Thursday, July 31, 2014

सोनेरी फुलं आणि म्हातारा

हिरव्यागार गवतावर म्हातारा आडवा पहुडलेला होता. जवळच क्यारीत सोनेरी फुलं वार्या सोबत डोलत होती. म्हातारा रोज पहाटे बगीच्यात यायचा आणि सोनेरी फुलांबरोबर बोलायचा. फुलांनो कसे आहात तुम्ही? छान !. बासुरी ऐकायला आवडेल का, चौरसिया यांची आहे. काय मस्त आहे न! म्हणत मोबाइलचा आवाज वाढवायचा. कधी फुलांना बांसुरी तर कधी गाणे ऐकवायचा. कधी-कधी किस्से-कहाण्या हि सांगायचा. त्याची स्वत:शीच चाललेली अखंड बडबड ऐकून सकाळी बगीच्यात फिरायला येणारे लोक हसायचे ही. पण म्हात्याराला त्याची परवा नव्हती. तो वेगळ्याच दुनियेत हरवलेला होता.

एक दिवस नेहमी प्रमाणे म्हातारा, पहाटे बगीच्यात आला. पाहतो काय, क्यारीतली फुलं कुणी उपटलेली होती. म्हाताऱ्याच्या काळजात धस्स झाल. तो मटकन खाली बसला. बहुतेक क्रिकेट खेळणाऱ्या द्वाड मुलांचे काम असेल. त्यांना मनातल्या मनात असंख्य शिव्या मोजल्या. एक कोमजलेले निर्जीव सोनेरी फुल उचलून आपल्या काळजापाशी घट्ट धरले, अचानक म्हातार्याला छातीत कळ जाणवली.

आजोबा, कसं वाटतंय आता, एका सोनेरी फुलाच्या आवाजाने म्हात्याराने डोळे उघडले, समोर क्यारीत सोनेरी फुलं मस्त वाऱ्यावर डोलत होती. आपण स्वप्न तर नाही पाहत आहोत, म्हातार्याच्या मनात विचार आला. म्हाताऱ्याने, आपल्या प्रेमळ हाताने फुलांना गोंजारले आणि खात्री केली. नेहमीप्रमाणे फुलांना विचारले, कसे आहात बाळांनो? एका फुलाने उत्तर दिले, आम्ही, मस्त आहोत आजोबा, आता कसलीच काळजी नाही, इथे कुणी आम्हाला त्रास देणार नाही. तुम्ही थकले असाल आजोबा, फार लांबचा प्रवास झाला ! जरा निवांत पडा, तुम्हाला आवडणारी बासुरीची टेप लाऊन देतो. नंतर आपण निवांत बोलू, भरपूर वेळ आहे, आपल्याकडे. म्हाताऱ्याने समाधानाने डोळे मिटले. दूर अवकाशात बासुरीचे बोल घुमत होते.

Tuesday, July 29, 2014

विडंबन: देखो देखो पंछी उड़ रहा है.

बहुतांश विज्ञापन भ्रमित करणारे असतात. काही विज्ञापनात सत्य दडलेले असतात. फक्त आपल्याला समजायला हवे.  दिल्लीत बहुतेक तरुण मंडली वेडी-वाकडी आणि तुफान बाइक चालवितात एखाद्या पक्ष्या प्रमाणे. परिणाम काय होतो:

किक मारुनी बाईक
तुफान त्याने फेकली .

शरीर सोडूनी तत्क्षणी
पंछी उडाला आकाशी.

लोक ही म्हणतात कसे
देखो देखो 
पंछी उड़ रहा है

Saturday, July 26, 2014

व्यंग - धोबीचा कुत्रा



बिभीषणाने दिला होता
रावणाला हो दगा.
बदल्यात त्याला  मिळाली
सुवर्ण लंकेची हो गादी.

गादी साठी त्याने
पक्ष आपला सोडला.
विसरला होता तो
त्रेता नाही कलयुग आहे हो.

घरात त्याला आता
प्रवेश नाही मिळाला.
घाटा वरचा राजा
तो नाही झाला.

घर का ना घाट का
धोबिच्या  कुत्र्या सारखा
भुंकत- भुंकत आता
भटकतो गल्ली बोळ्यात.






Thursday, July 24, 2014

डॉक्टर आणि समीक्षक



एकाच्या हातात कात्री 
दुसऱ्याच्या हातात लेखणी 
डॉक्टर आणि समीक्षक
करतात सदा चीरफाड.

डॉक्टरची कात्री 
चालते शरीरावर
बहुतेक रोग्यांचे 
वाचविते प्राण.

समीक्षकाची लेखणी 
चालते कवितेवर 
बहुतांश कवींचे 
*हरते ती प्राण. 


*टीप:  समीक्षकांच्या, समीक्षेला घाबरून बहुतांश कवी कविता करणे सोडून देतात.

Saturday, July 19, 2014

पहाटे येणारी नर्स


हॉस्पिटल म्हंटले कि नर्सेस या आल्याच! या हॉस्पिटलमध्ये जवळपास सर्व नर्सेस भारत देशातील स्वर्ग म्हणून ओळखणार्या केरळ या राज्यातील होत्या. शिवाय म्हणतात न खुदा मेहरबान तो गधा पेहलवान, या म्हणीनुसार माझ्या रूम मध्ये येणाऱ्या सर्वच नर्सेस पंचविसिच्या आतल्या आणि सुंदरच होत्या. भल्या पहाटे पाच सव्वा-पाचच्या सुमारास येणारी नर्सच्या बाबतीत काय म्हणावं, तिचे मोठे काळे डोळे, लांब सडक केस, सरळ नाक, सुबक देहयष्टी व शिवाय उजळ रंग. जणू स्वर्गातील अप्सराच.

बाय पास सर्जरी झालेली, छातीत लागलेय टाक्यांमुळे वेदना या होत्याच त्यात भर म्हणून साठी दोन्ही पायातून नसा काढल्या मुळे, पायांना ही टाके लागलेले. संपूर्ण शरीलाला मुंग्या चावल्यावर जश्या वेदना होतात, तश्या वेदना. अश्या परिस्थितीत रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन ही झोप येणे शक्य नव्हते.  सकाळची वाट  पाहण्या शिवाय गत्यंतर काय?

सकाळचे पाच वाजले, सुहास्य करत ती रूम मध्ये आली, गुड मार्निंग, कैसे हो अंकल (आधीच छातीत चीर पडलेली आणि त्यात “अंकल” मनात म्हणायचो किती  तुकडे होणार या नाजुक हृदयाचे), तरीही तिला पाहून मी चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रयत्न करायचो. जवळ येऊन ती सरळ हाताचे मनगट आपल्या हातात घ्यायची. तिचा नाजुक, कोमल, रेशमी, मुलायम स्पर्श हाताला जाणवताच वेदना कुठच्या कुठे गायब व्हायचा, सर्व शरीर शांत झाल्या सारख वाटायचं. पण दुसर्याच क्षणी, आपल्या खिश्यातून भली मोठी सुई असलेली सिरींज बाहेर काढायची. एका हाताने सिरींज डोळ्यांसमोर नाचवत, दुसर्या हाताने टक-टक करून सिरींज वाजवायची. मग चेहऱ्यावर हास्य आणत, अंकलजी, थोडा दर्द होगा, म्हणत सुई हातात खुपसायची, त्या वेळी तिचा चेहरा अमेजोनच्या जंगलातल्या रक्त पिणाऱ्या वटवाघुळणी सारखा दिसायचा. असे वाटायचे, ती जिभेने लप-लप करून रक्त पीत आहे, आणि रक्त पिऊन तिचे ओठ लाल सुर्ख झालेले आहे. मी डोळे बंद करून घ्यायचो. काही क्षणांनी डोळे पुन्हा उघडायचो, सिरींज मधून रक्त एका ट्यूब ती भरायची. मग पुन्हा चेहर्या वर हास्य आणत, गुड डे, अंकल म्हणत बाहेर जायची, त्या वेळी ही हाताना तिचा ओझरता स्पर्श व्हायचा. ती गेल्या नंतर काही काळ तरी शरीराला वेदना जाणवायच्या नाही. मग पुन्हा त्याच असह्य वेदना सुरु व्हायच्या. कधी-कधी मनात विचार यायच्या, वटवाघुळणी, परत ये, तुझा वेदना दूर करणारा, नाजुक, कोमल, रेशमी स्पर्श मला दे, वाटलं तर पाहिजे जेवढे रक्त पी.

टीप: सकाळी सकाळी, टेस्टिंग साठी रक्त घेणे ही नर्सची ड्युटी होती. बाकी सर्व मनातले विचार आहेत. नर्सेसचा सेवा भाव पाहून मला काय वाटते ते:

नर्स

पृथ्वीवर अवतरली
अमृतघट  घेउनी
अप्सरा शापित कुणी.

रोगग्रस्त जीवांना
पाजला रस चैतन्याचा
जगण्याचा आनंद दिला 


Wednesday, July 2, 2014

ट्रफिक जाम

गेल्या २७ तारखेला सकाळी लाल रंगाच्या बस (एसी बस) मधून कार्यालयात जाताना कळले, हृदयाच्या राजमार्गावर ठीक ठिकाणी ट्रफिक जाम झाल्यामुळे शरीराच्या अर्थव्यवस्थेवर दुष्परिणाम झाला आहे. ताड्ताडीने शरीराच्या मंत्रिमंडळाची मिटिंग घेण्यात आली. ट्रफिक जाम दूर करण्यासाठी यथाशीघ्र ह्रदयाच्या राजमार्गावर बाय पास बांधावे लागतील, असा निर्णय घेण्यात आला. तूर्त काही काळ लेखणीला विश्रांती द्यावी लागेल. असो.