवारी सकाळचे सातचा वाजले असेल, फोनची घंटी वाजली. सकाळी-सकाळी कुणाचा फोन आला, हा विचार करत विजयने फोन उचलला. फोनवर दिनेश होता, तो म्हणाला, विजय, एक वाईट बातमी, काल रात्री अतुल गेला. विजय सुन्न झाला रिसीवर त्याच्या हातून खाली पडले, काही क्षण काय करावे त्याला सुचेनासे झाले, सर्वांग घामाने डबडबले. कालची भेट आठवली,  अतुलला आपण म्हटलेल डायलॉग गाढवा तू लू लागून वर जाशील  ही आठवला.


झाले असे होते, कामावरून अतुल चार वाजेच्या सुमारास घरी पोहचला. थोड्या तापासारखे वाटले म्हणून, चहा सोबत, PCMची गोळी घेतली आणि पलंगावर जाऊन झोपला. नवरा इतक्या उन्हात थकून भागून आला आहे. त्याल शांत झोपू द्या, हा विचार तिने केला. उन्हाळ्यात अचानक ताप येण्याचा अर्थ काय आणि ताप आल्यावर काय केले पाहिजे, त्या बिचार्या मुंबईकर नववधूला कळणे शक्य नव्हते. संध्याकाळी जनकपुरीतल्या शनी बाजारातून भाजी-पाला आणला. स्वैपाक केला. होता-होता रात्रीचे ९ वाजले, तरी ही नवरा का उठत नाही. तिच्या मनात पाल चुकचुकली. नवर्याला उठवायला ती बेडरूम मध्ये आली.  अतुल तापाने फणफणत होता. त्याची शुद्ध हरपली होती, ताप डोक्यात पोहचला होता.  ती घाबरली, रात्री अतुलला हॉस्पिटलमध्ये भर्ती केले.  पण तो वाचला नाही.


उन्हाळ्यात लू ने मरणार्यांच्या बातम्या वाचताना, विजयला नेहमीच अतुलची आठवण येते. अतुलची आठवण येताच, तोंडातून न कळत निघालेले, पण खरे ठरलेले शब्द गाढवा तू लू लागून वर जाशील, सतत कानांत वाजतात. अपराधीपणाची भावना त्याला जाणवते. त्या दिवशी जर त्याने तोंडावर ताबा ठेवला असता तर कदाचित्, अतुल आज ही जिवंत असता.....

Saturday, May 2, 2015

भाजणी आणि भाजणीचे थालीपीठ

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुले घरीच असतात.  वाढत्या मुलांना सतत काही न काही चरायला  आवडते.   उन्हाळ्यात आधीच भाज्या महाग. खायला काय करावे हा ही यक्षप्रश्न मध्यम वर्गीय परीवारांसमोर असतो.   भाजणी  ही पोष्टिक असते आणि तिच्या पासून स्वादिष्ट थालीपीठे ही तैयार करता येतात. वेळ ही कमी लागतो. त्या मुळे केंव्हा ही करता येतात. सकाळच्या नाश्त्याला ही भाजणीचे थालीपीठ हा एक उत्तम पर्याय आहे. स्वादिष्ट  थालीपीठे  मुले ही अत्यंत आवडीने खातात.  मला ही थालीपीठ अत्यंत आवडते.  (माझी सौ. नेहमीच म्हणत असते, या वयात ही तुम्ही लहान मुलांसारखे वागतात, केंव्हा अक्कल येणार आहे).  या भाजणीच्या पिठात मुलांना न आवडणाऱ्या भाज्या - दुधी, लाल भोपळा, पालक, बीट  इत्यादी  बारीक किसून किंवा चिरून मिसळता येतात. शिवाय नुसते कांदे -टमाटो बारीक चिरून घातले तरी चालतात.. 

भाजणीत तैयार करताना अनेक धान्यांचा वापर होते, या मुळे आपण केलेली भाजणी कशी होईल या बाबतीत ही अनेकांच्या मनात संशय असतो.     तसे म्हणाल तर भाजणीच्या पीठ तैयार करण्यासाठी घरात जे काही पदार्थ स्वैपाकघरात आहे, ते वापरून भाजणी तैयार करता येते.   आमची सौ. गहू, तांदूळ आणि बाजरी (भरपूर लोह तत्व असल्यामुळे)  सोबत, त्या वेळी स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारचे धान्य आणि डाळी करून भाजणी तैयार करते. भाजणी चक्की वर जाऊन दळून आणावी लागते, म्हणून कमीत कमी ३-४ किलो तरी भाजणीचे साहित्य असायला पाहिजे. शिवाय भाजणी, चक्कीवर  जाऊन प्रत्यक्ष समोर दळून घेतली पाहिजे. सौ. ने भाजणी तैयार केली होती, त्यात घातलेले पदार्थ:

मुख्य पदार्थ गहू,  - १किलो, तांदूळ १/२ किलो, बाजरी १/२ किलो.

चण्याची डाळ,  मुगाची  डाळ (साली सकट आणि धुतलेली ), उडदाची डाळ(साली सकट), तुरीची डाळ, मोठ,  मसूर, मक्का  -   प्रत्येकी २ वाटी. पोहे जाड २ वाटी. धने -२ वाटी.  या शिवाय तुमच्या घरी असतील तेवढ्या प्रकारचे कडधान्य भाजणीत वापरता येतात.    सर्व पदार्थ मध्यम गॅस वर   वेगळे वेगळे भाजून घ्या.  प्रत्येक पदार्थाला ४-५ मिनिटे लागतात, घाई करू नका. रात्रीच्या निवांत वेळी हे कार्य केले कि उत्तम. (दरवर्षी असल्या प्रकरचे,  कार्य मलाच करावे लागते).  नंतर चक्की वर पीठ दळून घ्या.  हे पीठ वर्षभर खराब होत नाही. पावसाळ्यात ही टिकते.


शनिवारी संध्याकाळी भाजी बाजारातून सौ. परत आली. भाजीत लाल भोपळा ही होता. घरी पाहुणे म्हणून आलेली १२-१३ वर्षाच्या चिमुरडीने लगेच आपले मत व्यक्त केले, मावशी, मला लाल भोपळा आवडत नाही. आजकालच्या मुलाचं एक चांगल,  आपलली मते व्यक्त करायला ते मुळीच घाबरत नाही. पण त्या चिमुरडीला ठाऊक नव्हते तिची मावशी किती बिलंदर आहे ते.  रविवारी सकाळी सकाळीच चिमुरडीच्या उठण्या आधी सौ. ने लाल भोपळा बारीक किसून भाजणीच्या पिठात  मिसळला, सोबत भरपूर कोथिंबीर , आलं, लसून आणि मिरचीची पेस्ट त्यात घातली, शिवाय जिरे-मिर्याची पूड (स्वादानुसार), थोडा चाट मसाला  व मीठ घालून पीठ व्यवस्थित मळून घेतले.


पाण्याच्या हात लाऊन, हातानी थापून बनविलेले थालीपीठ, तव्यावर टाकून चारी बाजूला थोड तेल सोडून,  मध्यम गॅस  वर खरपूस भाजून घ्या.

कैरी, कोथिंबीर, पुदिनाच्या चटणी  व उन्हाळा असल्या मुळे  दह्याची लस्सी सोबत गरमागरम लाल भोपळ्याचे स्वादिष्ट थालीपीठ चिमुरडीने आनंदाने खाल्ले. अर्थात तिला  २-३ तासांनी  तिच्या मावशीने यात लाल भोपळा घातला होता हे सांगितले, त्या वेळी चिमुरडीचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.



भाज्यांचे लोणचे