Friday, July 10, 2015

कोफ्ते इन ग्रीन ग्रेवी



हिंदी अंग्रेजीचा तडका असलेले भाजीचे नाव वाचताना तुम्हाला किती छान वाटले असेल.  कालचीच गोष्ट आमचे चिरंजीव म्हणाले मिळमिळीत भाजी कुणाला ही खायला आवडत नाही, तसेच भाजीचे मिळमिळीत नाव बघून कुणी रेसिपी वाचणार नाही. आता या भाजीचे मराठी नाव 'दुधीचे भजे हिरव्या रस्यात' असे काही तरी  ठेवले असते, तर बहुतेक खादाड खाऊ लोकांनी भाजीची रेसिपी वाचण्याचे कष्ट घेतले नसते. असो.

दुधी आणि पालक दोन्ही भाज्या पोष्टिक असतात पण बहुतेक मुलांना (त्यात मोठे ही असतात) खायला आवडत नाही. पण 'कोफ्ते इन ग्रीन ग्रेवी' ही  भाजी घरातील लहान मोठे सर्वाना निश्चित आवडले.  

मुख्य साहित्य: अर्धा किलो कोवळी  दुधी  आणि  अर्धा किलो  पालक. 

आधी पालकाला व्यवस्थित धुवा. गॅस वर कढई ठेऊन त्यात पालक टाकून झाकण ठेवा. (पाणी चुकून सुद्धा टाकू नका)  ३-४ मिनिटे झाल्यावर गॅस बंद करा.  एका ताटात पालक काढून थंड करा. नंतर मिक्सर मधून काढून छान हिरवी पेस्ट तैयार करून घ्या.

दुधी किसून घ्या.  एका भांड्यात कीस टाकून त्यात स्वादानुसार तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, धने-जिरे पूड,  बेसन (३-४ मोठे चमचे) आणि १/२ छोटा चमचा खाण्याचा सोडा  टाकून घट्ट मिश्रण तैयार करा. (यात ही पाणी टाकू नका, मीठ टाकल्यावर दुधीला पाणी सुटतेच). 

कढई तेल टाकून छान ब्राऊन कोफ्ते तळून घ्या.  तळलेले कोफ्ते आणि पालकाची पेस्ट अशी दिसेल.



फोडणी:  कांदे २ मध्यम आकाराचे, टमाटर ३ मध्यम आकाराचे, लसूण ५-६ पाकळ्या, आले १/२ ईंच, हिरवी मिरची ३-४ मिक्सरमध्ये मध्ये टाकून पेस्ट तैयार करून घ्या (सर्व पदार्थांची एकत्र पेस्ट केली तरी स्वादात काही फरक पडत नाही. वेळेची बचत मात्र होते). आता कढईत तेल टाकून गॅसवर ठेवा. तेल गरम झाल्यावर नेहमी प्रमाणे मोहरी टाका. मोहरी तडकल्यावर१/२ छोटे चमचे हिंग टाका. नंतर तैयार केलेली  कांदे- टमाटर इत्यादीची पेस्ट त्यात घाला. तेल सुटू लागल्यावर, हळद (१/२ छोटा चमचा), गरम मसाला (१छोटा  चमचा, धनिया पावडर (२ छोटे चमचे) आणि  स्वादानुसार तिखट टाका. एखाद मिनिट परतून, त्यात पालकाची हिरवी पेस्ट  घाला. ही पेस्ट  ही २-३ मिनिटे परतून घ्या. नंतर  अंदाजे १-२ वाटी पाणी घालून (गरजेनुसार) त्यात चवीनुसार मीठ घाला. एक उकळी आल्यावर आधी तळलेले कोफ्ते घाला.  १-२ मिनिटानंतर गॅस बंद करा.  अश्यारितीने कोफ्ते इन ग्रीन ग्रेवी तैयार होईल. भाजी कशी दिसेल याचा अंदाज खालील दिलेल्या चित्रावरून कळू शकेल. दुधी आणि पालक न खाणारी मुले ही भाजी आनंदाने खातील.  


(टीप: ही भाजी सौ.ने केली होती, मी फक्त कशी केली त्याचे वर्णन करीत आहे) 



भाज्यांचे लोणचे



1 comment: