Sunday, December 18, 2011

वाट मृत्युची



जनकपुरितल्य़ा
डिस्ट्रीक्ट पार्क मध्ये

चार 'बूढ़े'

पाथरलेल्य़ा डोळ्यानी
पाहत होते वाट मृत्युची
पण देखावा मात्र
'रमी' खेळण्याचा 

Saturday, December 10, 2011

'युगधर्म'


निवडूक जिंकण्यासाठी आजचे नेता कुठल्याही थरावर जातात. कालपर्यंत जे विरोधी होते ते निवडणूक जवळ आल्यावर मित्र बनतात. आज धर्मयुद्ध म्हणजे सत्तेसाठी युद्ध! आता विचार करा जर महाभारताच्या वेळी भारतात प्रजातंत्र असते आणि दुर्योधनाच्या सभेत लाखोंची भीड असती तर त्या वेळी 'आजच्या कृष्णाने' आजच्या अर्जुनास काय उपदेश दिला असता?

'युगधर्म'

पाहुनी लाखोंची भीड़ 
दुर्योधनाच्या सभेत

संभ्रमि अर्जुनाने विचारले 
'योगेश्वर' माझा 'धर्म' काय? 

कृष्णाने हाकली 'मर्सडीज'
पोहोचला दुर्योधनाच्या 'तंबूत' 

आणि वदला: 
'पार्थ' हाच आहे आजचा 
'युगधर्म'.

Tuesday, December 6, 2011

प्रोडक्ट 'कविता


शब्दांच्या साच्यात
आम्बट - गोड, कडू - तिखट
भावनांचा रस ओततो
आणि तैयार करतो
फास्टफूड सारखा स्वादिष्ट
प्रोडक्ट 'कविता'.

Saturday, December 3, 2011

निसबत अर्थात सम्बन्ध -प्रश्नोत्तर स्वरूपाचा काव्य प्रकार



हिंदीचे आदि कवी अमीर खुसरोंनी खड़ीबोलीमधे (हिंदीची बोली जी दिल्ली- मेरठ भागात बोलली जाते) दोन पूर्णतया भिन्न वस्तुंमधे सम्बन्ध अर्थात समानता दाखविण्यासाठी 'निसबत' हा प्रश्नोत्तर स्वरूपाचा काव्य प्रकार हिंदीत आणला होता- त्यांच्याच एका 'निसबतचा' मराठी अनुवाद:


मुर्गा आणि बादशाह

बादशाह और मुर्ग में क्या निसबत है?
दोनों 'ताज' पहनते हैं.


मराठी अनुवाद
 
बादशाह आणि कोंबडयामधे आहे काय सम्बन्ध?
दोघांच्या डोक्यावर 'ताज' (मुकुट) असतो.


युग बदलला- कालचा बादशाह आजचा नेता झाला आहे. नेत्याचा सम्बन्ध कुठल्या प्राण्याशी दाखविता येईल. सरडयाशी ? पहा:-
 

नेता आणि सरडा

नेता आणि सरडयामधे आहे काय सम्बन्ध?

 
सन्धी-साधू दोघ, बदलतात अपुले रंग.
 

सरडया प्रमाणे नेताही रंग (पार्टी) बदलतो. कधी तो भगवा होतो, कधी हिरवा, कधी नीळा तर कधी चक्क रंगहीन अर्थात धर्मनिरपेक्ष होतो. त्याच प्रमाणे नेत्याचा सम्बन्ध रेडयाशी दाखविता येतो:-
 

नेता आणि रेडा
 
नेता आणि रेड्यामधे आहे काय सम्बन्ध? 


ढेरपोटी दोघे  खातात 'चारा' सदैव.
(इथे 'चारा' ही दोघांतली समानता आहे).


Saturday, November 26, 2011

बालीचा समुद्र किनारा आणि जलपरी/ एक अनुभव

सूर्यास्ताची वाट पहात बालीच्या एक निवांत  समुद्र किनार्यावर मी उभा होतो. सोनेरी प्रकाशात फेसाळी लाटांवर क्रीडा करणाऱ्या गोरंग स्त्री- पुरुषांना पहात समुद्री लाटांचे कधी  न ऐकलेले  संगीताचा आनंद घेत होतो. अचानक दिसली मला ती, मलयवासिनी, वस्त्रांच्या कोशात दडलेली जलपरीच, ती संकोचलेल्या डोळ्यांनी पहात होती फेसाळी लाटांवर कल्लोळ करणाऱ्या गोर्या मत्स्य ललनांना. पण डोळ्यांत दिसत  होती तिच्या एक अनामिक भीती. दूर समुद्रात तिचा राजा खुणावत होता तिला समुद्रात उतरण्यासाठी, राजाची मर्जी राखण्यासाठी शेवटी ती बाहेर पडली वस्त्रांच्या कोषातूनी. सोनेरी रंगाच्या टू-पीस बिकनी मधे. घाबरलेली, बावरलेली, संकोचलेली, लाजत-लाजत  हातानी डोळे झाकत धावत निघाली समुद्रांच्या लाटांवर स्वार होण्या साठी, ती जलपरी. पाय फिसलुनी थेट पडली माझिया अंगावरती. सर्वांग भिजले. तिच्या स्पर्शाने रोमांचित झालो. तांबूस रंगाची सडपातळ भिजलेली   सोनेरी प्रकाशात दिसत होती ती विश्व सुंदरी सारखी.  ती चक्क भारतीय स्त्रियां सारखी लाजली व धावत जाऊन बिलगली आपल्या राजाला. मला ही हसू आले पहिल्यांदाच बिकनी मधील सुंदरीला लाजताना पहिले होते. किंबहुना पहिल्यांदाच तिने बिकनी घातली असेल.  न जाणे का, सारखे लक्ष तिच्याच कडे जात होते.

थोड्या वेळात तिचा संकोच दूर झाला, कोणी पहात असेल तर पाहू द्या आपल्याला काय. जगाला विसरून ती जलपरी आपल्या राजासोबत खेळू लागली. दुरून का  होईना त्यांचा आनंदात मी ही नकळत शामिल झालो होतो. दोघही किनार्यावर आले, ती निसंकोचपणे बिकनी घातलेले फोटो आपल्या राजाला काढू देत होती. अचानक तिचा राजा माझ्या जवळ आला व  आपला केमेरा  देत, दोघांचे फोटो काढण्याची विनंती केली. नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. आनंदाने  निरनिरळ्या पोज मधे त्यांचे  फोटो काढू लागलो. मधेच तिच्या राजाने तिला खुणावले व आपल्या तोंडावर बोट ठेवले. ती हसू लागली. हसता-हसता एखाद्या खट्याळ मुली प्रमाणे राजाला बेसावध पाहून त्याचे  कडकडीत चुंबन घेतले. गोर्या ललना सुद्धा लाजतील असे. तो क्षणभर बावरला पण त्याने ही तिचे तेवढ्यात जोशात चुंबन घेतले. मी ही क्षणभर बावरलो, पण आतला फोटोग्राफर जागा झाला. त्या दिव्य क्षणांचे  जेवढे काढू शकलो फोटो काढले. पण त्यांच्या प्रेमाच्या ओल्यावाची जाणीव मलाही झाली. ती परत आपल्या राजा बरोबर समुद्रांच्या लाटांवर खेळू लागली.

संध्याकाळ झाली सूर्य देवता समुद्रांच्या सोनेरी लाटांत विलीन झाले. अद्भुत दृश्य होते ते.  मी ही परत फिरलो. ती जलपरी सुद्धा पुन्हा एकदा काळ्या-बुरख्याचा कोशात सामावली होती. मनात एक प्रश्न उद्भवला, स्वत: च्या देशात गेल्यावर तिला जलपरी सारखे आपल्या राजा बरोबर समुद्राच्या लाटांबरोबर खेळता येईल का?  पुरुषप्रधान समाजात महिलांच्या कित्येक इच्छा अपूर्णच राहतात. किंबहुना जलपरी होण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होत नाही. कमीत-कमी तिच्या जवळ बालीची आठवण म्हणून फोटो तर राहतील.

Monday, November 7, 2011

दोन क्षणिका -साजण/ सजणी (१) डास/ (२) वीज



(१) डास
चोरा सारखा बिछान्यात शिरतो
गोड गोड गाणी तो म्हणतो
चुम्बन घेतो,कधी चावतो
सारी रात्र मला तो छळतो
का सखी साजण
ना सखी डास.

(२) वीज
कधी येते, कधी जाते
सारी रात्र मला छळते
तिच्या विना न चैन मिळे
का सखा सजणी
ना सखा वीज.

Tuesday, November 1, 2011

क्षणिका -साजण/ नेता


कधी-काळी येतो
गोड-गोड बोलतो.
खोटी वचने देतो
फसवून मला निघूनी जातो.
का सखी साजण? 
ना सखी नेता

Saturday, October 29, 2011

दोन क्षणिका - बायको आणि दारू, मोलकरीण








 दारू आणि बायको

जेवढी जुनी तेवढी चांगली.
स्वाद मात्र दोघींचा 
नेहमीच कडू असतो.







एक मोलकरीण, दुजी बायको
दोन्ही करतात घरची कामे
एकीला मिळतो पगार
 दुजीच्या नशीबी बेगार.


Wednesday, October 26, 2011

एक पणती


सर्वत्र पसरलेला गर्द काळोख, भूख, आत्महत्या, भ्रष्टाचार, महागाई  इत्यादी   आसुरी शक्ती प्रबळ झालेल्या आहे तरीही एक पणती .....



एक मिणमिणती पणती
अवसेच्या राती
निराश मनी 
पेटविते ठिणगी आशेची.

एक  पणती
अवसेच्या राती 
पांढर्या बुरख्या खाली 
लपलेले काळे चेहरे
दाखविते जनतेला. 

एक पणती 
अवसेच्या राती 
सत्य आणि न्यायाची 
प्रेमाची आणि सोख्याची 
पेटवू  आपल्या हृदयी.

Friday, October 21, 2011

भ्रष्टाचार / काचेचे घर


प्रभु येशु मसीहच्या आयुष्यातील एक प्रसंग. काही स्त्री-पुरुष एका बाईला दगड मारित होते. येशुनी विचारले, या बाईला का म्हणून दगड मारित आहात? लोक उतरले, ही बाई पापीण आहे. येशुनी म्हणाले. "ठीक आहे, ज्यानी पाप नाही केले तो या बाईला दगड मारू शकतो". ते स्त्री - पुरुष विचारवंत व प्रज्ञावान होते. त्याना येशुच्या बोलण्याचा अर्थ कळला. लहान- मोठे का होईना, आयुष्यात कधी ना कधी पापकर्म प्रत्येकाच्या हातातून घडले होते. त्यानी दगड फेकून दिले व आपल्या पापां साठी येशुंची क्षमा मागितली. सन्दर्भ वेगळा असला तरी हा प्रसंग फार बोलका आहे. 

व्यवस्थेच्या पहार्यात 'शक्तिशाली' लोक काचेचे मोठे - मोठे बंगले बांधतात. एखादा स्वत:ला ईमानदार समजणारा माणूस त्या बंगल्यावर दगड फेकतो. परिणाम काय होतो. दगड बंगल्याला तर लागत नाही, पण बंगल्यातल्य़ा माणसाने फेकलेल्या दगडाने ईमानदार माणसाच्या घरातली एखादी 'काचेची खिड़की' निश्चित फूटतेच. सरकारी नौकरित काम करणाऱ्याना असा अनुभव बरेचदा येतो. कारण स्पष्ट आहे.आपण कितीही ईमानदारीच्या सीमेंट कांक्रीटनी घर बांधले तरीही बहुधा एखादी खिड़की ही तरी काचेची असतेच. निष्कलंकित चन्द्रमा वर ही डाग हा असतोच. 



आजकाल भ्रष्टाचाराचा विरुद्ध लढाईच्या मोठ्या मोठ्या घोषणा होत आहेत. आता भ्रष्टाचाराचा विरुद्ध लढाई कशी लढायची व कोण लढणार हा प्रश्न बिकट आहे. या साठी आपल्याला भ्रष्टाचाराचा साधा आणि सरळ अर्थ कळला पहिजे. "मोबदला दिल्या बिना कुठला ही फायदा घेणे म्हणजे भ्रष्टाचार", मग तो नाटक सिनेमाचा पास असो, दिवाळ ची मिठाई असो किंवा बिना लाईनीत लागता मिळालेल रेलवे तिकीट का असेना हा भ्रष्टाचार आहे. हे आपल्याला समजल पाहिजे. 


आपल्या सारख्या सामान्य माणसानी आपापल्या घरातील असणाऱ्या काचेच्या खिडक्या स्वत:च फोडून टाकल्या तर आपल्या घरा समोर असणारे काचेचे बंगले आपोआप अदृश्य होतील. फक्त आपल्याला आपल आत्मनिरिक्षण करावे लागेल. 

Monday, October 17, 2011

चारोळी स्वरूपातला शब्दकोष/ खालिकबारी



अंग्रेजीची 'daughter '
हिंदीत झाली 'बेटी'
मराठी आईची 'लेक'
शोभते खरी राजकुमारी.

दिल्ली मुंबई सारखी सत्ता व व्यापाराचे केंद्र असलेल्या मोठ्या शहरांमधे भिन्न-भिन्न भाषा बोलणार्‍या लोकांचा सतत वावर असतो. अमीर खुसरोच्या काळात ही दिल्ली सल्तनतची राजधानी होती. त्याचप्रमाणे व्यापाराचे मुख्य केंद्रही. दिल्लीचे स्थानिक निवासी हिंदी बोलणारे. दरबारात विदेशी राजदूत, सरदार आदि तुर्की- फारसी बोलणारे. मोठ्या प्रमाणावर विदेशी व्यापार्‍यांचा वावरही दिल्लीत होता. भाषेमुळे होणार्‍या समस्या दूर करण्यासाठी बादशाहच्या आदेशानुसार अमीर खुसरोने 'खालिकबारी' नावाचा तुर्की-फारसी-हिंदी शब्दकोष तैयार केला. त्यात दैनिक उपयोगात येणार्‍या शब्दांचे अर्थ तिन्ही भाषांमधे दिले होते. चारोळी स्वरूपातला हा शब्दकोष त्या काळी खूब लोकप्रिय झाला. त्यातले एक उदाहरण:-


फारसी बोली 'आईना'
तुर्की ढूँढी 'पाईना'
हिंदी बोली 'आरसी' आए
खुसरो कहें कोई न बताए.

त्या काळी तुर्की -फारसी महत्वपूर्ण भाषा होत्या तर आज मुम्बईत मराठी बरोबरच अंग्रेजी, हिंदी आणि उर्दू या बोलचालीच्या भाषा आहेत. आता वरील चारोळीचा मराठी अनुवाद आजच्या परिस्थितिनुसार:

अंग्रेजीच्या 'mirror' ला
उर्दू दाखविते 'आईना'.
'आरशात' मराठीच्या
दिसली हिंदीची 'आरसी'.

खरं म्हणाल तर मी ही मराठीच्या'आरशात' हिंदी भाषेची आरसी दाखविण्याचा प्रयत्न करतोच आहे. असो! कवितेच्या माध्यमातून आपण हसत-खेळत दुसर्‍या भाषेंतील शब्द सहज शिकू शकतो. त्याचा सर्वाना फायदाच होईल व भाषेवरून होणारे विवादही कमी होतील. आपण ही प्रयत्न करा. चारोळी रचा. कवितेत शब्दकोष सहज तैयार होईल. एक नमूना पहा:

हिंदीच्या 'बिल्लीला'
म्हणे मराठी 'मांजर'
अन्ग्रेजीची 'cat'
आहे मोठी धूर्त.

'गोरा ' माणूस असो वा मांजर धूर्त असतात.


Sunday, October 16, 2011

ब्रेकिंग न्यूज़

लोकतंत्रचा चौथा खम्बा अस पत्रकारिताला संबोधित केल जात. आज ब्रेकिंग न्यूज़च्या नावावर मूळ बातम्या तोडून-फोडून विकृत करून प्रस्तुत करण म्हणजे पत्रकारिता. असे पत्रकार आणि बेवडा यात काय फरक- एक गटरात पडतो तर दूसरा समाजाला गटराचे दर्शन घडवितो- दोन्ही सारखेच. क्षमा याचने सहित 

लोकतंत्रचा चौथा खम्बा
विदेसी पिउनी आडवा झाला. 
न्यूज़ हातची  तुटली-फुटली
ब्रेकिंग न्यूज हि अशी घडली.


Friday, October 14, 2011

प्रेमाची कविता /शब्दांविना जगते प्रेमाची कविता


डोळ्यांची भाषा
स्पर्श भावनांचा 
जगते शब्दांविना 
प्रेमाची कविता. 

डोळ्यांत सजते 
ह्रुदयात फुलते
मौनात बोलते 
प्रेमाची कविता.

Wednesday, October 12, 2011

दोन क्षणिका\पोथी आणि तारे दिसले भर दुपारी




पोथी


कोरी पोथी  म्हणजे लक्षुमी 

विकल्या जाते बाजारी.

"काळी" पोथी  म्हणजे सरस्वती 

कीमत नसते बाजारी. 



तारे दिसले भर दुपारी 



धड होते जमिनीवरी 

मन होते वार्यावरी. 

ठेस लागुनी पडला कवी 

तारे दिसले भर दुपारी. 

Monday, October 10, 2011

निळे फुलपाखरू - घरात घडलेली सत्य घटना




पंधरा-सोळा  वर्षांपूर्वीची गोष्ट, एक छोटसे घर. घरा समोर आंगण. अंगणात पेरूचे झाड, मधुमालतीची वेल आणि गमल्यांमध्ये असलेले गुलाब. सकाळ- संध्याकाळ चिमण्यांची चिवचिव, त्यांना दाणा घालण कधी कधी येणाऱ्या  फुल पाखरां  मागे धावण  मुलांचा छंद.

पण माणूस मुळातच स्वार्थी, अतृप्त, असमाधानी.  माझ्या सारखा शुद्र जीव ही त्याला अपवाद नाही. पोर मोठी होऊ लागली होती, जागेची उणीव भासत होती.   तसे ही, शेजारी-पाजार्यांनी पूर्ण वरांडे कवर केल्यामुळे घरात ऊन ही कमी येत होते. आपण ही समोर मोठी खोली बांधली तर घराला शोभा येईल. बैठकी साठी त्या खोलीचा वापर करता येईल, असा विचार सतत मनात येत होता. शेवटी बायकोच्या टोमणान्या कंटाळून म्हणाव किंवा स्वत:च्या मनात दडलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी समोर मोठी खोली बांधण्याचा निश्चय केला. अर्थातच अंगणातल्या पेरूच्या झाडाची आणि मधुमालतीच्या  वेलीची कत्तल ही झालीच. काही महिन्यातच सुंदर बैठकीची खोली तैयार झाली. तुळशी वृंदावन सहित काही फुलांचे गमले गच्चीवर हलवले. चिमण्यासाठी पाण्याचे भांडे ही ठेवले. पण त्या होत्या कुठे. मधुमालतीची वेल कापल्या मुळे चिमण्यांना घर सोडून जाणे भाग होते. नाही म्हंटले तरीही दाणे आणि पिण्यासाठी काही चिमण्या सकाळ संध्याकाळी गच्चीवर यायच्या.

त्या नंतर जवळपास वर्ष उलटल असेल. एक दिवस ऑफिस मधून घरी परतल्यावर. माझी दोन्ही मूले एकदमच ओरडत म्हणाली  बाबा! बाबा ! भिंतीवर काही तरी  किड्या सारख दिसत आहे.  जवळ जाऊन बघितलं, भिंतीवर एका किड्याचे  कोष दिसले. आतला निळा रंग ही हलका-हलका दिसत होता.  फुलपाखराच कोष वाटते. पण हे इथे कसं? हा प्रश्न मनात आला. कदाचित्‌ नेहमीच्या सवयीने फुल पाखरू अंडी घालायला इथे आले असेल. मधुमालती वेल आणि पेरूचे झाड न दिसल्या मुळे गमल्यातल्या फुलांच्या रोपट्यात अंडी घातली असेल. त्यातून निघणारी अळी रांगत-रांगत कोषासाठी सुरक्षित जागा शोधीत खोलीत आली असेल.  हे फुल पाखराचे कोष आहे, काही दिवसातच यातून फुलपाखरू निघेल असं मुलांना सांगितले. ते ही आनंदाने कोषातून फुलपाखरू निघण्याची वाट पाहू लागले. दोन-तीन दिवसा नंतरची गोष्ट - संध्याकाळी घरी आल्यावर बघितले दोन्ही पोर आनंदानी नाचत होती. बाबा बाबा! ते पहा फुलपाखरू, किती सुंदर दिसतंय. एक निळ्या रंगाचे फुलपाखरू खोलीत इकडे-तिकडे उडत  होते. पोर ही त्या बरोबर आनंदाने नाचत होती. घरातील सर्व पंखे बंद होते. फुलपाखराला इजा होऊ नये म्हणून मुलांनी पंखे बंदच ठेवले होते.

रात्र झाली, मुलं बैठकीच्या खोलीत कुलर सुरु करून झोपायची म्हणून फुलपाखराला खोलीतून बाहेर पळवल, दरवाजे बंद केले. पंखा व कुलर सुरु केला आणि आम्ही झोपी गेलो.

सकाळी झोप उघडली. मागच्या वरांड्यात येऊन वाश बेसिन वर तोंड धुतले. बैठकीतल्या खोलीत आलो. बघितले एका कोनाड्यात ते फुलपाखरू मरून पडलेले होते. कदाचित रात्री मागच्या वरांड्यातून घरात शिरले असेल आणि पंख्यात येऊन त्याचा जीव गेला असेल. काही क्षण मी प्राणहीन फुलपाखरा कडे बघत राहिलो. अपराधी सारखे वाटले. विचार करू लागलो. यात फुलपाखराची काय चुकी. त्याचा आईस काय माहिती, इथली झाडे एका स्वार्थी माणसाने कापून टाकली आहेत. त्याची आई इथे आली -झाड व वेली दिसली नाहीत- पण अंडी घालण्याची वेळ झाली असल्या मुळे त्याचा आईला गमल्यातल्या एका  रोपट्यावरच अंडी घालावी लागली असेल. झाडा एवजी बैठकीच्या खोलीत त्याचा जन्म झाला.  एखाद रात्र आपल्या जन्मस्थानी घालवून, फुलपाखरू पुढच्या प्रवासासाठी पुढे निघून गेला असता. ते फुलपाखरू जिवंत राहीले असते तर अंडी घालण्यास परत इथ आले असते. पण आता ते होणे शक्य नाही. भारी मनाने फुलपाखराला उचलून बाहेर फेकले. पुन्हा वाश बेसिन वर येऊन चोळून-चोळून हात धुऊ लागलो. हात धुवताना लेडी मेकबेथची आठवण आली.  कितीही हात धुतले तरी आपण या पापातून मुक्त होऊ शकतो का?  असा विचार मनात आला.

एक फुल पाखरू नव्हे तर फुलपाखराच्या भविष्यातल्या समूर्ण पिढ्या स्वार्थापोटी मी नष्ट केल्या होत्या. आता ते इथे कधीही दिसणार नाही. खरोखरच! त्या नंतर कधीही गच्चीवर किंवा आमच्या राहत्या घरात  निळ्या रंगाचे फुलपाखरू दिसले नाही. आज ही कधी  फुलपाखरू  दिसले कि त्या फुलपाखराची आठवण होते. एक प्रश्न मला नेहमीच सतावतो, बैठकीची खोली बांधताना एकदाही आपल्या मनात झाडावर व वेलीवर राहणाऱ्या जीवांचा विचार का नाही आला? आला असता तर कदाचित निळे फुलपाखरू आजही जिवंत असते. ???

Sunday, October 9, 2011

वारांगना


तिच्या देहात नव्हता
वासनेचा गंध
तिच्या डोळ्यात होता
प्रश्न पोटाचा वांझ

Thursday, October 6, 2011

कवितेचा कीड़ा



कवितेचा कीड़ा जेंव्हा डोक्यात शिरतो
करितो यमकांची जुळवा-जुळवी
ताबा तोंडाचा घेतो 
फिरतो सैर-भैर तो.

कानात बोळे घालूनी 
भयक्रांत बायको वावरते घरी 
पोरे ही म्हणती पपा
होतो अभ्यासाचा हर्जा.

हातात चोपड़ी पाहुनी
मित्रही पळती दूर किती
पाहुण्याची लाट आटली
निस्तब्ध शांती घरी पसरली.

आता रात्रीच्या एकांती बैसुनी
माझी मीच ऐकतो कविता.

आप्त ही म्हणती 'वैनी'
गेले हो पार कामातुनी आता.
दाखवाहो 'ह्याना' एकदा 
नेवून  वेड्यांच्या इस्पिताळी
वाया गेला एक 'माणूस' 
लागून कवितेच्या नादी.

Thursday, September 29, 2011

वसुधैव कुटुम्बकम ???


देशाचे पेय, पेप्सीकोला.
देशाचे जेवण, पित्जा-बर्गर.
 
देशात शिक्षण, आंग्ल भाषा.
देशाची बैंक, स्विस बैंक.
 
प्रेमाचा दिवस, वेलेंटाईन डे.
देशाची नेता, विदेशी मूळ.
 
स्वदेशी भारत, ग्लोबल इण्डिया.
यालाच म्हणतात, वसुधैव कुटुम्बकम.

Wednesday, September 28, 2011

'टायपिस्ट' बायकोचा


(सौ.ची रेसिपीज टाईप करताना सुचलेली वात्रटिका, तशी ती माझ्या कविता कधीच वाचत नाही (माझे सौभाग्य), पण तिने ही वात्रटिका वाचली तर काय होईल...) 


संसाराच्या गाडीची

चाके दोन्ही आम्ही.
एकानी उचलली लेखणी
दुसरा का राहणार मागुती.

एके दिवशी वदली
कवितेच्या नावानी
रात्रीच्या एकांती
काय बघता तुम्ही
ठावे आहे समदी.

आता रंभा-उर्वशी सोडूनी
लागा बायकोच्या नादी.
वर्षांपासुनी भरते मी
तुमच्या पोटाचा गड्डा.

जिभेचा स्वादाला
थोडे तरी जगा.
बाण जिव्हारी लागला.'
बायकोच्या 'खाद्ययात्रेसाठी'
बनलो गुपचूप 'गिनीपिग'
नित-नवीन रेसिपीज
पचवू मी लागलो.
कारल्याचे सूप ही
आनंदाने गिळू लागलो.
कल्पनेची कविता
विसरुनी मी गेलो.
बायकोसाठी आता
टायपिस्ट मी झालो.

Tuesday, September 13, 2011

समुद्राचे काळीज/ समुद्र आणि धरतीची अनोखी प्रेम कहानी


सृष्टीकर्त्याने पृथ्वीवर प्रथम समुद्र आणि धरतीची निर्मिती केली. पृथ्वीवर चैतन्य रहाव म्हणून त्यांचा हृदयात प्रेम आणि काम भावना ही निर्माण केली. हीच प्रेम आणि काम भावना आजही पृथ्वीवरील  समस्त चराचरात भरलेली आहे. अनादी काळापासून समुद्र आणि धरती एकत्र चालत आले आहे. साहजिकच आहे एकत्र चालणार्या दोन जीवांमध्ये प्रेम भावनेने एकत्र येणारच.पण त्यांचे मीलन म्हणजे पृथ्वीवर प्रलय.म्हणून सृष्टीकर्त्याने समुद्राकडून वचन घेतले- युगांत पर्यंत दूर राहणे. प्रेम आणि कामभावने अभावी पृथ्वीवर जीवन निर्मिती ही  अशक्य होती. पण जिथे प्रेम आहे तिथे मार्ग ही आहे.

वसंतात धरती फुलांनी शृंगार करते वातावरणात  कामगंध दरवळू लागतो. समुद्राच्या हृदयात ही काम भावना जागृत होते. तो मीलना साठी उत्सुक होतो. पण सृष्टीकार्त्याला दिलेले वचन आठवून तो विवश होतो.  विरहाग्नीत  जळण्याशिवाय दुसरा पर्यायच त्यापाशी नाही.  तीच दशा धरतीची ही होते.  ग्रीष्माच्या तापामुळे  प्रेमाच्या (पाण्याच्या) अभावी पृथ्वीवरील जीवसृष्टीत ही हाहाकार माजतो. समस्त जीवसृष्टी आकाशाकडे टकलावून मेघांची  वाट बघू लागते.  प्राण्यांची ही दशा धरतीला बघवत नाही. ती समुद्राकडे  याचना  करते- माझ्यासाठी नव्हे पण माझ्या हृदयावर बागडणार्या या जीवांवर तरी दया करा. काहीतरी मार्ग काढा! 

विरहाग्नीत जळणाऱ्या धरतीची ही दशा समुद्राला बघवत नाही.
अखेर त्याला मार्ग सापडतो. समुद्राचे काळीज  वितळते  व नभात शिरून तो मेघांचे स्वरूप धारण करतो. वर्षा ऋतुत हे मेघ धरतीवर प्रेमाच्या वर्षाव करतात.  धरतीवरील समस्त प्राणी  या प्रेमवर्षावात चिंब भिजतात व सर्वत्र नवचैतन्य बहरते. 

समुद्र आणि धरतीचे असे अद्भुत मीलन पाहून  कवींनी  मेघ आणि धरतीच्या प्रेमावर  लांखो कविता  रचल्या असतील पण त्यांना काय माहित मेघांमध्ये असते समुद्राचे काळीज.

Monday, August 15, 2011

राजा आणि त्याचे पाळीव कुत्रे


सूतजी म्हणाले,  जंबूद्वीपे, भरतखंडे यमुनेतटी  इंद्रप्रस्थ नावाची एक सुंदर अशी नगरी होती. तेथे उल्कामुख नावाचा एक राजा राज्य करीत होता. माणूस दगा देतो पण कुत्रे आपल्या मालकाशी सदैव एकनिष्ठ राहतात म्हणून  वाघा सारखे आडदांड असे  दोन  कुत्रे  स्वत:च्या रक्षणासाठी त्याने पाळले होते.  कुत्रे ही राजाच्या प्रत्येक आज्ञेचे पालन तत्परतेने करायचे.   राजा कुत्र्यांना आपल्या पासून कधीही दूर करीत नसे. कित्येकदा 'संकटकाळी' कुत्र्यांनी राजाचे रक्षण केले होते. राजाचे कुत्र्यांवर अत्यंत प्रेम होते. राजसभेत सुद्धा राजा  कुत्र्यांना आपल्या सोबत घेऊन जायचा अर्थातच कुत्र्यांच्या साखळ्या त्याचा हातात राह्यच्या.  लोक ही म्हणायचे राजा आणि कुत्रे म्हणजे एक जीव दोन प्राण.



पण अलीकडे राजाचे कुत्र प्रेम राजाला भोवू लागले होते. दरबारात कुत्रे  नुसते भुंकायचे नाही तर  कधी कधी साखळी तोडून मंत्री आणि सरदाराना चावायला कमी करायचे नाही. पण यात कुत्र्यांची काहीच चुकी नव्हती. कुत्रे म्हणजे एकनिष्ठ आणि आज्ञाकारी. आपल्या दिव्यचक्षुंनी घोटाळेबाज मंत्री आणि सरदाराना ओळखून राजाला सावध करण्यासाठी ते मंत्र्यांवर भुंकायचे. त्यांस काय माहित, अधिकांश  घोटाळ्यामागे राजाचे आणि राणीचे नातलग असल्यामुळे, राजाला माहित असूनही राजा दुर्लक्ष करायचा. पण कुत्र्यांच्या ह्या भुंकण्यामुळे, मंत्री आणि सरदार घाबरायचे त्या मुळे  राजसभेचे कामकाज नेहमीच अर्धवट राहायचे.  आणि  एक दिवस तर कहरच झाला, कुत्रे शयन गृहात चक्क  'राणी' वर भुंकले. आता मात्र राजाचा नाईलाज झाला. काही उपाय कारणे गरजेचे होते.

एक दिवस एक महात्मा राजा घरी आला. तो म्हणाला राजा माझ्यापाशी चमत्कारी साखळ्या आहेत. ह्या साखळ्या त्यांच्या गळ्यात बांध, तुझ्या आज्ञाशिवाय ते कुणावरही भुंकणार नाही किंवा कुणालाही चावणार नाही.  राजाने  महात्माने दिलेल्या साखळ्या कुत्र्यांच्या गळ्यात बांधल्या.  राजा दोन्ही कुत्र्यांना घेऊन फिरायला निघाला. एक कुत्रा, एका पाद्चारीवर भुंकला. राजाने त्याची साखळी ओढली, साखळी कुत्र्याचा गळ्या भोवती कसु लागली, कुत्र्याचे प्राण कासाविस होऊ लागले. कुत्रा भुंकायचा थांबला. कुत्रे बुद्धिमान असतात, 'समजायचे ते समजले'. दुसर्या दिवशी राजा कुत्र्यांसोबत दरबारात आला. नेहमी प्रमाणे मंत्री आणि सरदार दूर उभे होते. राजा हसत-हसत त्यांस म्हणाला मंत्र्यानो घाबरू नका, आता माझ्या आज्ञे शिवाय कुत्रे कोणावरही भुंकणार नाही आणि चावणार नाही.  त्या दिवशी राजसभेचे कामकाज सुरळीत पार पडले.


सूत म्हणाले, मुनिनो  ज्याला या कथेचा  अर्थ गवसेल  तो  कलयुगात, भरतखंडात निर्विघ्नपणे राज्य करेल.

Sunday, July 31, 2011

समलेंगिकता एक विकृती



कालच वर्तमान पत्रात वाचल  हरियाणाच्या एका कोर्टाने समलेन्गिक जोडप्याच्या संरक्षण देण्याचे आदेश दिले  कारण समाज  त्या जोडप्याच्या जीवावर उठलेला आहे.  समाज समलेन्गिक संबंधाना एक विकृती म्हणून पाहतो आणि अश्या संबंधांचा विरोध करतो. तर दुसरी कडे काही बुद्धीजीवी (?) अश्या संबंधाना कायद्याचे संरक्षण देणे काळाजी गरज आहे असे मानतात. सरकारने कायदा बनवून समलेन्गिक विवाहाला मान्यता द्यावी अशी त्यांची अपेक्षा. प्रत्येक माणसाला त्याचा हिशोबाने जीवन जगण्याची स्वतंत्रता आहे आणि या स्वतंत्रेच रक्षण करण सरकारच दायित्व आहे. 

आपण परमेश्वराच्या 'अर्ध-नारीश्वर' या स्वरूपाचे पूजन करतो.  स्त्री-पुरुषाचे मिलन मानवजातीच्या अस्तित्व करता आवश्यक आहे याचेच प्रतिक म्हणजे "अर्धनारीश्वर".   आपणास माहित आहे, परमेश्वरच्या मनात एका पासून अनेक होण्याची इच्छा निर्माण झाली आणि सृष्टीच्या निर्मितीची सुरवात झाली. वैज्ञानिक भाषेत याला "बिग बैंग" असे म्हणतात.  त्या क्षणापासून परमात्मा रचित प्रत्येक जीव " एका पासून अनेक होण्याची" इच्छा मनात धारण करून  सृष्टी निर्मितीची परमेश्वराची इच्छा पूर्ण करीत आहे.  एक कोशकीय जीव स्वत:ला विभाजित करून एका पासून अनेक होते. परमेश्वराने स्त्री-पुरुष या रूपाने मानवजातीची निर्मिती केली आहे. अन्य जिवांप्रमाणे 'एका पासून अनेक होण्याची' परमेश्वरी इच्छा मानवा मधे ही आहे.  हीच इच्छा मनात धारण करून स्त्री-पुरुष एका दुसर्या कडे आकर्षित होतात.  स्त्री 'बीज',  पुरुष वीर्य ' धारण करते आणि मानवाची एका पासून अनेक होण्याची मूळ इच्छा पूर्ण होते.    स्त्री-पुरुषांच्या मिलनाचा मूळ उदिष्ट संतान प्राप्ती होय या मुळेच 'एका पासून अनेक होण्याची" मानवाची इच्छा पूर्ण होते.   केवल यौन आनंदा साठी  होणार्या  स्त्री-पुरुष संबंधाना आपल्या प्राचीन मनीषीनी कधीही उचित मानले नाही कारण अश्या सम्बंधान मुळे विकृत संतती निर्मित होते.  म्हणून प्राचीन ऋषी-मुनींनी,  स्त्री-पुरुषांच्या या संबंधाना 'विवाह' या रूपाने परिभाषित केले.

समलेन्गिक व्यक्ती परमेश्वर प्रदत्त मानवाची  'एका पासून अनेक होण्याची'  मूळ इच्छा  पूर्ण करू शकतो का?   आपण सर्वाना माहित आहे. बिना पुरुष वीर्य धारण केल्या स्त्री बीज फलित होऊ शकत नाही.  समलेन्गिक व्यक्ती 'एका पासून अनेक होण्याची' मानवाची मूळ इच्छा कधीच पूर्ण करू शकत नाही.  आपणास वाटत असेल केवळ यौन आनंदा साठी समलेन्गिक संबंध ठेवले जात असतील. पण इथे एक गोष्ट नमूद कारणे जरुरू आहे. 'आनंद' निर्मिती मधे असतो  जिथे पुरुष वीर्य आणि स्त्री बीज फलित होऊ शकत नाही अश्या मानवजातीला विनाश्याच्या मार्गावर नेण्यार्या समलेन्गिक व्यक्तींना 'यौन आनंद' कधीच प्राप्त होत नाही. अश्या व्यक्ती आयुष्यभर पीडा आणि दुख: भोगतात.  खरे म्हणजे समलेन्गिक्ता माणसात दडलेली  एक विकृती  आहे. एक मानसिक बिमारी आहे.  सम लेन्गिक व्यक्ती कडे सहानभूतीने पाहून,  योग्य डॉक्टरी सल्ला आणि  चिकित्सा केल्यास त्याला या  विकृती पासून मुक्ती सहज मिळू शकते.  समलेन्गिक्तेला प्रोत्साहन देणे म्हणजे मानवजातीला विनाशाच्या मार्गावर प्रवृत्त कारणे होय. मानसिक रोगाने झपाटलेल्या समलेन्गिक समर्थकांचा विरोध कारणे ही काळाजी गरज आहे. 

Tuesday, July 12, 2011

क्षणिका / रात्र श्रावणी /मृगाचा पाऊस/ कोरडा समुद्र


मृगाचा पाऊस

मृगाच्या पाऊसात
चिंब भिजली.
शरदाच्या कुशीत
धरणी प्रसवली.

कोरडा समुद्र

विरही वेदनेचा
खाऱ्या अश्रूंचा
समुद्र कोरडा.

रात्र श्रावणी

प्रेमात भिजली
रात्र श्रावणी.
गालावर लाली
पहाट सोनेरी.

 [एकत्र चालत असूनही धरती आणि समुद्राचे कधीच मिलन होत नाही. खाऱ्या अश्रूंचा समुद्र    प्रेमाचा गोड ओलावा   आणणार तरी कुठून?] 

Saturday, July 9, 2011

ती आठवण, ते सूर आणि मी


क्षणा पुरता घडणाऱ्या गोष्टी आपण सहजतेने विसरून जातो. पण पंचवीस - सव्वीस वर्षानंतर तीच घटना आपल्या समोर येते व आयुष्याला एक नवे वळण देते. निराशाच्या गर्तेत बुडालेल्या मनात आशेचा संचार होतो. असाच एक अनुभव.
वर्ष  २००७, मईचा महिना, काही महिन्यांपासून पाठीचे मणके आपल्या जागेवरून हलल्यामुळे  कमरेचे  दुखणे  वाढत होते. डॉक्टर कोठारीनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. पण आपण मराठीमाणूस. कामाप्रती अधिक निष्ठावान. मग व्हायचा तोच परिणाम झाला. त्यावेळी कार्याचा अधिकतेमुळे रोजच रात्री उशीर अर्थात घरी पोहचता-पोहचता रात्रीचे १० तरी वाजायचे. एक दिवस रात्रीचे जेवण घेतल्यानंतर वाशबेसिन वर हात धुवत असताना पाठीत असंख्य विजा चमकतात आहे असे वाटले. डावा पाय सुन्न झाला. असंख्य वेदना कमरे व पायातून उमटल्या. डावा पाय सरळ करता येत नव्हता कसेबसे  रात्र  जागून काढली. सकाळी एम्बुलेन्स बोलवली.  स्ट्रेचर  टाकून मला सफदरजंग हॉस्पिटलला नेले. पेशंट पहायचा दिवस नसतानाही  डॉक्टर कोठारी मला बघण्यासाठी हॉस्पीटला आले. डॉक्टरांचं न ऐकणार्या पेशंटच आणखीन काय होणार, आपण  पंधरा-वीस  दिवस वाट पाहू,  काही फरक पडला तर ठीक, अन्यथा ऑपरेशन शिवाय दुसरा पर्याय नाही. बिस्तरावर न हलता-डुलता पडून राहाण्याचा सख्त आदेश ही मला दिला. खंर म्हणाल तर त्या वेळी जरा ही पाय हलला तर एवढ्या वेदना होत होत्या की हालण- डुलण शक्यच नव्हत.  म्हणायला सोप आहे,  "प्रात:विधी" पासून सर्वकाही बिस्तरावर  करताना,  शरीरापेक्षा मनाला किती यातना होतात, हे रोगीच जाणतो.  असेच १० ते १२ दिवस  उलटले, वेदना किंचित ही कमी होत नव्हत्या. रात्री छोट्या स्टूल वर पाय ठेउन झोपण्याचा असफल प्रयत्न करायचो.  झोपेचा अभाव आणि दुखण याचा परिणाम शरीरावर व मनावर होऊ लागला होता. कदाचित आपण कधीच बिस्तरावरून उठू शकणार नाही असे वाटू लागले होते त्या मुळे मनात निराश्याची भावना दाटू लागली होती.

मग तो दिवस उगवला. रात्रीची वेळ होती, झोपण्याचा प्रयत्न करत होतो, तेवढ्यात बायको म्हणाली,  "सा  रे ग म"  पुन्हा सुरु झाल आहे.  गाणे ऐका थोड बर वाटेल अस म्हणत तिने टीवी लावला. पण वेदने मुळे गाणे ऐकण्यात लक्ष लागेना

अचानक  "क्षण दिपती क्षण लपती,  भिजुनी उन्हें चमचमती"  हे  सूर काना वर पडले.  अचानक  पंचवीस पूर्वीची घटना डोळ्यांसमोर तरळली,  पावसाळ्याचे दिवस होते. श्रावणाचा महिना असल्या मुळे ऊन-पावसाचा खेळ सुरु होता. ऑफिस सुटल्या वर चार्टर बस साठी वाट पाहत कृषी भवनच्या बसस्टाप वर उभा होतो.  क्षणभरा करता पावसाची एक जोरात सर आली आणि चिंब भिजवून गेली. पुन्हा ऊन निघाले. अचानक डोळे प्रकाशात दिपले. वळून बघितले तिच्या सोनेरी केसात अडकलेल्या पावसाच्या थेम्बातून परावर्तीत होऊन सूर्य प्रकाश माझ्या डोळ्यांवर पडत होता.   पांढर्या सलवार-कुर्त्यात  भिजलेली ती अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या वरून दृष्टी हलत  नव्हती. काही क्षणानंतर  वरती आकाशाकडे बघितल सूर्यदेव ही ढगाचा परदा सारून भिजलेल्या सौंदर्याचा आस्वाद घेत होते. मला हसू आले. मनातल्या मनात शीळ घालत पुटपुटलो  "सूर्यदेव तुम्हीही आमच्या सारखे, दिसली पोरगी की शीळ घातली.  तुम्हाला स्वर्गात अप्सरांची काय कमी, पृथ्वीवरच्या सौंदर्याला का म्हणून बघता.  काही आमचा विचार करा." तेवढ्यात  चार्टर बस आली. बस मधे चढलो. खिडकी जवळची सीट मिळाली. बस सुरु झाली. सहज लक्ष गेल, पश्चिम दिशेला आकाशात इंद्रधनुष्य उमटलेल दिसत होत. गाण संपता-संपता  केन्हां  डोळा लागला कळलंच नाही.  दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर जाणवलं, वेदना पुष्कळ कमी झालेल्या होत्या. पाया खालचा स्टूल दिसत नव्हता. झोपेत पाय आपोआप सरळ झाला होता. बायकोचा चेहरा ही आज उजळल्या सारखा दिसत होता. इतक्या दिवसांपासून  ती पतिव्रता ही नवर्या बरोबर रात्र जागून काढत होती. काल छान झोप लागली वाटत. तुमच्या साठी 'पॉट'  घेऊन येऊ का, तिने विचारले. मी म्हणालो, आज बिस्तरावर नाही.  मुलाच्या मदतीने toilet पर्यंत गेलो.

रात्री ऐकलेले ते सूर आठवले, ती आठवण ही डोळ्या समोर आली. खरोखरच संगीतात एवढी शक्ती असते की एका रात्रीत वेदना कमी होतात व शरीरात नवीन चैतन्य निर्माण होते. नंतर कळले ती गायिका सायली पानसे होती.  हळू हळू तब्येतीत सुधारणा होऊ लागली.  सप्टेंबर महिन्याचा अखेरीच ऑफिस जॉईन केल. माझ्या ठीक होण्यात डॉक्टर कोठारींचा मोठा वाट होता यात शंका नाही. पण त्या दिवशी ऐकलेल्या त्या सुराचा व त्या आठवणीचा ही मोठा वाटा आहे हे ही तेवढंच सत्य. 

Saturday, July 2, 2011

जाहिरात आणि सदोबा / (वात्रटिका)

सदोबा जाहिरातीला भुलून नेहमीच खरेदी करतो. पण जाहिरातीत दिलेला इशारा त्याला समजत नाही "डाग चांगले असतात" असं चक्क जाहिरातीत म्हंटले असतानाही सदोबाने ते साबण खरेदी केले. मग काय जाहले असेल:

ब्रान्डेड साबणाने
सदोबाने कपडे धुतले.
डाग चांगले-चांगले
कपड्यावरती उमटले.

सदोबाचे दात दुखत होते. दाताचा परमनेन्ट इलाजासाठी आमचे टूथपेस्ट वापरा 'दात स्वच्छ होतात', ही जाहिरात बघून सदोबाने टूथपेस्ट विकत घेतली. पुढे काय जाहले: 




ब्रान्डेड टूथपेस्टने
दात स्वच्छ केले.
आता पांढर्या शुभ्र दातांची
कवळी सदोबा लावितो.


सदोबाने आपल्या बायकोसाठी जाहिरातीत हिरोईनने वापरलेले 'आल क्लिअर' शेम्पू आणले. पुढे काय जाहले असेल:



डोक्याला तिने
आल क्लिअर लाविले.
विग घालूनी ती आता
छान - छान दिसते. 


'आल क्लिअर' चा अर्थ सदोबाला कळला असता तर बायकोसाठी विग विकत घेण्याची नौबत आली नसती. एक मात्र खंर, तेल आणि शेम्पूचा खर्च वाचला. जाहिरातीला दोष देण्यापेक्षा जाहिरातीत दिलेला इशारा समजण्याची गरज आहे. हे सदोबाला तरी आता नक्की समजले असेल.

Wednesday, June 29, 2011

समर्थ विचार/ (१) (नेतृत्व गुण)/ पराजयाची कारणे


अखंड सावधान असावे I दुश्चित कदापि नसावे Iत्याचा त्याचा जो व्यापार I तेथे असावे खबरदार I 

हिंदीत एक म्हण आहे "सावधानी हटी और दुर्घटना घटी". प्रत्येकाला सावध व खबरदार रहावेच  लागते मग  नौकरी असो वा धंधा.  राजकारणी  लोकांना तर जास्त सावध राहावे लागते. त्यांच्या थोड्याश्या असावधानिमुळे  देशाचा इतिहास बदलून जातो. बिजापुरचा  सरदार अफजलखान शिवाजीवर चालून आला. शिवाजीने घाबरण्याचे सोंग घेतले. अफजलखानास खूष करण्यासाठी  सोने-चांदी, हिरे- जवाहराताने भरलेले नजराण्यांचे ताटे अफजलखानास पेश केले. अफजलखानास वाटले शिवाजी घाबरला. त्याला शत्रूचे मनोगत कळले नाही. तो शिवाजीस भेटण्यास प्रतापगड्याच्या पायथ्याशी येऊन पोहचला. पुढे काय झाले हे सांगण्याची गरज नाही. असाच काहीसा प्रकार त्या योगीपुरुषा बरोबर दिल्लीत घडला.   आधी आदर-सत्कार नंतर ...

त्या योगी पुरुषाला देशात पसरलेल्या भ्रष्टाचाराचा नायनाट करायचा होता. त्या साठी त्याने जीवाचे रान केले. संपूर्ण देश आपल्या पायदळी तुटविला.  जनते समोर आपले विचार मांडले.  भ्रष्टाचार विरुद्ध जनतेत काही अंश का होईना,   जागृती ही  निर्माण केली. त्याला वाटले करोडो लोग आपल्या मागे आहेत. सरकार आपल्या मागण्या पूर्ण करेल,  काळ्याधना विरुद्ध आपली मोहीम अवश्य यशस्वी होईल.  ह्या इराद्याने त्याने दिल्लीत तळ ठोकला. सरळ सत्तेला आव्हान दिले. मुरब्बी राजनेत्यांनी  त्याला हातोहात मूर्ख बनविले. भ्रष्टाचारा विरूद्धचे हे आंदोलन, एका रात्रीतच पार पडले. जनतेचे समर्थन असतानाही आंदोलन असफल झाले, याचे कारण शोधताना समर्थांचे विचार आठवले:- 
जनांचा प्रवाह चालला I 
म्हणजे कार्यभाग आटोपला I  
जन ठायी ठायी तुंबला I
 म्हणजे खोटे I  
जनतेला आपले विचार कळले आहे व आपल्या विचारांशी सहमत ही आहे. याचा अर्थ आपले कार्य सिद्ध झाले असे वाटणे म्हणजे खोटे. इतिहासात अशीच एक घटना: पन्नास हजारांपेक्षा जास्त फौजेनिशी हेमू अकबरचा पाठलाग करीत होता. शेवटी पानिपतच्या मैदानात हेमूने अकबरास गाठले. नाईलाजाने बैरम खानच्या नेतृतवाधीन असलेल्या तीन हजाराज्या तटपुंज्या फौजेनिशी अकबर ने झुंज दिली. पण युद्धात काय झाले. एक बाण हेमूच्या डोळ्यात लागला. तो हत्ती वरून खाली पडला. हत्तीवर राजा नाही हे कळताच त्या विशाल सेनेने पलायन केले. देशाचा इतिहास बदलला. अकबर युद्ध जिंकला. दिल्लीचा बादशाह झाला. मोगलांचे  राज्य देशभर पसरले.  हेमू जवळ पन्नास हजारांच  सैन्य होते. सैनिकांना  बाण, तलवार, भाले इत्यादी अस्त्र-शस्त्र ही चालविता येत होते. त्यांना युद्ध सहज जिंकायला पाहिजे होते, तरीही ते हरले कारण? सेनेच नेतृत्व करणारा अन्य कोणीही नव्हता. 
अचूक यत्न करवेना I 
म्हणून केलेले सजेना I 
आपला अवगुण जाणवेना I 
काही केल्या II (१२-२-६) 
आपला उद्येश्य कितीही पवित्र असला तरीही, अचूक प्रयत्न व नियोजनाचा अभावी कार्य सिद्ध होत नाही. आपल्या दोषांमुळे आपण अयशस्वी होतो. आपल्यातल्या दोषांना दूर करून, योग्य मार्गाचा अवलंबन केल्यानेच कार्य सिद्ध होते. दुसर्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नसतो.  इतिहासातले असेच एक उदाहरण.  शाईस्ताखान पुण्यात तळ ठोकून होता. या मुरलेल्या  सरदार सोबत लाखांच्यावर सैन्य होत. तरीही शिवाजीने त्याचा पराभव केला. शिवाजीने जाणले, सरळ युद्धात शाईस्ताखाणास पराजित करणे शक्य नाही. शिवाजी ने दुसरा मार्ग निवडला. रात्रीच्या वेळी छापा मारला व युद्ध जिंकले.  त्यांनी अचूक मार्ग निवडला होता व कार्य सिद्ध करण्यासाठी योग्य नियोजन ही केले होते. आपल्या हातून काय चुका झाल्या हे आपल्याला कळल तर आपण त्या चुका दुरुस्त करू शकतो.  समर्थांनी म्हटले आहे:  
मूर्खपणा सांडीत जाते I 
शहाणपण शिकता येते I 
कारभार करिता उमजते I 
 सकळ काही (१४-६-६ )

Monday, June 20, 2011

यमुना तीरे एक आठवण / (दिल्लीतली यमुना काल आणि आज)



तीस वर्षानंतर यमुनेच्या घाटावर मी उभा होतो. काठावरच्या मंदिरांना  टाळे लागलेले होते. सर्वत्र शुकशुकाट होता. चिट-पाखरुही दिसत नव्हते. यमुनाही घाटापासून दूर गेलेली होती. वाळूत व घाणीत  चालत-चालत यमुनेच्या काठी पोहचलो. नाल्या सदृश्य दिसणाऱ्या यमुनेच्या काळ्याकुट्ट पाण्याला घाण वास येत होता. आंघोळीच सोडा पाण्याला हात लावायची पण हिम्मत नाही झाली.  यमुनेत फक्त नाल्यांचे पाणी होते. अश्या यमुनेकाठी कोण फिरायला येणार आणि कोण्या भक्ताची हिम्मत आंघोळ करण्याची होईल, हा विचार सहज मनात डोकावून गेला. साहजिकच यमुना काठच्या या घाटांच अस्तित्व संपुस्टात आले होत. यमुनेची ही दशा पाहून डोळ्यांत पाणी आल, जुन्या आठवणी जागा झाल्या.  

सत्तर आणि ऐंशीचा काळ- उन्हाळ्याच्या सुट्यात आमच्या मोहल्यातले सर्व मुल-मुली सकाळी पाच वाजता यमुने वर फिरायला जायचे.  मोरीगेट मधून बाहेर पडल्यावर तिकोना पार्क लागायचा. अन्ग्रेजांचा राजवटीत बांधलेला हा अतिशय सुंदर बगीचा होता. पुढे  रस्ता क्रॉस केल्यावर मुगल कालीन  सुंदर आणि विस्तीर्ण  बगीचा  लागायचा. त्या  बगीच्यात विभिन्न प्रकारच्या फुलांची व झाडांची भरमार होती. त्यात मुगल शहजादी 'कुद्सिया बेगमचा' मकबरा असल्या मुळे त्याला कुद्सिया बगीचा असे नाव होते.  थोड्यावेळ बगीच्यात खेळायचो आणि दमल्यावर  सध्याचा 'रिंग रोड' क्रॉस करून यमुनेच्या तीरा वर पोहचायचो. आंघोळ करून पुन्हा परतताना बागीच्यातून मोगरा, चंपक, गुलाब, सदाफुली, झेंडू, घंटेची अश्या वेगवेगळ्या फुलांना एकत्र करून घरी परत यायचो. रस्त्याकाठी कडुलिंबाची व जांभळाची झाडे ही होती.  त्याकाळी यमुनेच्या काठावर भरपूर मंदिरे होती. एका घाटावर यमुनेची मूर्ती ही होती. संध्याकाळच्या वेळी लोक यमुनेकाठी फिरायला यायचे व नदीत नौका सफरीचा आनंद घ्यायचे. फार कमी लोकांना माहित असेलसंध्याकाळी यमुनेची आरतीही व्हायची. वातावरण गजबजलेल असायचं. काठावर काही मोठ्या पैलवानाचे आखाडे ही होते. एका घाटावर पोहण्याच शिक्षण देणारा एक क्लब ही होता कदाचित "जुगलकिशोर तैराकी संघ' नाव असाव. त्या काळचे काही प्रसिद्ध तैराक या क्लब मधून तैयार झाले होते.  उन्हाळ्यातही यमुनेचे  पात्र रुंद असायचे. भरपूर व स्वछ पाणी असल्या मुळे सध्या डोळ्यानाही मासोळ्या  पाण्यात दिसायच्या.  

सन ऐंशी मधे आम्ही जुनी दिल्ली सोडली आणि त्या बरोबर यमुनेशी असलेल नात ही तुटल. यमुनेला मानवाची नजर लागली. विकासाच्या नावावर  बाग-बगीच्यांची ९०% जागा, रस्ते, उडाणपूल, अंतर्राजीय बस स्थानकांनी बळकावली.  मेट्रो साठी ही काही जागा गेली.  ऐंशीच्या दशकात हरियाणात बनण्यार्या कालव्यांमुळे व दिल्ली शहरातल्या लोकांना पाणी पुरवण्यासाठी मोढ्या प्रमाणात नदीचे पाणी अडविण्यात आले. वजीराबाद नंतर फारच थोड्या पाण्यानिशी यमुना दिल्लीत प्रवेश करते. आणि दिल्लीत प्रविष्ट झाल्या बरोबरच दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या टोकावर वसलेल्या नजफगढ झील मधून निघणारी कधी-काळची एक पावसाळी  नदी  २०-२५ किलोमीटरची यात्रा करून यमुनेत मिळायची.  आज तिला नजफगढ नाला अस म्हणतात. संपूर्ण उत्तर आणि पश्चिम दिल्लीचे सांड पाणी व कारखान्याचे प्रदूषित पाणी घेऊन  हा नजफगढ नाला दिल्लीच्या सीमेंवरच  यमुनेला येऊन मिळतो. वेगळ सांगायला नको नजफगढ झील ही आज आपल्या अस्तित्व करता संघर्ष करीत आहे. भू-माफियांची नजर हिला लागलेली आहे. दिल्लीत आज वाहणाऱ्या यमुनेत ९०% टक्के पाणी  नाल्यांचेच आहे. भारी-मनाने घरी परतलो. कालियनागाची कथा आठवली. यमुनेच्या डोहात कालियनागचे वास्तव्य होते.  गाई-म्हशी पाणी पिऊन मरू लागल्या होत्या.  एकदा खेळता-खेळता बालगोपाळांचा  चेंडू नदीत पडला. चेंडू आणायला कृष्णाने यमुनेत उडी टाकली व कालियनागाला पराजित करून यमुनेपासून दूर केले. त्या वेळी कृष्ण होता पण आज यमुनेचे रक्षण कोण करणार? कालीयनागापेक्षाही अत्यंत विषारी नागांना आपल्या नद्यांमधून  कोण हाकलून लावणार? हाच यक्ष प्रश्न  आज डोळ्यांसमोर आहे. 


Saturday, June 18, 2011

विक्रमादित्य आणि सिंहासन चार पुतळी



 
जम्बुद्वीपे भरतखंडे  क्षिप्रा तटे सुन्दर रम्य अशी अवन्ती नगरी होती.  क्षिप्रा तटावर विक्रमादित्य दररोज नियमितपणे राज्यलक्ष्मीची 'पत्र, पुष्प, धुप, दीप आणि नैवेद्य' दाखवून पूजा करायचा. अखेर 'राज्यलक्ष्मी' प्रसन्न झाली. तिच्या कृपेने आज विक्रमादित्य सिंहासनावर बसणार होता. राजदरबार गच्च भरलेला होता. मंत्री, सामंत, आमंत्रित अतिथि व विदेशी पाहुणे उपस्थित होते. विक्रमादित्याची नजर सुवर्णजडित भव्य सिंहासनाकड़े गेली. आता फक्त तीन पायर्या  चढून तो सिंहासनावर बसणार होता.  विक्रमादित्य पहिल्या पायरीवर पाय ठेवणार, तेवढ्यात पायरीतून एक पुतळी प्रगट झाली.  तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती.  ती विक्रमादित्याला उदेश्यून म्हणाली विक्रमा, "राजाची नजर कशी असावी"?  विक्रम म्हणाला  "राजा गरुडा सारखा असतो", आपल्या तीक्ष्ण नजरेने प्रजेला त्रास देणार्या सर्पसमान  मंत्री, सामंत आणि सरकारी अधिकार्याना दण्डित करून प्रजेच कल्याण करतो".  पुतळी हसली, विक्रम तू भोळा आहेस. "राजाने कधी वाईट पाहू नये". मंत्री कितीही 'आदर्श  स्पेक्ट्रम''  घोटाळे करोत तुझी नजर तिथे पड़ता कामा नये.  या पायरीवर पाय ठेवण्याआधी तुला आपले डोळे झाकावे लागतील.   विक्रमादित्याने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली व पायरी वर पाय ठेवला. 

आता तो दुसर्या पायरी वर पाय ठेवणार,  दुसरी  पुतळी त्याचा समोर प्रगट झाली तिचे दोन्ही कान झाकलेले होते. ती विक्रमाला म्हणाली: विक्रमा "राजाने कधी वाईट ऐकू नये".  जर कुणी म्हणत असेल, शेतकरी भुकेने आत्महत्या करीत आहे, राज्यात रोगराई पसरलेली आहे, राशनचे धान्य काळया बाजारात विकल्या जाते, सरकारी कर्मचारी रिश्वत घेतल्या शिवाय कोणाचेही काम करीत नाही, ईत्यादी गोष्टी ऐकताना आपले कान झाकले पाहिजे म्हणजे अश्या वाईट बातम्या ऐकू येणार नाही. आपले कर्मचारी ईमानदार आहेत, प्रजा खुशाल आहे, 'कॉमनवेल्थ' सफल झाले, अश्या चांगल्या बातम्या फक्त ऐकाव्या.  विक्रमादित्य म्हणाला, पुतळी तुझी ही अट मला मान्य आहे.  त्याने  आपले कान झाकले आणि दुसर्या पायरीवर पाय ठेवला.  


आता  सिंहासनावर बसण्यासाठी आता तिसर्या   पायरीवर पाय ठेवणार,   तेवढ्यात  तीसरी पुतळी त्याचा समोर प्रगट झाली.  तिच्या ओठांवर  बोट ठेवलेले होते.  ती म्हणाली विक्रमा "राजाने कधी वाईट बोलू नये".  मंत्री प्रजेचे कल्याण सोडून स्वत:च्या कल्याण्यात गुंतले असले आणि तुमचे कुठलेही आदेश मान्य करीत नसले तरीही कोणासही रागवू नये, सर्वकाही 'राज्यलक्ष्मीवर' सोडून द्यावे व स्वत: शांत रहावे विक्रमादित्य म्हणाला पुतळी तुझी ही अट सुद्धा मी आनंदाने मान्य करतो. असे म्हणत विक्रमादित्य सिंहासनावर बसणार, तेवढ्यात सिंहासनातून चौथी व शेवटची  पुतळी प्रगट झाली.  ती म्हणाली विक्रमा, डोळे बंद असेल, कान झाकलेले असेल तरीही आत्म्याची आवाज माणसाला बैचैन करते. जो राजा न्याय मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतो तो व  राजा हरिश्चंद्रा प्रमाणे सत्ता गमावतो.  विक्रमा  आपली आत्मा मला देऊन टाक आणि खुशाल सिंहासनावर बैस.  सिंहासनावर बसण्यास उत्सुक  विक्रमाने लगेच आपली आत्मा तिच्या स्वाधीन केलीविक्रमादित्य  सिंहासनावर बसला, त्याचा नावाचा जयघोष सुरु झाला. स्वर्गीय मधुर संगीताचा आनंद घेत विक्रमादित्याने  डोळे मिटले.  त्याला दिसू लागली-  हिरवीगार शेती, प्रसन्न शेतकरी, स्वस्थ आणि खुशहाल प्रजा, सर्वत्र आनंदी-आनंद-  संगीताचा तालावर ताल देत तो गुणगुणु लागला- आनंदी आनंद गड़े, इकडे तिकडे चोहुकडे ....  अशा रितीने राज्यलक्ष्मीच्या कृपेने राजा विक्रमादित्याने अनंत  काळापर्यंत राज्य केले.