Saturday, July 28, 2012

वाहतो रिश्वत जुडी



सदोबा हा सामान्य माणूस, कधीही कुणाला त्रास न देणारा. रहस्य, रोमांच विरहित- एका रेषेत चालणारा सरळ-सोप आयुष्य. वडील गेल्यावर संसाराचा गाडा त्याचा खांद्यावर आला. वडिलांच्या मृत्यु प्रमाण पत्रासाठी सदोबाला पहिल्यांदा रिश्वत जुडी अर्पण करावी लागली. हळूहळू सदोबाला कळले प्रत्येक कार्यासाठी रिश्वत ही द्यावीच लागते. मग डोक्याला ताप कशाला. सदोबा कसलीही चिडचिड व कटकट न करता रिश्वत जुडी आनंदाने वाहायचे. रिश्वत जुडी मुळे सदोबांची सर्व कामे त्वरित पूर्ण व्हायची. सदोबांचे ठाम मत झाले. “रिश्वत द्यावी लागणारच आहे तर मग आनंदानी द्या. त्या मुळे रिश्वत देवी प्रसन्न होते व कार्य सिद्ध होते. कुठल्या देवतेच्या चरणी किती रिश्वत दिल्याने कार्यसिद्ध होते- हे सदोबानी आपल्या अनुभवाने लवकरच आत्मसात केले.

त्यांची बायको प्रसूत झाली, प्रसूतिगृहातून रडण्याचा आवाज ऐकू आला. दाई बाहेर आली- आनंदाने घोषणा केली, साहेब मुलगा झाला आहे. सदोबानी शंभराची एक नोट तिच्या हातात ठेवली आणि मुलाला पाह्यला आत गेले. हॉस्पिटल मध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. त्याच क्षणापासून पोरासाठी त्यांनी रिश्वत देवीची आराधना सुरु झाली. मुलाच जन्म प्रमाण पत्र असो किंवा राशन कार्ड मध्ये नावाची नोंदणी सदोबानी आनंदानी रिश्वतजुडी रिश्वत देवीला अर्पण केली. डोनेशनरुपी रिश्वतजुडी अर्पणकरून मुलाला चांगल्या शाळेत आणि नंतर चांगल्या कालेजात प्रवेश मिळवून दिला. वेळ प्रसंगी स्वत:च्या सर्व इच्छा मारून व कर्ज घेऊन सुद्धा सदोबानी रिश्वत देवीला प्रसन्न केले. शेवटी वर्षभराच्या पगारा इतकी रिश्वत जुडी वाहून आपल्या मुलाला नौकरीत रुजू केले.

सदोबा प्रामाणिक होते तसे पक्के हिशोबी ही होते. मुलाचे लग्न करताना आतापर्यंत वाहलेल्या रिश्वत जुड्यांचा हिशेब त्यांनी केला व व्याजासकट भरपूर हुंडा घेऊन आपल्या मुलाचे लग्न केले. त्या वेळी रिश्वत देवीच्या चरणी वाहलेली जुडी सार्थकी लागल्याचा आनंद सदोबाना झाला. एके दिवशी सदोबांच्या छातीत कळ उठली. आपला शेवट जवळ आला हे त्यांना कळल. स्वर्गात जाण्यासाठी कदाचित चित्रगुप्तालाही रिश्वत जुडी वाहावी लागेल असे त्यांना वाटले. त्यांनी पोराला हाक मारली व आपली शेवटची इच्छा व्यक्त केली. मुलानेही त्यांचा इच्छेचा सम्मान करत त्यांचा चित्तेवर  शंभर रुपयांच्या नोटांची एक जुडी वाहिली.
 
अखेर सदोबा चित्रगुप्ताच्या दरबारी पोहचले. चित्रगुप्ताने सदोबाला विचारले तुला कुठे पाठवू- स्वर्गात की नरकात? सदोबाने चित्रगुप्ताला साक्षात दंडवत केला व बरोबर आणलेल्या नोटांची एक जुडी चित्रगुप्ताच्या चरणी अर्पण केली व म्हणाला- आपण जे कराल ते योग्यच, फक्त एकच विनंती - पुन्हा भारतभूमीवर पाठवू नका, रिश्वत देवीची पूजा करत करत मी थकून गेलो आहे. चित्रगुप्त मिस्कीलपणे हसत म्हणाला- सदोबा तू पृथ्वीवर कधी ही कुणाला कष्ट दिले नाही, त्यामुळे मी तुला नरकात पाठवू शकत नाही. पण रिश्वत देऊन मला विकत घेऊ पाहत होता. तू विसरलाच ही भारतभूमी नाही, हे चित्रगुप्ताचे न्यायालय आहे. तुझ्या या अपराधामुळे तुला स्वर्गात ही पाठविता येत नाही. तुला फक्त एकच शिक्षा- सदोबांच्या डोळ्यासमोर अंधारी आली. 


अचानक एक बायकी आवाज त्यांना ऐकू आला- साहेब मुलगा झाला आहे! सदोबाला कळून चुकल आपल्या नशिबी पुन्हा रिश्वत जुडी वहाण आल ! नशिबाला दोष देत सदोबानी टाS S हो फोडला.

Thursday, July 12, 2012

साठाउत्तराची कहाणी-पब्लिक, प्राईवेट पार्टनरशिप प्रोजेक्ट


सूतजी म्हणाले, मुनिनों पब्लिक, प्राईवेट पार्टनरशिप या विषयावर एक कथा आज तुम्हाला सांगतो.

अवंती नगरीच्या राजकुमारी लक्ष्मीदेवीचे एका राक्षसाने अपहरण केले. राजाने जो कुणी राजकुमारीला राक्षसाच्या तावडीतून सोडवेल त्याला अर्धे राज्य देण्याची घोषणा केली आणि त्याचा विवाह राजकुमारी लक्ष्मीदेवी बरोबर लावण्यात येईल.  

विदिशाचा राजकुमार विष्णुवर्धन घोड्यावर स्वार होऊन  राजकुमारीला शोधण्यास निघाला. पुष्कळ दिवस निघून गेले  त्याला राजकुमारीचा पत्ता लागला नाही. निराशा त्याचा मनात घर करू लागली. परत आपल्या राज्यात परतावे कि आणखीन शोध घ्यावा, त्याला काही सुचेनासे झाले होते.  अशा निराशेच्या क्षणी त्याला एक बुटका भेटला. राजकुमाराने त्याला राजकुमारी बद्धल विचारले. बुटका म्हणाला:  राक्षसाने राजकुमारीला एका किल्यात बंदिस्त करून ठेवले आहे. मला ती जागा माहित आहे. राजकुमार म्हणाला, बुटक्या मला ती जागा दाखव, आपण  दोघ मिळून   राजकुमारीला राक्षसाच्या तावडीतून मुक्त करू. 

राजकुमाराने बुटक्याला आपल्या सोबत घेतले. दोघांचे राक्षसा बरोबर युद्ध झाले. दोघांनी मिळून राक्षसास ठार मारले. राजकुमारी लक्ष्मीदेवी मुक्त झाली. राजकुमाराने तिला आपल्या सोबत घोड्यावर बसविले आणि तो अवंती नगरीच्या दिशेने निघाला. राजकुमारी घरी परतली. राजाला अत्यंत आनंद झाला. दिलेल्या वचनाचे पालन करीत, राजाने राजकुमार विष्णुवर्धन बरोबर राजकुमारीचे लगीन लावले व त्याला आपले अर्धे राज्य ही दिले. सर्वत्र आनंदी-आनंद पसरला.  


तुमच्या मनात एक प्रश्न असेलच, त्या बुटक्याचे काय झाले असेल? युद्धात बुटक्याचा एक डोळा फुटला आणि एक पाय तुटला. कसा-बसा तो अवंती नगरीत येऊन पोहचला. त्याला कुणीही ओळखले नाही.  बुटका तिथल्या चौरस्त्यावर भीक मागून कसाबसा आपल आयुष्य कंठू लागला. त्याला राजकुमारी तर मिळाली नाही पण राजा कडून काही बक्षीस ही मिळाले नाही.  आपण मूर्ख बनलो,  हा एकच विचार त्याचा मनात सदैव यायचा.

सूतजी म्हणाले, मुनिनों, कलयुगात जम्बूद्विपे ज्याला राजकुमार, बुटका, कोण हे कळेल पब्लिक, प्राईवेट पार्टनरशिप प्रोजेक्टच्या माध्यमातून त्यावर लक्ष्मीदेवीची कृपा होईल.

साठाउत्तराची कहाणी सकाळ संपूर्ण. इति. 

Monday, July 9, 2012

परमेश्वर कोणाला प्राप्त होतो? अमरतेचा आनंद कुणाला मिळतो?



विद्यां चाविद्यां च यस्तद् वेदोभय्ँ सह 
अविद्या मृत्युं तीर्त्वा विद्यामृतम्श्नुते.
[ईशोपनिषद (मंत्र ११) ]


शाब्दिक अर्थ: विद्या (अध्यात्म ज्ञान ) परमेश्वराला जाणण्याचे ज्ञान. आणि आणि अविद्याच्या  (भौतिक विद्या) मृत्यु वर विजय प्राप्तीचे ज्ञान. जो व्यक्ती दोन्ही ज्ञान एकाच वेळी जाणतो. तो जीवनाचा पूर्ण आनंद ही उपभोगतो आणि तो जन्म-मृत्युच्या फेऱ्यातून मुक्त होऊन अमरत्वाच्या पूर्ण आनंद उपभोगू शकतो.

प्रश्न आहे, परेमेश्वराला कोण जाणतो?

परमेश्वराचे भजन, ध्यान, व्रत-उपवास, तप-जप करून परमेश्वराची प्राप्ती होते का? तीर्थक्षेत्री जाऊन देवतांचे दर्शन घेतल्यास, हिमालयात तपस्या केल्याने, दान-पुण्य केल्याने परमेश्वराची प्राप्ती होते का? वेद-शास्त्र, पुराणांचे अध्ययन केल्याने परमेश्वराची प्राप्ती होते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर “नाही” हेच होय.

परमेश्वर कोणाला प्राप्त होतो? अमरतेचा आनंद कुणाला मिळतो?


ईशान्य उपनिषदच्या सातव्या मंत्रात ऋषी म्हणतात:



यास्मिन् सर्वाणी भूतान्यात्मैवाभूद् विजानत 
तत्र को मोह: क: शोक एकत्व मनुपश्यत 


जो व्यक्ती सर्व प्राण्यांमध्ये एक मात्र परमतत्व अर्थात परमेश्वारालाच  पाहतो. त्याला सर्वत्रच परमेश्वराचे दर्शन होतात. सर्व परमेश्वराची लीला आहे हे तो जाणतो, त्या मुळे त्याला कुठल्या ही प्राण्यापासून भय वाटत नाही. तो कुणाशीही घृणा करीत नाही. सर्व प्राण्यांवर तो केवळ प्रेम करतो. असा व्यक्ती अमृत्वतेचा आनंद प्राप्त करतो.  या वरून एक जुनी कथा आठवली. एक ऋषी सरोवरात स्नान  करीत होते. काठावरच्या एका झाडाच्या फांदीवरून एक विंचू पाण्यात पडला. विंचू पाण्यात बुडू लागला. त्या ऋषीने विन्चूला आपल्या हातानी उचलले. आपल्या स्वभावानुसार त्या विंचवाने ऋषीस डसले. त्या ऋषींच्या  हातातून विन्चू पाण्यात पडला.  त्यांनी पुन्हा विन्चूला हातात उचलले. विन्चू पुन्हा त्यांना डसला. असे दोन-तीनदा घडले. अखेर विंचूला वाचविण्यात ऋषीला यश मिळाले. विंचू सुरक्षित जमिनीवर पोहचला.  एका शिष्याला राहवले नाही त्यांनी ऋषीस  विचारले हा विंचू सारखा तुम्हाला दंश देत होता तरीही तुम्ही त्याला का वाचविले.  या विन्चूत ही परमेश्वराचा अंश आहे. माझ्याप्रमाणे त्याला ही जगण्याचा अधिकार आहे. मी त्याला वाचविले नसते तर तो पाण्यात बुडाला असता. हाताला  अत्यंत वेदना होत असूनही त्या ऋषींच्या चेहऱ्यावर विंचवाला वाचवण्याचा आनंद दिसत होता. तो ऋषी मोह-माया, राग-द्वेष इत्यादी विकारांपासून मुक्त होता आणि संसारात राहून ही खऱ्या अर्थाने अमरतेचा आनंद उपभोगत होता.

महर्षी वशिष्ठ आणि विश्वामित्रांची कथा ही आपणास माहित असेलच. पुत्रांची त्या झाली तरीही विश्वमित्रांप्रती द्वेष-भावना वशिष्ठांच्या मनात क्षणभरही आली नाही.

सृष्टीच्या कणा-कणा परमेश्वराचे अस्तित्व आहे हे उपनिषद कालीन ऋषींना ज्ञात होते.  हिंसक प्राण्यांविषयी ही त्यांच्या मनात द्वेष भावना नव्हती. त्यांच्या आश्रमात वन्य-प्राणीही माणसांसोबत निर्भिकपणे विचरण करीत होते असे अनेक उल्लेख आपल्या पुराण कथांमध्ये आहे.

आज वैज्ञानिक “गॉड पार्टिकल” शोधण्याचा दावा करीत आहे.  हा पार्टिकल ब्रह्मांडातल्या प्रत्येक अनु-रेणूत आहे असा त्यांचा दावा आहे. या प्रयोग मुळे ब्रह्मांडाचे अनेक रहस्य आपल्याला कळतील आणि  अनेक क्षेत्रात प्रगतीला ही चालना मिळेल अस अनेक वैज्ञानिकांच मत आहे.  गेल्या शंभर वर्षांत माणसाने भरपूर प्रगती केली आहे. पण त्याच बरोबर आपल्या फायद्यासाठी पृथ्वीवरील दुसर्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेतला आहे.  एवढंच नव्हे तर अत्याधुनिक अस्त्रांचा वापर माणूस एका-दुसऱ्याचा विरुद्ध करीत आहे.  खरं म्हणाल तर सध्या तरी माणूस नावाचा प्राणी आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीव घेण्यास मागे-पुढे पाहत नाही आहे. या घृणा आणि द्वेषाच्या वातावरणामुळे सृष्टीतले अनेक जीव नष्ट झाले आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.  जर एकाच “गॉड पार्टिकल” आपली निर्मिती झाली आहे तर प्रत्येकाचे अस्तित्व एका-दुसऱ्याच्या अस्तित्वावर टिकून आहे, एक नष्ट झाला तर दुसरा ही होईल हे साहजिक आहे. माणूस नावाचा प्राणी ही अमर होऊ शकणार नाही.

सारांश: जो व्यक्ती सर्व प्राण्यांमध्ये एक मात्र परमतत्व अर्थात परमेश्वारालाच पाहतो, तोच परमेश्वराला जाणतो. सर्व प्राण्यांवर तो केवळ प्रेम करतो. सर्वांच्या जगण्याचा अधिकाराचा सम्मान करतो. असा व्यक्ती अमृत्वतेचा आनंद प्राप्त करतो.

Thursday, July 5, 2012

वाटते भीती


वाटते भीती 
अभिव्यक्तीची 
सत्याची.

कानात बोलली
छाटून टाकली 
जीभ तिची.

शब्दात वाचली 
जाळून टाकली 
पुस्तके ती.

रेषांत दिसली 
पुसोनी टाकली.
चित्रे ती.