Saturday, December 27, 2014

बंदुकीची गोळी आणि ती


(काल्पनिक कथा)

तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट नागपूरहून दिल्लीला येत होतो. सेकंड एसीच्या डब्यात साईडच्या दोन जागांपैकी एक  जागा मिळाली.  समोरच्या सीट वर  एक दाक्षिणात्य माणूस होता. ओळख झाली. त्याचे नाव मेथ्यु होते. अर्थातच केरळ प्रदेशातला. तो एका अर्धसैनिक दलात मध्यम श्रेणीचा अधिकारी होता. मी ही त्याला आपला परिचय दिला. बोलता-बोलता सहजच नक्षलवादचा विषय निघाला. मी ही सरकारी कर्मचारी असल्यामुळे निसंकोच मेथ्यु यांनी स्वत: बाबत माहिती सांगितली. गेली पाच-सहा वर्षांपासून नक्षल  प्रभावित भागात त्यांची पोस्टिंग होती. कित्येक चकमकीत ही भाग घेतला होता. मी म्हणालो, अर्ध सैनिकादलांमुळे आज नक्षलवाद काबूत आहे. तुम्ही ही बर्याच  नक्सलवाद्याना  कंठस्नान घातले असतील. त्यावर मेथ्यु  म्हणाला,  कुणाचे ही प्राण घेण्यात बहादुरी नाही, लोकांचे प्राण घेऊन आनंद ही मिळत नाही. मग तो शत्रू का असेना.  'बंदुकीची गोळी फक्त प्राण घेते आणि लोकांचे आयुष्य उध्वस्त करते'. बंदुकीची गोळी कुठल्या ही समस्येचे समाधान नाही. एका अर्धसैनिक दलाच्या अधिकारीच्या तोंडून हे ऐकून मला काहीसे आश्चर्य वाटले. चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले.  माझा मनात चाललेला गोंधळ मेथ्युचा ध्यानी आला. तो म्हणाला साहेब, तीन एक वर्षांपूर्वीची घटना आहे.  १५  शिपायांची  तुकडी घेऊन गस्त घालायला निघालो. जंगलातून  पायवाटेवर चालताना बलवान सिंग आणि मोहन हे दोघे सिपाही पुढे होते. मी, होशियार सिंग थोड्या अंतरावर त्यांच्या मागे. एका वळणावर  बंदुका घेतलेले सैनिकी वेशात तीन लोक बलवान सिंहला दिसले. तो थोडा गोंधळला, ते तिघे नक्षली होते. आपल्या समोर अर्धसैनिक दलाची तुकडी आहे, त्यांची संख्या आपल्यापेक्षा जास्त आहे. त्यांना एक धक्का देऊन इथून पलायन करणे उचित, त्यांच्या म्होरक्याने निमिषातच निर्णय घेतला. त्यांनी समोर दिसणाऱ्या दोन्ही शिपायांवर आपल्या एके ४७ ने ब्लास्ट (सर्व गोळ्या एकाच वेळी) केला. काही समजण्या आधीच बलवान आणि मोहन जमिनीवर पडले. मी लगेच एका झाडाची आड घेतली आणि आम्ही नक्षलींच्या दिशेने गोळीबार सुरु केला. होशियार सिंगने याने  थोड रांगत पुढे जाऊन एक हेंड ग्रेनेड त्यांच्या दिशेने फेकला. तो ग्रेनेड बरोबर त्यांच्या मध्ये जाऊन पडला. काही क्षणांकर्ता नक्षली गोंधळले. त्यांनी आपली पोजिशन सोडली आणि त्याच क्षणी ग्रेनेडचा ही ब्लास्ट झाला. सर्वकाही शांत झालं.  माझे  दोन शिपाई  शहीद झाले  होते. बाकी इतर कुणाला ही कुठलीच इजा झाली नव्हती. शिपायांना नक्षली जिवंत आहे कि मेलेले याची खात्री करायला सांगितले. होशियार सिंहाने परत येऊन सांगितले,  साहिब एक जिंदा है, क्या करें उसका. मी जवळ गेलो, बघितले  जेमतेम  १७-१८ मुलगी असेल.  दोन्ही पाय ब्लास्ट मुळे जखमी झाले होते. पाठीला गोळी ही  लागलेली होती. शरीरातून रक्त वाहत होते. एक  शिपाई  म्हणाला, साहब इसे तो उठाकर ले जाना पड़ेगा. मी विचार केला. जंगल नक्सलीनी भरलेले आहे. कदाचित या चकमकी बाबत त्यांना कळले ही असेल. आधीच दोन शहीद  शिपाई, त्यांची आणि नक्षली त्यांचे शस्त्र. ६-७ शिपाई तर या साठीच लागतील. उरलेल्या ५-६ शिपायांवर  सर्वांच्या संरक्षणाची जवाबदारी. निर्णय घेतला. आपल्या जवळ लोक नाही. सध्यातरी हिला इथेच सोडावे लागेल, नंतर येऊन बघू, काय करायचे ते. साहेब अश्यानी ही काही वेळातच इथेच तडफडून मरेल, एक शिपाई म्हणाला.  मी म्हणालो, ठीक आहे, मी तिला मुक्त करतो. मी तिच्या जवळ गेलो.एक पाय तिच्या छातीवर ठेवला आणि  तिच्या कपाळावर नेम धरला. त्या वेळी तिच्या चेहर्याकडे लक्ष गेल. मोठ्या डोळ्यांनी ती माझ्याकडे पाहत काहीतरी बोलण्याच्या प्रयत्न करत होती. मन घट्ट करून मी गोळी झाडली. त्या क्षणी माझ्या कानात आवाज घुमला  'साहेब मला का मारले, मला जगायंच होत.' 

मेथ्यु काही क्षणासाठी थांबला. तो पुढे म्हणाला, बलवान सिंहच्या बायकोचे वय फक्त तीस वर्ष होते त्यात तीन मुली. तिला पुढील सर्व आयुष्य तीन मुलींना वाढवत वैधव्यात काढावे लागणार. मोहन तर फक्त २२ वर्षांचा होता. आपल्या आई-बापांचा एकुलता एक. ती मुलगी, दोन वर्षांपूर्वी तिने दहावीचा पेपर दिला होता. तिला डॉक्टर बनायचे होते.  तिचा मोठा भाऊ कालेजात शिकत होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत  घरी आला होता. त्याच वेळी जवळच्या गावात पोलीस पोस्टवर नक्षली हमला झाला. जवळपासच्या गावातल्या तरुणांना पोलिसांनी उचलले. त्यात तिचा भाऊ ही होता. असे गावकर्यांचे  म्हणणे. नंतर कळले पोलीस एन्काऊंटर मध्ये काही नक्षली मारल्या गेले त्यात तिचा भाऊ होता. भावाचा बदला घेण्यासाठी तिने जंगलाचा रस्ता धरला आणि चकमकीत मी तिला मारले. तिच्या वडिलांनाही या घटने नंतर पोलीस उचलून घेऊन गेले. कदाचित अद्यापही ते जेल मध्ये असतील. काही क्षणांच्या चकमकीत अनेकांचे  स्वप्न भंगले, काही परिवार उध्वस्त झाले. 

बाकी माझे म्हणाल, तर मी झोपेच्या गोळ्या घेतो  तरी ही मला झोप  लागत  नाही. जरा डोळे मिटले कि  तिचा चेहरा समोर येतो, एकच  आवाज कानात घुमत राहतो. 'साहेब मला का मारले, मला जगायचं होत.'  काय उत्तर देणार मी तिला. मला नेहमीच  वाटते, ती सतत माझ्या अवती-भोवती असते, कदाचित या क्षणी ही इथेच  असेल. जो  पर्यंत तिला  तिच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळणार नाही ती जाणार नाही. जन्म भर ती मला अशीच छळत राहणार. मेथ्युची कथा ऐकून मी सुन्न झालो. काहीच बोलू शकलो नाही. 

Thursday, December 25, 2014

ओळखा पाहू ?


टक्कल डोक्याला 
चष्मा डोळ्यांना
बाळ माझा 
होईना मोठा.

जिथे जातो 
तिथे पडतो 
आधार ताईचा 
वाटतो घ्यावा.

मी कोण?

Saturday, December 20, 2014

शोध थंडीच्या मीटरचा


तापमान मोजण्याच्या यंत्रा बाबत तर सर्वाना माहित आहे, पण थंडीचे मीटर हा काय प्रकार आहे, कुणी शोध लावला  आणि याने थंडी कशी काय मोजतात, ही उत्सुकता मनात जागृत होणारच. जीवाची मुंबई या महानगरात आमचे एक जिवलग (?) नातेवाईक राहतात.  बेचारे सीधे-साधे सरळमार्गी चालणारे, सरकारी कर्मचारी. सकाळी नऊ वाजता घरातून नौकरीसाठी प्रयाण करणारे आणि संध्याकाळी घरातल्या भिंतीवर लटकलेल्या घड्याळानी साडेपाचचा टोळा देत्याच क्षणी, घरात पुनरागमन करणारे. एकदम  शिस्तबद्ध सरकारी कर्मचारी सारखी त्यांची साधी राहणी. अर्धा डिसेंबर उलटताच मुंबईत गुलाबी थंडी पडते. पण मुंबईत पडणार्या या गुलाबी थंडीचा, संध्याकाळच्या गुलाबी वातावरणात, गुलाबी अनुभव घेण्याचा प्रयास संपूर्ण आयुष्यात त्यांनी कधी केला नव्हता. पण मुंबईकरांना भगवंतानी मोठ अर्थात सुपीरिअर माइंड दिल्या मुळे त्यांनी 'थंडीच्या मीटरचा' शोध लावला. त्याचीच ही कथा. 

चार-पाच दिवस आधी दिल्लीत ढगाळ वातावरण होत. पाऊस पडत होता. दिवसाचे तापमान कमाल १६ आणि किमान १४ डिग्री होते. दुसर्या दिवशी आभाळ स्वच्छ झाल, सकाळी चहूकडे धुकं पसरले आणि पारा  खाली पडला. थंड वाऱ्यामुळे शरीरात हुडहुडी भरली. मला थंडीच्या मीटरचा शोध लावणाऱ्या मुंबईकर नातलगाची आठवण झाली. 

काही सरकारी कामानिमित्त त्यांना दिल्लीत यायचे होते. त्या पूर्वी दिल्लीत कधी ही आले नव्हते, कदाचित मुंबईच्या बाहेर ही ते कमीच फिरले असेतील. त्या वेळी सुद्धा, असेच काही वातावरण होते. शुक्रवारी ढगाळ वातावरण होते, पाऊस पडला होता. शनिवार आकाश स्वच्छ झाले. पहिल्यांदाच ते दिल्लीत येत असल्यामुळे रविवारी सकाळी त्यांना घ्यायला मी नवी दिल्ली स्टेशनवर गेलो.  थंडगार वारे सुरु असल्यामुळे धुंक नव्हते, पण  भयंकर थंडी होती. अंगावर  अर्धे स्वेटर घालून आमचे मुंबईकर पाहुणे गाडीतून उतरले, त्यांना भयंकर थंडी वाजत होती, थंडीमुळे त्यांचा शरीराला कंप फुटला होता. मुंबैकरांबाबत काहीशी कल्पना होती, स्वेटरवर जेकेट घालूनच घरातून बाहेर पडलो होतो. आपले जेकेट त्यांना दिले. मुबैकाराना थोड बंर वाटले. आटो घेऊन घराकडे निघालो. आटोत बसतात त्यांनी प्रश्न विचारला परवातर तर दिल्ली आणि मुंबईच्या किमान तापमानात फक्त एका डिग्रीचा फरक होता, मग आज एवढी थंडी कशी काय?  मुंबैकरांनी हा प्रश्न का विचारला हे मला समजले नाही. काहीतरी उत्तर द्यायचे म्हणून म्हणालो दिल्लीत पाऊस आणि हिमाचल प्रदेशात बर्फ पडली कि दुसऱ्या तिसर्या दिवशी दिल्लीत भयंकर थंडी राहतेच. पण माझ्या उत्तरांनी त्यांचे समाधान झाले नाही. घरी आल्यावर  सर्वप्रथम मार्केट मध्ये जाऊन त्यांच्या साठी एक स्वेटर आणले.  सोमवारी नेहमी प्रमाणे मी कामावर गेलो, ते ही आपल्या कामावर गेले. मुंबैकरांचे  दिल्लीतले काम लवकरच पूर्ण झाले. चार-पाच वाजे पर्यंत ते घरी परतले होते. नेहमीप्रमाणे संध्याकाळी सात वाजता घरी पोहचलो. पाहतो, समोर सोफ्यावर मुंबैकर पाहुणे बसलेले होते,  वर्तमानपत्रांचा ढीग त्यांच्या समोर पडलेला होता. एका वर्तमान पत्रावर ते काही आंकडेमोड करत होते.  हात-तोंड  धुतल्यावर सौ. चहा नाश्ता (रोज संध्याकाळी घरी आल्यावर चहा सोबत काही न काही खायला सौ आणतेच) घेऊन आली.  सोफ्यावर बसताच,   मुंबैकर  गंभीर चेहरा करीत म्हणाले, विवेक (वयाने माझ्यापेक्षा मोठे होते) काल थंडीमुळे मला जो त्रास झाला त्या बाबत विचार करीत  होतो. गेल्या आठवड्याची वर्तमान पत्रे चाळली,  दिवसांचे कमाल आणि किमान तापमानांची नोंद घेतली.  आंकडे तपासले  निष्कर्ष काढला.  काल थंडीमुळे मला जो  त्रास  झाला, तो पुन्हा आता होणार नाही. माझ्या सारख्या अज्ञानी माणसाला त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय कळणार. प्रश्न वाचक मुद्रेने त्यांच्याकडे पहिले. मुंबैकर म्हणाले दिल्लीला निघण्यापूर्वी शनिवारी सकाळी ७ वाजता दूरदर्शन वाहिनी वर तापमान बघितले, शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १५ डिग्री होते तर दिल्लीचे १४ डिग्री. विचार केला दोन दिवसांसाठी दिल्लीत जात आहो, उगाच गरम कपडे का घ्यायचे. तापमानात थोडासाच तर फरक आहे. एक अर्धे स्वेटर अंगावर चढविले आणि निघालो. पण आता कळले, मुंबईचे कमाल तापमान ३० डिग्री होते आणि दिल्लीचे १६ त्याकडे लक्ष दिले नाही म्हणून घोळ झाला. सरासरी तापमानात एक डिग्रीचा नव्हे तर चक्क १०-१२ डिग्रीचा फरक होता.  माझ्या सारखे अनेक लोक कुठे निघताना, हिवाळ्यात किमान आणि उन्हाळ्यात कमाल तापमानाकडे बघतात, सरासरी तापमान किती आहे, याची दखल घेत नाही, त्या मुळे त्यांना त्रास होतो.  मी म्हणालो, च्यायला, उन्हाळ्यात दिल्ली आणि नागपूरचे अधिकतम तापमान एकच असले तरी ही नागपूरचा उन्हाळा का सहन होत नाही, तुमच्या या,  काय म्हणावे याला -थंडीच्या मीटर मुळे मला हे कळले. आश्चर्याचा धक्का लागल्या सारखे ते म्हणाले, थंडीचे मीटर, युरेका युरेका, मी थंडीच्या मीटरचा शोध लावला.  एखाद्या शास्त्रज्ञासारखा त्यांचा चेहरा उजळून निघालेला होता. अश्यारितीने आमच्या बुद्धिमान मुंबैकराने  थंडीच्या मीटरचा शोध लावला.

Saturday, December 13, 2014

चुन्नी मियां आणि बकरा


तीस -बत्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही जुन्या दिल्लीत नई बस्ती या भागात राहत होतो.  शाळेला दसर्याच्या सुट्या सुरु होताच  आम्ही भावंडे चुन्नी मियां केंव्हा आमच्या घरी येणार याची वाट पाहायचो.  इंच टेप आणि मापे लिहिण्यासाठी एक जुनी फाटलेली वही घेऊन चुन्नी मियां घरी आले कि आमच्या आनंदाला उधाण येत असे. कारण वर्षातून एकदाच दिवाळी साठी  नवीन कपडे मिळणार.  शिवण्यासाठी कापड ते स्वत:च आणायचे. चुन्नी मियां यांनी शिवलेले कपडे घालणारे  पोरें दुरूनच ओळखता येत होती. सर्वांचे कपडे एक सारखेच.  

नई बस्तीतून, तिलक बाजार कडे जाणार्या गल्लीत चुन्नी मियां यांचे दुकान आणि राहते घर होते. दुकान छोटेसे होते, एक बसण्यासाठी खुर्ची, समोर जुनाट टेबल आणि तेवढीच जुनी उषा सिलाई मशीन. त्याच गल्लीत अमजद कसाई याचे दुकान ही होते. (शोले पिक्चर लागल्या नंतर आम्ही मुलें त्याला गब्बर सिंग म्हणू लागली आणि त्याचा दुकानासमोरून जाताना मुद्दामून जोर जोरात शोलेतला संवाद म्हणायचे , पचास कोस दूर दूर के बकरे अमजद कसाई का नाम सुनकर...). असो.  

अमजद कसाई आणि चुन्नी मियां यांच्यात बोलचाल बंद होती. कारण ही तसेच होते. चुन्नी मियां यांनी कपडे बरबाद केले म्हणून शिलाईचे पैसे अमजद यांनी दिले नाही.  चुन्नी मियां शिलाईचे पैसे मागायला गेले कि काही न काही बहाणा करून, अमजद भाई पैसे देण्याचे टाळायचे.  अमजद भाई सारख्या दबंग माणसाकडून पैसा वसूल करणे चुन्नी मियां यांना शक्य नव्हते. माझा मुसलमान मित्र कालू (त्याचे खरे नाव काय होते, कधीच कळले नाही), आणि मी  चुन्नी मियांच्या दुकाना समोरून जाताना नेहमीच मियाजींची फिरकी घेत असू.  मियांजी, अमजदने आपके पैसे दिये कि नहीं.  मियांजी ओरडतच म्हणायचे,  नाम मतलो उस पाजी हरामखोर का?  वह क्या समझता है, चुन्नी  मियां के पैसे डुबायेगा,  मेहनत की कमाई है.  पैसे नहीं चुकाए तो देखना एक दिन उसकी मोटी गर्दन पकड़कर कोई बकरा ही उसे हलाल करेगा. सुबह-सुबह आ जाते हो खामकका परेशान करने. भागो शैतानो यहां से. आम्ही हसत-हसत तेथून धूम ठोकायचो. 

एक दिवस बघितले, मियांजीच्या दुकानासमोर, एक बकरा बांधलेला होता. सहज विचारले. कुर्बानी के लिए  बकरा ख़रीदा है, म्हणत मियांजी बकऱ्याला आपल्या हातानी बदाम खिलवू लागले. कालूला राहवले नाही, वाह! मियांजी,  यहाँ दो टैम रोटी के लाले पड़े हैं और बकरा बादाम पाड़ रहा है.  चुन्नी मियां त्याचाकडे पाहत म्हणाले, यहाँ आके बंध जा, तुझे भी बादाम खिलाऊंगा आणि हाताने गळ्यावर छुरी फिरवण्याचा अभिनय केला.  कालू ही कमी नव्हता, जोरात ओरडला, एक बादाम की  खातिर बच्चे की जान लोगो, जहन्नुम में जाओगे मियांजी. चुन्नी मियां यांनी मारण्यासाठी काठी उचलली आणि नेहमीप्रमाणे आम्ही तेथून पळ काढला. 

बकरीदच्या दोन-तीन दिवसांनी पुन्हा आम्ही मियांजीच्या दुकानासमोरून गेलो. बघितले, बकरा तिथेच बांधलेला होता. चुन्नी मियां ही उदास दिसत होते. मी विचारले,  मियांजी क्या बात है, बकरे कि कुर्बानी नहीं दी क्या? मियांजी म्हणाले, बेटे दिल लग गया. मियांजी पुढे काही म्हणणार, कालू एक डोळा मिचकावित म्हणाला,  क्या जमाना आ गया है. इन्सान बकरों से मोहब्बत करने लगें है.  चाचीजान  को बताना हि पड़ेगा. मियांजी जवळ ठेवलेला डंडा उचलत म्हणाले,  बत्तमीज, शैतान, भाग यहाँ से.  तेथून पळ काढण्यातच भलाई होती.

पुढे जवळपास एका आठवड्या नंतर, पुन्हा मियांजीच्या दुकानासमोरून गेलो या वेळी तिथे बकरा बांधलेला नव्हता. बकर्याचे काय झाले या उत्सुकता पोटी मियांजीना विचारले, मियांजी बकरा कहाँ गया?  मियांजी म्हणाले, अमजद कसाई को बेच दिया, कई दिनों से नजर थी उसकी बकरे पर.  मी विचारले, मियांजी पैसे दिए की नहीं दिए, या मुफ्त में उड़ा के ले गया. मियांजी म्हणाले,  पूरे नगद २०० रूपये में बेचा है. ये बात अलग है इतने के तो बादाम ही खिला दिए थे, उस हरामखोर, पाजी बकरे को.  फिर भी सौदा घाटे का नहीं रहा. कालूला राहवले नहीं, मियांजी आप तो उससे मोहब्बत करते थे, कसाई को बेच दिया, अब तक तो कट भी चुका होगा. चंद चांदी के टुकड़ों की खातिर मोहब्बत कुर्बान कर दी, लानत है आप पर.  या वेळी मात्र  मियांजी चिडले नहीं, म्हणाले उस कमीने से कौन महब्बत करेगा. बकरीद के पहले की रात, उसे बादाम खिला रहा था. उस कमीने बकरेने  ने इंसानी आवाज में मेरे कान में  कहा, मियांजी, ख़बरदार मुझे कुर्बान किया तो, अगले जन्म में कसाई बनकर तेरी गर्दन पर छुरी चलाऊंगा. डर गया मैं. अब सवाल था, बकरे का क्या करें. अचानक अमजद कसाई का ख्याल आया. बेच दिया उसको. त्या वर कालू म्हणाला, तो अगले जन्म में अमजद कसाई कि गर्दन पर छुरी चलेगी. एक तीर से दो शिकार कर दिये मियांजी आपने. चुन्नी मियां खळखळून हसले.



Wednesday, December 10, 2014

धुकं


धुक्यात उमटली 
चित्रे काही 
त्यास समजलो 
जीवन नाती 


धुक्यातली नाती
धुक्यात विरली
जीवन यात्री 
उदास एकाकी



Sunday, December 7, 2014

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।


कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। 

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ २-४७

भगवंत म्हणतात:
१. माणसाला कर्म करण्याचा अधिकार आहे 
२. कर्मफळ माणसाच्या हातात नाही. 
३. कर्मफळाची आशा न ठेवता अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे.


भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातल्या ह्या श्लोकाला वाचताना मनात गोंधळ हा निर्माण होतोच. बहुतांना असे वाटते हा श्लोक माणसाला कर्मापासून परावृत्त करून भाग्यवादी बनवितो.  पण हे खरे नाही. आपल्याला नेहमीच असे वाटते, आपण जर कर्म केले तर त्याचे फळ मिळायलाच पाहिजे. हेच योग्य आणि न्यायपूर्ण. जर कर्माचे फळ मिळणार नसेल तर कर्म कशाला करायचे, असा प्रश्न मनात येणारच. मग भगवंतांनी गीतेत कर्म फळावर, कर्म करणार्याचा अधिकार नाही, हे का म्हंटले आहे? हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

आपण पाहतोच मुलाने उत्तम अभ्यास केला तर त्याला परीक्षेत उत्तम गुण मिळतात. उत्तम अभ्यास = उत्तम गुण सहज सोपी नियम आहे. पण नेहमीच असे होत नाही.  कुणी विद्यार्थी आजारी पडतो आणि पेपर देऊ शकत नाही. कुणाला अपघात होतो, परीक्षा केंद्रावर पोहचू शकला  नाही.  कुणाला पेपर तपासताना क्वचित होणाऱ्या चुकी मुळे ९० च्या जागी ०९ मार्क मिळतात.  तो चक्क नापास होतो.  SSCचा टायपिंगचा पेपरात नेहमीचेच आहे, प्रत्येक केंद्रात २-३ परीक्षार्थी  केवळ  टाईपरायटर  खराब झाल्या मुळे  अयशस्वी होतात. त्यांना सरकारी नौकरी मिळत नाही. त्यांची तैयारी व्यर्थ जाते.  शेतकरी ही उत्तम बियाण्यांची पेरणी करतो, शेतात जातीने लक्ष देतो,  खत,  पाणी व  मशागत सर्व उत्तम प्रकारे करतो, पिक ही भरपूर येते, पण कित्येकदा गारपीट, अवेळी पावसामुळे त्याचे अतोनात नुकसान होते. त्याला ही पाहिजे तसे फळ मिळत नाही.    


वरील उदाहरणांनी एक बाब स्पष्ट होते, सर्वांनी उत्तम कर्म केले पण तरी ही त्यांना फळ मिळाले नाही.  कर्म करणे माणसाच्या हातात आहे, पण आपल्या कर्मावर प्रभाव टाकणाऱ्या इतर बाबींवर आपले नियंत्रण नसतेदेश, काळ, राजनीतिक परिस्थिती एवं इतरांच्या कर्मांचा प्रभाव ही आपल्या कर्मांवर पडतो.  समर्थांनी या आपल्या कर्मांवर प्रभाव  टाकणार्या इतर  बाबींचे वर्णन, "अध्यात्मिक ताप"  (देह,  इंद्रिय आणि प्राण यांच्या संयोगाने होणारे ताप - शारीरिक व मानसिक व्याधी इत्यादी ) आणि "आधिभौतिक ताप" (सर्व पंचभूतांच्या संयोगाने जे त्रास होतात अर्थात सर्व प्रकारचे बाह्य कारणे  - अपघात, सर्पदंश, चोरी, डकैती, आग, अतिवृष्टी, पूर, परचक्र, राजा एवं अन्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून छळ इत्यादी)   [दशक , समास ६ आणि ७] असे केले आहे. या सर्व बाबींवर कर्म करणार्याचे नियंत्रण नसते, म्हणूनच भगवंतानी म्हंटले आहे, कर्मफळावर कर्म करणाऱ्याचा अधिकार नाही, केवळ कर्मावर त्याचा अधिकार आहे

कर्मांचे फळ मिळाले नाही तर माणूस निराश होतो. आज ह्या मुळेच अनेक शेतकरी आत्महत्या करतात, पेपर मध्ये नापास झाल्याने विद्यार्थी ही आत्महत्या करतात. किंवा लोक कर्म करणे सोडून देतात.  मृत्युलोकाला 'कर्मलोक' ही म्हणतात, इथे कुणाला ही कर्म चुकलेले नाही. कर्म हे करावेच लागणार,  त्या शिवाय या लोकात कुणी जगू शकत नाही.   म्हणूनच भगवंतानी गीतेत म्हंटले आहे, अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे.  असे  कर्म  केल्याने आपल्या कर्माचे आपल्याला पाहिजे तसे फळ मिळाले नाही तरी ही आपल्याला त्याचा जास्त त्रास होणार नाही.


कर्माची अपेक्षा न ठेवता उत्तम  रीतीने कर्म करणे, हे जर शेतकरी राजाला कळले, तर तो कुठल्या ही परिस्थितीत निराश होणार नाही.  आत्महत्या न करता पुन्हा पुढच्या पिकाच्या तैयारीला लागेल. विद्यार्थी ही पुन्हा जोमाने अभ्यास करून, परीक्षेत उत्तम गुण मिळविण्याचा प्रयत्न करेल. हेच भगवंताना गीतेत सांगायचे असेल.










Saturday, December 6, 2014

झुंज - अंधाराच्या राक्षसांशी



डिसेंबर महिना सुरु झालेला आहे, सूर्यास्त लवकर होऊ लागला आहे, चार्टर बस मधून घरी परतताना, अस्तांचल जाताना सूर्य  दमलेला, ओजहीन दिसत होता.  सूर्य अस्त होताच,  थंड गार वारे अंगाला झोंबू लागले. बसची खिडकी बंद केली. काळजात धस्स झाले. चित्र-विचित्र  निराशेने भरलेले विचार मनात येऊ लागले. खरं म्हणाल तर मला हिवाळ्याची भीतीच वाटते. जिथे साक्षात सूर्यदेव शक्तीहीन झाले तिथे सामान्य माणसांचे काय.  हिवाळा म्हणजे छोटे दिवस आणि मोठ्या रात्री. सूर्याची भीती नाहीशी झाल्याने मानवाला त्रास देणाऱ्या अंधाराच्या राक्षसांचे बळ वाढते. दुसऱ्या शब्दांत हिवाळा म्हणजे अंधाराच्या राक्षसांचे राज्य. काही दया-माया न बागळता हे राक्षस आपल्या शरीरातील सर्व  उर्जा, तेज, शक्ती  शोषून घेतात.  किती ही गरम कपडे घातले तरी ही बचाव होत नाही. रात्री बिछान्यावर पडल्यावर वाटू लागले  शरीरातील जुन्या जखमा अंग वर काढू लागल्या आहे, नवीन जखमा ही भरभरून वाहू लागल्या आहे. असह्य वेदनांमुळे  डोळा लागत नाही. हे अंधाराचे राक्षस व्याधीग्रस्त मानवांवर हिंस्त्र प्राण्याप्रमाणे तुटून पडतात. व्याधीग्रस्त  माणसांना तडपवून  मारण्यात राक्षसाना आसुरी आनंद मिळतो. किती ही डोक्यावर पांघरूण घेऊन त्यात दडले तरीही राक्षसांच्या भेसूर हास्य आणि डरकाळ्या सतत रात्रभर ऐकू येतात.  बिछान्यावर कड बदलता- बदलता सारी रात्र निघून जाते. तेंव्हा कुठे जाऊन ब्राह्म मुहूर्तावर  डोळा लागतो.  सकाळी घड्याळाच्या गजरा बरोबर जाग येतेच (सवयच आहे ती). आधी शरीरला चिमटा घेऊन जिवंत असल्याची खात्री करतो, भिंतीवर लटकलेल्या घड्याळा कडे पाहतो, सकाळचे साडेपाच वाजलेले असतात. उठण्याची इच्छा नसते तरी ही देवाचे नाव घेऊन कसा-बसा उठतो. आता पुढचे दीड महिना तरी असेच हाल होणार. जनवरी महिन्यात संक्राती येईलच. सूर्याचे तेज पुन्हा वाढू लागेल. सूर्याच्या उर्जेने शरीरात नवचैतन्य येईल. तो पर्यंत तरी रोज जगण्यासाठी संघर्ष करावाच लागणार. ...शरीरात साठविलेल्या शक्तीने अंधाराच्या राक्षसांशी झुंज देत देत....आयुष्याची गाडी पुढे रेटावी लागणार.

Tuesday, November 25, 2014

मला बी बाबा व्हायचं.


पन्नासी उलटली तरी  अनेक संसारिक इच्छा अपूर्णच आहेत. विदेशी गाडी, बंगला इत्यादी सोडा, एक सादी नोनो घेण्याची ऐपत सुद्धा नाही, असे सौ. चे मत आहे. स्वर्ग सुख भोगण्याची इच्छा तर प्रत्येकाचा मनात असतेच, माझ्या ही मनात आहे.  सध्या तरी स्वर्गीय सुख आणि  स्वर्गातील अप्सरा स्वप्नातच भेटतात. दुसऱ्या शब्दात 'दुधाची तहान ताकावर भागवितो'. कालच टीवी वर एका बाबांच्या आश्रमाच दर्शन झाले. काय काय नव्हत, त्या आश्रमात. विदेशी गाड्या, उंची सिंहासन, उंची कपडे, बंदुका, स्वीमिंग पूल, अर्थात स्वर्गातील सर्व सुख सोयी तिथे होत्या.   अश्या बाबांचा हेवा हा वाटणारच. 

सकाळी उठल्यावर टीवी वर कुठले ही चेनेल लावा. समोर एक बाबा प्रवचन करताना दिसतो. अश्या बाबांच्या डोक्यावर पांढरे केस असतात. मस्त पैकी सिंहासनावर बसून लोकांना माया मोहापासून दूर राहण्याचा उपदेश देत असतात.  भक्तांनी मायेचा त्याग केला की माया  भक्तांच्या खिश्यातून, बाबांच्या झोळीत येऊन पडणार, हे आलंच.  माया जवळ असेल तर सर्व स्वर्ग सुख आपसूकच पायावर लोटांगण घालतात. अश्या या बाबा लोकांना तर  स्वर्गातील अप्सरा ही  पृथ्वीवर सहज उपलब्ध होतात. 

एक दिवस मनात विचार आला, आपण ही बाबा बनाव, बाबा बनण्यासाठी काय लागते याचा विचार करू लागलो.  आरश्यात पहिले  डोक्यावरचे केसं ही पांढरे झाले आहेत, डोक्यावरचे पांढरे केसं ही विद्वान् माणसाची निशाणी.  या शिवाय    संत रामदास, ज्ञानेश्वर आणि  तुकोबांचे  काही अभंग ही तोंडपाठ आहेत. रामायण महाभारतातल्या काही कथा ही अवगत आहे. इतकेच नव्हे तर कबीर आणि तुलसी यांचे ही काही दोहे ही तोंडपाठ आहेत. आपला आवाज ही चांगला बुलंद आहे. घरात भांडण झाले की संपूर्ण मोहल्याला कळते.  कधी कधी चार चौघांसमोर भाषण देण्याचा ही योग आला आहे. मला तरी वाटते बाबा बनण्याची संपूर्ण योग्यता आपल्यात आहे. फक्त  कोणत्या ही  टीवी  चेनेल वर , प्रवचन देण्याचा मौका  मिळाला पाहिजे. काही दिवसांच्या प्रवचनानंतर  माणूस आपोआप प्रसिद्ध होतो, एकदा  टीवी वर प्रसिद्धी मिळाली की भक्तांची कमी नाही.  भक्त मिळाले की त्यांची माया आपसूक आपल्या खिश्यात येईल. माया असेल तर स्वर्गसुख ही पायाशी लोटांगण घालतील. आयुष्यातील सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होतील.  आजच संध्याकाळी एका ज्योतिष मित्राला आपला हात दाखविला, त्याला ही विचारले बाबा बनण्याचा काही योग आहे का. तो म्हणाला योग तर आहे, पण पुढे धोका ही आहे,. स्वर्गसुख भोगल्यावर, काही वर्षानंतर बाबांना नरक यातना (जेलची कोठरी) ही भोगाव्या लागतात. तुझी तैयारी असेल तर, तू निश्चित बाबा बनू शकेल.....  





Monday, November 24, 2014

बळी

पात्र काल्पनिक असले , थोडी कल्पना ही आहे,  तरी कथा सत्य  आहे. वीपी सिंगच्या काळात खाद्यतेल उद्योग उभारण्यासाठी स्वस्तात कर्ज देण्याची नीती आली. नंतर सरकार बदलली आणि नीती ही.परिणाम)

काही वर्षांपुर्वी देशात खाद्य तेलांची कमी दूर करण्यासाठी  सोयाबीन तेलाचे उत्पादन  वाढविण्याचे धोरण सरकारने राबवायला सुरवात केली, अल्प दरात बँके कडून कर्ज, सुरवातीच्या काही वर्ष व्याज  माफी इत्यादी सुविधा सरकारने   सोयाबीन तेल उत्पादकांना देऊ केल्या. या  सरकारी धोरणांचा कृषी विज्ञानी श्रीयुत वाघमारे यांनी वीआरएस घेऊन विदर्भात त्यांच्या राहत्या गावी, सोयाबीन  ऑयल मिल टाकली. सुरवातीच्या दोन-तीन वर्षानंतर  गाडी रूळावर येऊ लागली,  पण  नफा काही त्यांच्या हातात आला नव्हता.  त्यासाठी मिलची उत्पादन क्षमता किमान ७०% तरी गाठणे आवश्यक होते. अनेक समस्या समोर होत्या, काहींचे समाधान त्यांच्या हातात नव्हते,  उदाहरणार्थ, विदर्भात वीज उत्पादन  गरजेपेक्षा कित्येक पट जास्त, पण ती वीज मुंबई पुणेवाल्यांकरता, विदर्भातील उद्योगांना  वीज कपातिला तोंड द्यावे लागत होते. गावांत तर वीज कपात आणखीन जास्त.  

काही समस्यांचा समाधान त्यांच्या हातात होते, सोयाबीनच्या चढत्या भावांचा फटका त्यांना  बसायचा. यावर उपाय म्हणून त्यांनी, सोयाबीन साठवणीसाठी गोदाम ही बांधले. सीजनच्या सुरवातीलाच  जवळपासच्या शेतकऱ्यांना काही अडवान्स देऊन  शासनाद्वारा घोषित एमएसपी वर सोयाबीन खरेदीचा  करार केला आणि  बऱ्यापैकी खरेदी ही केली. दुसरी समस्या सोयाबीन तेल विक्रीची होती.  त्यांच्या उत्पादनाचा  ६०-७०% तेल नागपूरचा तेलवाणी नावाचा  व्यापारी विकत घायचा. त्याची नागपुरात पेकेजिंग युनिट होती. १,२ आणि ५ किलोच्या पेकिंग मध्ये  आपल्या ब्रांड नावाने पुढे तेल विकायचा. तेलवाणी धंद्यात चोख होता. ज्या दिवशी बाजारात जो भाव असेल त्या भावाने तो तेल विकत घेत असे. त्याचे पेमेंट ही व्यवस्थित आणि नियमित होते.  कसली ही तक्रार नव्हती.  वाघमारे यांनी विचार केला त्याच्या  बरोबर  विक्री करार गेला तर  त्यात दोघांना ही फायदा होईल, आपली  व चिंता पुष्कळ प्रमाणात कमी होईल आणि तेलवाणी यांना एका निश्चित दरात पूर्ण सीजन तेल मिळेल. अर्थात  तेलवाणी यांना ही फायदा होईलच. वाघमारे तेलवाणी यांना भेटायला नागपूरला गेले. त्यांच्या समोर आपले मनोगत स्पष्ट केले. तेलवाणी म्हणाला, वाघमारे, धंद्यात केवल स्वत:च्या विचार करायचा असतो, दुसऱ्यांच्या नाही. आपल्या सारखे लोक समुद्रातले लहान मासे, मोठा घास घेणे शहाणपण नाही.  मी तेल पॅक करून विकतो. माल विक्री झाल्यावर पुन्हा खरेदी करतो. साठवून ठेवत नाही.  कमी नफा मिळतो, पण नुकसान होत नाही, झाले तरी कमीच  होईल. तेवढे मी सहन करू शकेन. समजा  सोयाबीनची डिमांड कमी झाली तर दुसरे तेल विकेन. पण आधीच करार केला तर मला तुझ्याकडून निश्चित दरात सोयाबीन तेल विकत घ्यावेच लागेल, मग नुकसान कोणाला होणार आणि नाही घेतला कोर्ट-कचेऱ्या होईल. आपले संबंध नेहमी करता खराब होतील.   

वाघमारे यांनी  तेलवाणी यांना समजविण्याचे प्रयत्न केले, वाघमारे म्हणाले, सोयाबीन तेलाचे भाव सतत वाढत आहे, भविष्यात ही कमी होणार नाही. सरकारचे धोरण ही देशात तेल उत्पादन वाढविण्याचे आहे. शिवाय करार झाल्याने तुमच्या साठी माल वेगळा काढून ठेवता येतो. गेल्या वेळी, तुमचा टेंकर दोन दिवस, वाट पाहत उभा राहिला. करार झाल्याने तसे घडणार नाही. तेलवाणी हसत म्हणाला, मी काय शिकायत केली का, त्या बाबतीत. धंद्यात अस चलायचं. पण एक लक्षात ठेव वाघमारे, शेतमालाच्या धंद्यात सरकार काही जास्त लुडबुड करते,  आपल्या फायद्यासाठी सरकार केंव्हाही शेतकऱ्यांच्या आणि शेतमाल उद्योजकांच्या पाठीत  खंजीर खुपसू शकते. तुम्हा शिकलेल्या लोकांना करार वैगरे यांचे जास्त फेड. माझ ऐक, तू ही शेतकऱ्यांशी करार वैगरे करण्याच्या भानगडीत पडू नकोस, नाहक बळी जाईल तुझा. 

वाघमारे घरी परतले, त्यांनी  ही मनात विचार केला, तेलवाणी ठीकच म्हणतो, धंद्यात स्वत:चा विचार केला पाहिजे.  जो ग्राहक पहिले येईल आणि जास्त भाव देईल त्यालाच माल विकायचा. रोज झोपण्याच्या आधी, वाघमारे बातम्या अवश्य बघायचे. त्या दिवशी ही रात्री १० वाजता, बातम्या बघण्यासाठी टीवी लावला. समोर ब्रेकिंग न्यूज सुरु होती.  आज सायंकाळी केबिनेट मध्ये  खाद्य तेलांचे वाढते भाव रोखण्यासाठी, सरकारने  पामोलीन तेलावर आयात शुल्क पूर्णपणे समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.  सर्व राजकीय पक्षांनी आणि ग्राहक संगठनानी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. निर्णय होताच क्षणी खाद्य तेलांचे भाव जवळपास ३०% टक्क्यांनी खाली आले. बातमी पाहताच वाघमारेंच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले. आता सोयाबीनचे भाव गडगडणार. तेलाचे भाव ही कमी होतील. नफा तर सोडा, होणारे नुकसान त्यांना झेपेल का? शेतकऱ्यांसोबत केलेल्या कराराला पाळणे त्यांना शक्य होणार नाही, त्यांना तोंड कसे दाखविणार. बेंकेचे  कर्ज कसे चुकविणार,  विचार करता करता  त्यांच्या छातीत कळ उठली..

Monday, November 10, 2014

रहिमन धागा प्रेम का... ( प्रेमाचा धागा...)



रहिमन धागा प्रेम का, मत तोड़ो चटकाय ।
टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गाँठ परि जाय l

अत्यंत नाजुक अश्या प्रेमाचा धाग्याला सदैव जपून ठेवावे लागते. एकदा हा धागा तुटला, तर कधी-कधी पुन्हा गाठ मारणे ही शक्य होत नाही. आपली मीरा पतंग उडवीत होती, अचानक पतंगाची दोर तुटली. पतंग हवेत उंच उडाला. थेट स्वर्गात पोहचला. तिथे सोमरसा सोबत अप्सरांचे नृत्य पाहत स्वर्ग सुख भोगू लागला. इथे मीरा जमिनी वर पतंगाच्या विरहात अंतर्बाह्य बुडलेली होती. तिच्या मनात एकाच विचार, पुन्हा पतंग कधी भेटणार. पण धरती आणि आकाशाचे मिलन जवळपास अशक्यच असते. विरही मीरा विचार करीत आहे, गगन मंडल पे सेज पिया की , किस विध मिलना होय. जर कान्हा वृंदावनात असता तर मीरा नावाच्या गोपीची हाक ऐकताच, एका क्षणात धाऊन आला असता. पण आधीच रुक्मिणी, सत्यभामा समेत अनेक पत्नींचे लफडे सोडविता-सोडविता द्वारकाधीश कृष्णाला नाकी नऊ येत होते, त्यात मीरेची आणखीन भर कशाला.  मीरेच्या नशिबी आता विरह व्यथाच.

असा विचार करत-करत मी स्वामी त्रिकालदर्शींच्या आश्रमात पोहचलो. नेहमी प्रमाणे स्वामीजी ध्यानमग्न होते. मी ही त्यांच्या समोर बसलो. थोड्या वेळाने त्यांनी डोळे उघडले, स्वामी जी एक शंका आहे, मी म्हणालो. स्वामीजी म्हणाले बच्चा, हीच न तुझी शंका, त्यांनी एक श्लोक  म्हंटला:

मुँह में राम बगल में छुरी
मित्राने-मित्राला मारली मिठी.

मी प्रश्नार्थक मुद्रेने स्वामीजी कड़े पाहिले, स्वामीजींच्या चेहर्यावर मंद हास्य पसरले, ते म्हणाले, बच्चा, दोघे ही रामभक्त, सतत राम नाम जपणारे, मंदिर बनविण्याची जागा शोधण्यासाठी बाहेर पडले. रस्त्यात त्यांना ‘तिलोत्तमा’ समान एक सुन्दर अप्सरा भेटली, आता सुन्दर नार समोर दिसली की कलह हा होणारच. त्यांना मित्रतेचा विसर पडला, हातातली रामनामी माळ ही त्यांनी फेकून दिली आणि बगलेत लपवलेली छुरी हातात घेऊन सुन्द-उपसुंद प्रमाणे एक दुसर्यावर तुटून पडले. स्वामीजी बोलता बोलता थांबले. माझ्या डोळ्यांसमोर शिवाजी महाराज आणि अफज़लखानच्या  भेटीचे दृश्य तरळले. एका दुसर्याच्या रक्ताने न्हालेले मित्र पुन्हा जवळ येणे शक्य नाही. आले तरी पहिले सारखे प्रेम उरणार नाही.  मी म्हणालो, स्वामीजी, आता मला रहीमदासच्या दोह्याचा अर्थ कळला. पण तरीही एक शंका मनात येते. सांग बच्चा, काय शंका आहे, स्वामीजी म्हणाले. मी म्हणालो, स्वामीजी, अर्जुनाचा पौत्र परीक्षित हस्तिनापूरच्या गादीवर बसला होता. भारतीय युद्धात अर्जुनाने मोठा पराक्रम गाजविला होता, भीष्म पितामह, कर्णा सारख्या योद्धानां त्याने पराभूत केले होते, शिवाय असंख्य कौरव सैन्याला, आपल्या बाणांनी यमसदनी पाठविले होते. मोठा असला तरी काय झाले, युधिष्ठिरने युद्धात विशेष पराक्रम गाजविला नव्हता, हे सर्व पाहता कदाचित् युधिष्ठिरा एवजी अर्जुनच गादीवर बसला असेल. हा! हा! हा! स्वामीजी जोरात हसले, बच्चा, सद्य परिस्थिती पाहता, तुझे म्हणणे रास्त वाटते, कदाचित् असेही झाले असेल. पण त्या साठी पुन्हा एकदा महाभारत तपासून पाहावे लागेल, असे म्हणत स्वामी त्रिकालदर्शी पुन्हा ध्यानमग्न झाले.

Saturday, November 8, 2014

वात्रटिका- अभियान स्वच्छता



आज एक ब्रेकिंग न्यूज  पाहिली – दिल्लीत एके ठिकाणी आधी कचरा पसरविला आणि नंतर गाजा-बाज्या सहित तो स्वच्छ केला

आधी शुभ्र वस्त्र धारण करावे
एक डिझाईनर झाडू आणावे
मग मिडीयाला बोलवावे
स्मायली फोटो चमकावे.

रस्त्यावरी कचरा पसरविला
तोची झाडून स्वच्छ केला
असा स्वच्छता अभियानाचा
नेत्यांनी बोऱ्या वाजविला.



Monday, November 3, 2014

एक लक्ष वाचक - एक प्रवास

 आज ३ नोव्हेंबर, सायंकाळी ८ वाजता कॉम्पुटर चालू केला, सहज लक्ष गेल ब्लॉगला वाचक संख्या एक लक्षाच्या वर गेलेली होती. जेंव्हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली होती,  आपला ब्लॉग कुणी वाचेल याची कल्पना ही केली नव्हती.    

चिरंजीवाना शिक्षणात मदत होईल या हेतूने कॉम्पुटर (लेपटाॅप) घरात  आला. अर्थातच मला ही तो वापरायला मिळालाच. उत्सुकता म्हणून कुठे मराठी वाचायला मिळेल या उद्देश्याने अंतर्जालावर शोध घेऊ लागलो. सर्व प्रथम मराठी सृष्टी ही वेबसाईट दिसली.  वेबसाईट वर मराठीत लिहा, आपल्यातील लेखकाला जागवा. असे आव्हान होते.  रोज मराठी सृष्टी ही वेबसाईट उघडायचो आणि  आपल्यातील दडलेल्या लेखकाला कसं  जागे करावे याचा विचार करायचो.  मनातील दडलेल्या लेखकाला जागवल तरी अनेक समस्या होत्या.  पहिली समस्या होती, मराठी टंकन येत नव्हते. दुसरी समस्या  मी मराठीत लिहू शकतो का, हा मोठा प्रश्न होता?  स्वत:च्या मराठी बाबत  म्हणाल तर दिल्लीत मराठी शाळेत ५ वी पर्यंत मराठी हा विषय होता. ही गोष्ट वेगळी मराठीच्या  क्लास मध्ये आम्ही चक्क कंचे खेळायचो. कारण मराठीचे मार्क्स जोडल्या जात नव्हते.  ११वी पर्यंत हिंदी हा विषय होता. नंतर तो ही सुटला. आंग्ल भाषेत शॉर्टहंड शिकून, सरकारी नौकरीत रुजू झालो. त्यानंतर मराठी तर सोडा कधी हिंदीत ही लिहिले नसेत किंवा टंकले नसेल. पुस्तके वाचण्याचा छंद होता, सरकारी वाचनालयात जाऊन भरपूर हिंदी /मराठी पुस्तके वाचत असे, एवढाच  काय तो मराठीचा संबंध.  सौ. ही दिल्लीचीच असल्यामुळे घरी कुणालाही मराठी वाचण्याची, लिहिण्याची आवड नव्हती. (आता मराठी मालिकांमुळे मुलांना थोडी तरी मराठी समजू लागली आहे).  तिसरी समस्या वय ५०सीच्या जवळ झाले होते आणि डोळ्यांना चष्मा ही लागलेला होता. तरी ही आपल्या मायबोलीत मराठीतच लिहिण्याच्या निश्चय केला. जिथे मराठी धड बोलता येत नाही तिथे मराठीत लिहायचा  निश्चय करणे म्हणजे एखाद्या पर्वतावर चढण्या सारखे कार्य.   

पहिली समस्या चिरंजीवानी दूर केली, आंग्ल भाषेत टंकून करून ही आपण मराठीत लिहू शकतो, हे कळले.  मराठीत लिहिण्याचा प्रयत्न सुरु केला. काही कविता मराठी सृष्टी कडे पाठविल्या, त्या सहजपणे तिथे प्रकाशित झाल्या. उत्साह वाढला.आपल्या तुटक्या-फुटक्या मराठीला सुद्धा अंतर्जालावर वाव आहे हे कळले.

एकदा आमच्या चिरंजीवाने बाबा तुम्ही स्वत:चा ब्लॉग लिहा, हा सल्ला दिला. कॉम्पुटर बसून ब्लॉग ही बनवून दिला, त्या वेळी ब्लॉगचे  काय  नाव द्यायचे हे सुचले नाही म्हणून स्वतचेच  नाव ब्लॉगला दिले आणि  लिहायला सुरुवात गेली.  ब्लॉग वर पहिली कविता कवितेचा कीड़ा/ डोक्यात शिरल्यावर काय होते ते लिहिली.  पण उत्साह काही दिवसांतच मावळला. कारण ब्लॉग  कुणीच वाचत नव्हते. 

कुणी तरी सांगितले चांगले लिहिण्यासाठी, चांगले वाचणे गरजेचे, नियमित पणे ब्लॉग वाचणे सुरु केले, ब्लॉग्स वाचत असताना, अनेक मराठी संकेत स्थळांबाबत माहित मिळाली. आपला ब्लॉग ही 'मराठी ब्लॉगर्स', मराठी ब्लॉग विश्व' आणि 'मराठी कॉर्नर'  या संकेत स्थळांशी दोन तीन वर्षांच्या कालखंडात जोडला.  अनेक मराठी वेबसाईट 'मिसळपाव, ऐसी अक्षरे' यांची माहिती मिळाली. तिथे हात आजमावला. हळू हळू कळू लागले, आपली मराठी धड नाही, लिहिताना अनेक चुका होतात. तरी ही चुका सुधारत-सुधारत लिहिणे सुरु ठेवण्याचा निश्चय केला.

पहिले वाटत होते, विचार केला कि डोक्यात कल्पना सहज येतात, पण हे काही खरे नव्हे.  डोक्यात आलेले विचार टंकणे ही  काही सहज कार्य नाही, हे ही जाणले.  त्या मुळे कधी कधी महिन्याभरात ही एखाद कविता किंवा क्षणिका लिहिणे कसे बसे जमत असे. शेवटी निश्चय केला 'स्वत: अनुभवलेले,  दिसलेले आणि समजलेले समाजातले सत्य लोकांसमोर मांडावे'. त्या दृष्टीने विचार सुरु केला. एकदा  सुट्टीच्या दिवशी सकाळी फिरायला जनकपुरीच्या डीस्ट्रीक्ट पार्क मध्ये जात होतो. तिथे काही म्हातारे दिवसभर रमी खेळायचे त्यांना पाहून मला  सारखे वाटायचे, यांच्या जीवनात आता काही राहिलेले नाही, फक्त मृत्यूची वाट पाहत हे जिवंत राहण्याचे नाटक करीत आहेत. (वाट मृत्युची).  ययाति कादंबरी  वाचताना जाणीव झाली कि  आपण ही आज ययाति सारखेच वागतो आहे, आपली भोगलिप्सा वाढतच चालली आहे, आपण सृष्टीतल्या सर्व जीवांना संपवतो आहे, असे सुरु राहिले तर माणूस एक दिवस स्वत:ला ही संपवणार आणि यातून   ययाति-- ययातिच्या मनातिल द्वंद्व  या कवितेचा जन्म झाला. काही वर्षांपूर्वी बाणभट्टची 'कादंबरी' वाचली होती. तरीही प्रेम म्हणजे काय, हे समजले नाही. असेच एकदा एका आजीला हा प्रश्न विचारला (हिम्मत करून) आणि  प्रेम म्हणजे काय? http://vivekpatait.blogspot.in/2011/05/blog-post_10.html  हा लेख खरडला.  एक विचित्र अनुभव वाट्याला आला.  हा लेख आधी मराठी सृष्टी वर प्रकशित केला होता. नंतर काही महिन्यांनी ब्लॉग वर टाकला. काही काळानंतर ऐसी अक्षरे  वर टाकला. त्या साईट वर मिळालेल्या प्रतिसाद वाचताना कळले,  काहींनी हा लेख चक्क चोरून आपल्या नावानी ब्लॉग वर टाकला.  ब्लॉग वर ही साहित्य चोरी होते आणि प्रामाणिक मराठी माणूस  ही अश्या प्रकारची चोरी करतो,  हे ही कळले. (अर्थातच त्यांचे ईमेल शोधून त्यांना जाब विचारला व त्यांनी व्यक्त केलेली दिलगिरी ही साईट वर प्रतिसादात दिली, तेंव्हा कुठे मनाला चैन मिळाले ). पण एक मात्र खरं, पहिल्यांदा वाटले आपण काही तरी निश्चित चांगले लिहित आहोत.  ही घटना उत्साह वाढविणारी नक्की होती. दिल्लीत राहत असल्यामुळे किंवा सत्तेच्या केंद्रस्थानी कार्यरत असल्यामुळे राजनीती वर ही काही वात्रटिका, क्षणिका आणि रूपक लिहिले.  सचिवालयात लागलेल्या आगीच्या आधारावर   हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर कर – ईशान उपनिषद हा लेख लिहला.  एकदा सकाळी बगीच्यात एका बेंच वर बसलो होतो आणि सूर्याचे कोवळे सोनेरी किरणे अंगावर पडत होती, मस्त वाटत होते,  ईशान उपनिषदातला श्लोक आठवला, मनातल्या मनात गुणगुणू लागलो: हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं...पण थोड्यावेळाने तीच सूर्य किरणे बोचू लागली. त्यातून या लेखाचा जन्म झाला  -सुवर्ण आवरणात झाकलेल सत्य

अश्या रीतीने लेखनाची गाडी सुरु झाली. तरी ही अनेक शंका होत्याच. आपला ब्लॉग लोक वाचतील का? आपल्या मोडक्या- तोडक्या  मराठीला ही लोक स्वीकारतील का?  पण ब्लॉग वाचकांनी माझ्या मराठीला सहजपणे स्वीकार केले त्या बाबत पुन्हा त्यांचे अभिनंदन करायला हवे तेवढे कमीच. या शिवाय माझ्यातील दडलेल्या लेखकाला जाग केल त्या मराठी सृष्टी या वेबसाईटचा ही मी ऋणी राहिलं. आपल्या अनुभव वरून आजच्या दिवशी मला एकच म्हणायचे आहे,  प्रत्येक माणूस जो विचार करतो, तो लिहू शकतो. फक्त लिहिण्याची सुरुवात करायची गरज आहे. 


Saturday, November 1, 2014

ताज्या क्षणिका – सत्तेचा आनंद, नागपुरी संत्रा आणि टोल







सत्तेचा आनंद



नाक कान डोळे
ठेवा सर्व बंद

गुपचूप चिडीचूप

  सत्तेचा आनंद





नागपुरी संत्रा



नागपुरी संत्रा

पहा कसा बहरला

लवकरच कळेल

गोड आहे कि कडू.



टोल प्रश्न



गादीवर बसतात

  सत्ताधारी झाला

प्रश्न टोलचा

झाडावर टांगला.

Sunday, October 26, 2014

दिवाळी -वैचारिक क्षणिका


चाईनीज बॉम्ब
जोरात फुटला
कानाचा परदा
कुणाचा हो फाटला.

फटाक्यांचा धूर
आकाशी दाटला
खोखलत-खोखलत
कुणाचा प्राण गेला.

आधी केली साफ -सफाई
मग पसरविला कचरा
दिवाळीचा सण मोठा
असा साजरा केला.

Saturday, October 25, 2014

फटाक्याचा आनंद (लघु कथा)


रस्त्याच्या एका बाजूला मोठे-मोठे  बंगले आणि दुसर्या बाजूला झोपडपट्टी. महानगरातले सामान्य दृश्य. दहा वर्षाचा चिन्या अशाच एका झोपडट्टीत रहात होता. इतर लहान मुलांसारखे  त्यालाही दिवाळीत अनार, चरखी इत्यादी उडविण्याची इच्छा होती. त्याच्या बाबानी एक छोटे से पिस्तुल त्याला दिवाळीसाठी घेऊन दिले होते. दिवस भर टिकल्या उडवून  तो बोर झाला. संध्याकाळी आकाशात उडणारे राकेट इत्यादी पाहून आपले बाबा आपल्यासाठी अनार इत्यादी फटाके आणू शकत नाही. आपण गरीब आहोत. ही जाणीव त्याला बोचू लागली. तो उदास झाला. 

चिन्या आत कशाला बसला आहे, बाहेर ये, समोरचा कोठीवाला मोठा अनार उडविणार आहे. बाबांचा आवाज ऐकून चिन्या बाहेर आला.  कोठी समोरच्या रस्त्यावर एका माणसाने अनार उडविला. एक उंच मोठा  रंग-बिरंगी कारंजा आकाशात चमकला. काय मजा आली ना! बाबांनी विचारले. चिन्या म्हणाला, कसली मजा, मी थोडी ना अनार उडविला आहे. चिन्या, बघ समोरच्या पोरांनी कश्या टाळ्या पिटल्या आणि उड्या मारल्या. त्यांनीही अनार उडविला नाही. बाबा समजावणीच्या सुरात म्हणाले. त्यांनी नाही पण त्यांच्या नौकराने उडविला नं,  चिन्या उतरला.  "तसे असते तर फक्त नौकराला आनंद मिळाला असता, त्या मुलांना नाही."  चिन्या काहीच बोलला नाही. बाबा पुढे म्हणाले, हे बघ चिन्या, मोठे लोक, राजा-महाराजे, शेट स्वत: काहीच करत नाही. त्यांचे नौकर त्यांच्यासाठी काम करतात. समज हा नौकर आपल्यासाठी अनार उडवितो आहे, बघ काय मजा येईल. चिन्याला म्हणाला बाबा म्हणजे तो आपला नौकर आहे, असं समजायचे. तेव्हड्यात चिन्याचे लक्ष समोर गेले. बाबा, तो नौकर पुन्हा अनार उडविणार आहे. त्या नौकर कडे पाहत, चिन्या ओरडला "ए नौकर हमारे लिये अनार उडाव". लाल, निळ्या, पांढऱ्या रंगांच्या छटा आकाशात पसरल्या. चिन्याने आनंदाने टाळ्या पिटत उड्या मारल्या.  चिन्याच्या चेहऱ्यावर हास्य पाहून, त्याच्या बाबांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

Thursday, October 23, 2014

दिवाळीच्या फुलझड्या


चंचला कमळा ती
हातातुनी निसटली
दिव्यांच्या उजेडात
कमळावर स्वार झाली

पीएम इन वेटिंग सारखा
सीएम इन वेटिंग राहिला 
कोकणचा राजा 
आज ही उपाशी राहिला 

अंधार दूर झाला 
वनवास आज संपला 
आज वोट पाउलांनी  
सत्ता घरात आली  

धनुष्य बाणाचा नेम
कसा काय चुकला?
शकुनी पास्यानी
दगा कसा दिला.


Saturday, October 18, 2014

बेडूक आणि सर्प


फार जुनी नीती कथा आहे, आटपाट नगरीत एका विहिरीत शेकडो बेडूक राहत होते. त्यांच्यात आपसांत भांडण झाले. एका बेडकाने तावातावाने विहीर सोडली. रागाच्या भरात जात असताना, एका सर्पाने त्यास पकडले. बेडकाने सर्पास त्याला सोडून देण्याची विनंती केली. सर्प म्हणाला, बेडूक हे माझे भोजन आहे, त्या मुळे तुला मी खाणारच. त्याही परिस्थितीत बेडूकाला एक भन्नाट कल्पना सुचली. तो सर्पास म्हणाला, तू मला खाईल, तर आज तुझे पोट भरेल, उद्या तुला पुन्हा भूक लागेल. मला सोडेल तर महिन्या भराच्या तुझ्या जेवणाची व्यवस्था करू शकतो. सर्पाने विचारले, ते कसें शक्य आहे? बेडूक म्हणाला इथे जवळच एक विहीर आहे, त्यात शेंकडो बेडूक राहतात, त्यात काही माझे वैरी आहेत. मी तुला विहिरी पर्यंत घेऊन जातो. महिना भर विहिरीत राहून, मी दाखविलेल्या माझ्या सर्व विरोधकांना तू खाऊन टाक. पण अट एकच, महिन्याभरा नंतर तुला विहीर सोडावी लागेल. सर्पाला काय, आनंद झाला, त्याने पटकन बेडूकाची अट मान्य केली. तो बेडूक सर्पाला घेऊन विहिरीत आला. महिन्याभरात सर्पाने त्याच्या सर्व विरोधकांचा फडशा पाडला. आता बेडूकाने पूर्वीच्या अटीप्रमाणे  सर्पास विहीर सोडण्याची विनंती केली. सर्प म्हणाला, अटी वैगरे जुनी गोष्ट झाली, बेडूक माझे जेवण आहे, विहिरीतल्या सर्व बेडूकांचा फडशा पडल्या शिवाय मी काही विहीर सोडणार नाही म्हणत सर्पाने त्या बेडकाला गिळून टकले. सर्पाला विहिरीत आमंत्रित करण्याचा हा परिणाम होणारच.


Monday, October 6, 2014

इमानदार माणूस आणि त्याचा झाडू



काल झाडू विकत आणायला गेलो. भाव विचारला. दुकानदाराने चक्क ५० रुपये मागितले. एका टुकार झाडू साठी ५० रुपये. दुकानदाराला जाब विचारला. तो म्हणाला आजकाल झाडू के अच्छे दिन आएं हैं, डिमांड बढ़ गई है. डिज़ाइनर झाडू चाहिये तो १०० रुपये में मिलेगा. फोटू खिंचाने के काम आएगा. मी तर चाटच झालो. आता काय म्हणणार ५० रुपये मोजून झाडू आणला.

खरंच, गेल्या वर्षी एका इमानदार माणसाने हातात झाडू घेतला होता. तो सर्वांना म्हणाला त्याच्या हातातला झाडू चमत्कारी आहे, या झाडूने तो सर्व भ्रष्टाचार स्वच्छ करणार. झाडू लावत-लावत त्याने भ्रष्टाचार रुपी कचरा गोळा केला आणि तो इंद्रप्रस्थ नगरीच्या सिंहासन जवळ पोहचला. पाहतो तर काय सिंहासनाचा एक पाया तुटलेला. त्याने गोळा केलेला भ्रष्टाचार रुपी कचरा त्या पायाच्या खाली ठेवला आणि सिंहासनावर बसला. भ्रष्टाचार वैगरेह विसरून गेला आणि चमत्कारी झाडू ही अडगळीत ठेऊन दिला. काही महिने राज्य केल्यावर त्याला चैन पडेनासे झाले. दिवसा उजेडी हस्तिनापूरचे स्वप्न दिसू लागले. त्याने सिंहासन सोडले आणि सैन्य घेऊन हस्तिनापूरच्या दिशेने प्रयाण केले. परंतु चतुर द्वारकेच्या कृष्णाने त्याचा डाव हाणून पडला. आता इमानदार माणसाची स्थिती ‘धोबी का कुत्ता घर का न घाट का’ सारखी झाली. इंद्रप्रस्थी परतल्यावर त्याला अडगळीत ठेवलेल्या चमत्कारी झाडूची आठवण आली. पण त्याला झाडू सापडला नाही.

इकडे द्वारकेच्या राजाने झाडू पळविला या चमत्कारी झाडूने देशातला सर्व कचरा स्वच्छ करेन असे त्याने जनतेस म्हंटले आणि जनतेला ही कचरा स्वच्छ करण्याचे आव्हान केले. आता राजाच जर रस्त्यावर झाडू मारण्यास उतरणार तर नेता अभिनेता, खेडाळू का मागे राहणार.  नेते, अभिनेते सर्व हातात  झाडू घेऊन  कचरा स्वच्छ करण्यास रस्त्यावर उतरले.  अडगळीत पडलेला झाडू आता मोठ्या-मोठ्या लोकांच्या बैठकीत पोहचला. तेंडल्या ही क्रिकेट बेट सोडून सकाळी-सकाळी झाडू हातात घेऊन रस्ते स्वच्छ करताना दूरदर्शन वर दिसू लागला. तेंडूलकर सारखा रोल मोडेल जर हातात झाडू घेईल तर मोठ्या मोठ्या कंपन्या ही झाडूच्या बाजारात उतरतील, हे आलंच. सकाळी सकाळी दूरदर्शन वर विज्ञापनात हातात झाड़ू घेउन  सलमान खान म्हणत आहे,

तेरी गली, मेरी गली से साफ क्यों?
गली को चमकाये, लिवर ब्रांड झाडू.

माधुरी स्टायल स्माईल करत एक हिरोईन म्हणत आहे,

माधुरी के दातों की तरह चमकाए
आपके मोहल्ले को, चमको ब्रांड झाड़ू.

बेचारा इमानदार माणसाच काय झालं. इमानदार माणूस या घडी  कपाळावर हात ठेऊन विचार करीत आहे, गादी गेली, झाडू गेला ...

एकच होता झाडू
तो ही त्याने पळविला
आता स्वच्छ करू कसा
भ्रष्टाचार रुपी कचरा.

पण आता त्याच्या शब्दांवर पुन्हा लोक विश्वास ठेवतील का?