Thursday, November 22, 2012

रावण


काल संध्याकाळी जनकपुरीतल्या रामलीलेत ‘रावण दहनाची’ लीला बघितली. दर दसऱ्याला रावण वध होतो, पुतळे फुंकले जातात, तरीही रावण आज ही जिवंत आहे, का? ह्याच प्रश्नाचे उत्तर शोधत घरी परतलो.

दरवर्षी होतो रावण वध

तरीही रावण मरत नाही.
रावण अजर आहे
रावण अमर आहे.

रावण वसतो, आपल्याच हृदयात
काम-क्रोध मोह-माया, मद-मत्सर
इत्यादी आयुधांनी सज्ज रावण,
सदैव जागवतो असतो मनात,
दडलेल्या सुप्त राक्षसी महत्वाकांक्षा.

कोण लढणार, कसे लढणार
मनात दडलेल्या रावणाशी.
युद्धापूर्वीच जिंकतो रावण
ठरलेला असतो
रामाच्या नशीबी वनवास.

रावण अजर आहे
रावण अमर आहे.

Sunday, November 11, 2012

अवसेची रात्र आणि एक पणती


सर्वत्र पसरलेला गर्द काळोख, भूक, आत्महत्या, भ्रष्टाचार , महंगाई , इत्यादी आसुरी शक्ती प्रबळ झालेल्या आहे, तरी ही एक पणती.

अवसेच्या राती
निराश मनी
पेटविते ठिणगी आशेची
एक पणती

अवसेच्या राती
पांढर्या बुरख्या खाली
लपलेले काळे चेहरे
दाखविते जनतेला.
एक पणती.
अवसेच्या राती
सत्य आणि न्यायाची
प्रेमाची आणि सोख्याची
पेटवू आपल्या हृदयी
एक पणती.

Saturday, November 10, 2012

न्याय देवता


न्यायाच्या आशेने लोक कोर्टात जातात, सामान्य माणसांना बहुधा तिथे न्याय मिळत नाही कारण न्याय देवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असते. न्याय होणार तरी कसा, सत्य दिसणार तरी कसे ???


*अस्मत द्रोपदीची
लुटल्या गेली दरबारी
तरी तिला दिसले नाही
तिच्या डोळयांवर  होती पट्टी
गांधारी सारखी.

*अब्रू

म्हणतात ना, शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. एकदा कोर्टाच्या पायरी वर पाय ठेवला कि ... त्या केंव्हा संपतील कुणीच सांगू शकत नाही. 



 तो कोर्टाची पायरी चढला 
आणि चढतच गेला, 
चढतच गेला ....
अखेर!
दरबारी चित्रगुप्ताच्या 
त्याचा निकाल लागला