Monday, February 29, 2016

दंगा कथा - छोटू


बालपणाची गोष्ट. माझे वय १२-१३ वर्षांचे असेल. आमची शाळा पहाडगंज येथे होती. शाळा सकाळची असल्यामुळे आम्ही ७-८ सहपाठी एकत्रच शाळेत जाण्यासाठी घरून पाईच निघत असू. नया  बाजार, कुतुब रोड, सदर बाजार, बारा टूटी, मोतियाखान असा शाळेत जाण्याचा मार्ग.  शाळेत पोहचायला पाऊण एक तास लागायचा. रोज सकाळ -दुपार जवळपास ३-३  किलोमीटर पाई चालण्यामुळे  चप्पल आणि  जोड्यांचे बारा वाजयचेच.  मोतियाखानच्या भागात पटरीवर एक चांभार बसायचा. ५-१० पैश्यात तो जोडे आणि चप्पला दुरुस्त करून द्यायचा. छोटू त्याच्या मुलाचे नाव. त्याचे वय हि आमच्याच जेवढेच होते. तो सरकारी शाळेत शिकायचा. दिल्लीत मुलांची सरकारी शाळा दुपारची असते. सकाळी गर्दीच्या वेळी अर्थात ७-८ च्या दरम्यान तो आपल्या वडिलांची कामात मदत करायचा. चप्पला आणि जोड्यांची छोटी-मोठी मरम्मत तोच करायचा.  

त्या काळी जुन्या दिल्लीत वर्षातून दोन-चार दंगे हे व्हायचेच. आमच्या दृष्टीने दंगा म्हणजे बनियांच्या दुकानांची जाळपोळ आणि लूट-पाट.  असाच एक दंगा सदर बाजार येथे  झाला. त्या दंग्यात कपड्यांची बरीच दुकाने लुटल्या गेली. बहती गंगेत, अनेक गरिबांनी हि आपले हात धुऊन घेतले. शाळेत फाटके कपडे घालून येणारी अनेक मुले नवीन कपड्यात दिसू लागली. त्या वर्षी कित्येक मुलांची ईद आणि दिवाळी नवीन कपड्यात साजरी झाली. पण प्रत्येक नाण्याचे दोन पहलू असतातच.

दंग्याचा १५-२० दिवसानंतरची गोष्ट. शाळा सुटल्यावर दुपारी १ वाजता आमची चौकडी घरी जायला निघाली. एका मित्राचा जोडा फाटला. त्या दिवशी छोटू मळलेल्या शाळेच्या गणवेशात आपल्या फुटपाथी दुकानात बसलेला दिसला. मनात विचार आला, या वेळी  हा शाळा  सोडून इथे का बसला आहे? कदाचित याचा वडिलांची तब्येत खराब असेल. जोड़ा शिवायला १५-२० मिनिटांचा वेळ लागणार होताच. मनातील शंका दूर करण्यासाठी विचारले, अब्बू की तबियत ख़राब है क्या?  छोटू म्हणाला, स्कूल छोड़ दिया है. अब दुकान में हि बैठूंगा. मी विचारले, का? तो निर्विकारपणे म्हणाला, अब्बू जेल में है. क्यों???

तो म्हणाला, उस दिन तडके,अम्मीने अब्बू को उठाया, कहा सदर में दुकाने लुट रही है. पड़ोस का नानके दो-चार  कपडे के थान उठा के लाया है. मोहल्ले के बाकि मर्द भी वहीं गयें है और तुम हो की सो रहे हो. अब्बू उठला, मनात विचार केला हे ठीक नाही. पण त्याने कित्येक वर्षांपासून मुलांसाठी नवीन कपडे घेतले नव्हते. इथे तर संपूर्ण मोह्ल्लाच हिंदू असो वा मुसलमान दुकाने लुटायला निघाला होता. अब्बू पण त्या भीड़चा हिस्सा बनला. सदर मध्ये एका दुकानातून लोक कपड्यांचे थान डोक्यावर लादून बाहेर पडत होते. अब्बू हि त्या दुकानात घुसला. लालच बुरी बला होती है हि म्हण उगाचच नहीं. शरीराला पेलवत नव्हते तरी हि ३-कपड्यांचे थान डोक्स्यावर लादून अब्बू दुकानातून बाहेर पडला. अचानक आवाजे आली, पुलिस पुलिस. अब्बू घाबरला. त्याचा  तोल गेला. तो रस्त्यावर पडला. चोट तर लागलीच पण  पोलिसांनी हि त्याला रंगे हाथ पकडले. अश्यावेळी काय म्हणावे हे कळण्या सारखे वय नव्हते तरी हि मी हिम्मत करून  विचारले, कोई वकील किया है क्या? हां, एक वकील केला आहे, पण तो म्हणतो अब्बू के खिलाफ पक्के सबूत है, काही वर्ष  तरी अब्बूला जेल मध्ये काढावी लागतीलच. छोटू पुढे म्हणाला उस दिन अब्बू से गलती हो गयी. किस्मत खराब थी, और क्या.  खरोखरच!  किस्मतची मार छोटू वर पडली होती. त्याचे शिक्षण सुटले. लहान वयातच  घराचा संपूर्ण  गाडा त्याच्या खांद्यावर आला होता.
   
त्या वर्षीची ईद आणि दिवाळी कित्येकांच्या घरात अंधार ही घेऊन आली होती.  

No comments:

Post a Comment