Monday, April 6, 2015

रामायण कथा : सीता ???


(लेखाचा उद्देश्य कुणाची ही भावना दुखविण्याचा नाही.   माझ्या दृष्टीने सीता कोण होती, हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे, एवढेच. बाकी ‘हरी अनंत हरी कथा अनंता’.)


रामायणात सीते भोवती एक गूढ वलय आहे. सीता पृथ्वीतून प्रगट झाली आणि पुन्हा पृथ्वीच्या कुशीत  समावली. आता ही सीता आहे तरी कोण? वाल्मिकी रामायणानुसार -

                  सीता अथ मे कृषतः क्षेत्रं लाङ्‍गलादुत्थिता ततः ॥ १३ ॥ 

                      क्षेत्रं शोधयता लब्धा नाम्ना सीतेति विश्रुता । 


(वाल्मिकीनी रामायणातल्या बालकांडातल्या ६६व्या सर्गात म्हंटले आहे, एकदा मिथिला नरेश राजा सीरध्वज (जनक) यज्ञासाठी भूमि शोधन करते समयी शेतात नांगर चालविताना नांगराच्या अग्रभागाने नांगरलेला भूमितून एक कन्या प्रकट झाली. सीता, नांगराच्या द्वारा ओढली गेलेली रेषा, हिच्यापासून उत्पन्न झाल्याकारणाने तिचे नाव सीता ठेवले गेले.  भूतलांतून प्रकट होऊन दिवसेंदिवस वाढणार्‍या राजा जनकच्या  कन्येला  अर्थात  सीतेला, कित्येक राजांनी येथे येऊन मागणी घातली.  जनकाने, जो व्यक्ती  परशुरामाने दिलेले शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवेल, त्याला आपली कन्या देण्याचा निश्चय केला. श्रीरामाने  ते शिवधनुष्य भंग केले आणि सीतेला प्राप्त केले.)

शेत नांगरताना सीता जमिनीतून प्रगट झाली. आता शेतातून प्रगट झालेली ही सीता कोण, हा प्रश्न डोळ्यांसमोर उभा राहिला. ऋग्वेदात सीता ह्या शब्दाचा उल्लेख आहे.  

ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ५७ (कृषि सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम: देवता - सीता छन्द - त्रिष्टुप्


                            अर्वाची सुऽभगे भव सीते वंदामहे त्वा । 

                      यथा नः सुऽभगा अससि यथा नः सुऽफला अससि


भाग्यशालिनी सीते, इकडे आगमन कर, तुला आम्ही वंदन करतो. कारण तेणेंकरून तूं आम्हाला भाग्यधात्री होतेस; आम्हाला सफलार्थ करणारी होतेस. ॥ ६ ॥


इंद्रः सीतां नि गृह्णातु तां पूषा अनु यच्छतु ।
 सा नः पयस्वती दुहां उत्तरांऽउत्तरां समां ॥


सीतेचा स्वीकार इंद्र करो; तो आमच्याकरितां वर्षानुवर्षे दुग्धानें परिप्लुत होऊन आम्हांस  धनधान्यरूप दुग्ध देवो. ॥ ७ ॥


सीतेचे आगमन झाल्याने शेतकरी समृद्ध होतो. वैदिक काळात लोक देवराज इंद्राला बलिभाग अर्पित करायचे आणि इंद्र त्यांचे रक्षण करायचा. हा अन्नरुपी कर म्हणजे सीता. राज्याची सर्व भूमी राजाचीच असते. प्राचीन काळात राजा अन्नाच्या रूपानेच कर घ्यायचा. सीताध्यज नावाचा राजकीय अधिकारी अन्नाच्या रूपाने हा कर शेतकऱ्यांकडून वसूल करायचा.  


दक्षिण समुद्रापासून गंगेच्या तटा पर्यंत लंकेच्या राजा रावणाचे साम्राज्य पसरले होते. रावणाचे अधिकारी  ग्रामस्थ, वनवासी सर्व जाती आणि समुदायांकडून ‘सीता’ वसूल करायचे. न्यायानुसार प्रजेकडून वसूल केलेल्या करांचा अधिकांश भाग प्रजेच्या कल्याणासाठी वापरला पाहिजे. पण रावण भारतीय लोकांना गुलाम समजत होता. लंकेची तिजोरी भरणारे गुलाम. गुलामांचा छळ केला पाहिजे. त्यांना अज्ञान आणि अशिक्षेच्या अंधारातच ठेवले पाहिजे. हीच रावणाची नीती होती. आपल्या वर अन्याय होतो आहे, हे अशिक्षित आणि अज्ञानी माणसाला बहुधा कळत नाही आणि कळले तरी अन्याय आणि अत्याचाराचा विरोध करण्याची क्षमता ही त्याच्यात  नसते. दुसर्या शब्दात म्हणायचे झाले तर रावणाने भरतभूमीच्या सीतेचे हरण केले होते. लंका सोन्याची झाली, तिथले लोक समृद्ध झाले. आपल्या दहा ही इंद्रियाने भौतिक सुखाचा उपभोग करू लागले (आजच्या अमेरिकेच्या प्रमाणे). कदाचित या साठीच रावणाला दशानन म्हंटले असावे.   

ऋषी-मुनी आश्रम स्थापित करून, दंडकारण्यात शिक्षा आणि ज्ञानाचा प्रचार करत होते. साहजिकच त्यांचे हे कार्य रावणाला आवडणारे नव्हते. ऋषी-मुनीचे आश्रम  नष्ट करणे, त्यांची हत्या करणे हे रावणाच्या सैनिकांचे रोजचे कार्य. लंकेचे राज्य अयोध्येच्या सीमेपर्यंत पोहचले होते, तरी ही महाराज दशरथ यांची हिम्मत, रावणा विरुद्ध युद्ध पुकारण्याची नव्हती. वाल्मिकी रामायणात ही याचा उल्लेख आहे.

                       स हि वीर्यवतां वीर्यं आदत्ते युधि रावणः । 

                     तेन चाहं न शक्नोमि संयोद्धुं तस्य वा बलैः ॥
                      सबलो वा मुनिश्रेष्ठ सहितो वा ममात्मजैः ।


(मुनिश्रेष्ठ! तो रावण युद्धामध्ये सामर्थ्यवानांच्या वीर्याचे (बलाचे) ही अपहरण करतो, म्हणून मी आपली सेना आणि पुत्रांसहितही त्याच्याशी आणि त्याच्या सैनिकांशी युद्ध करण्यास समर्थ नाही. ॥ बालकांड २३ १/२ ॥)


पूर्वी परशुरामाने अन्यायी क्षत्रियांचा पराभव केला होता. परशुरामाने जनकाच्या पूर्वज देवरात यांना शिवधनुष्य दिले होते. अश्या वेळी महर्षि विश्वामित्रांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीरामाने हेच धनुष्य उचलले आणि भरतभूमीला राक्षसी अत्याचारांपासून मुक्त करण्याचा निश्चय केला. राजा जनकाने ही प्रसन्नता पूर्वक  श्रीरामाला ‘सीता’ अर्पण केली. भरतभूमीला रावणाच्या गुलामीतून मुक्त केल्या शिवाय. सीता श्रीरामाला प्राप्त होणे अशक्य होते. त्या साठी रावणाचे राज्य नष्ट करणे आवश्यक होते. रामाने दंडकारण्यात राहणाऱ्या ग्रामस्थ, निषाद, शबर, भिल्ल, वानर, आश्रमवासी आणि समस्त वनवासी समुदायाला एकत्र केले आणि लंकेवर हल्ला केला.

आता सीता वसूल करण्याचा अधिकार अयोध्येचा राजा अर्थात श्रीरामांचा जवळ आला.  ‘सीता’ अयोध्येत आली. अयोध्या ही सोन्याची झाली. पण प्रजेची समस्या तीच राहिली. शेवटी एका सामान्य प्रजाजानाने राजाला अर्थात श्रीरामचंद्रांना याची जाणीव करून दिली. ‘सीतेचा’ उपयोग पुन्हा प्रजेच्या, शेतकर्यांच्या आणि वनवासी जनतेच्या कल्याणासाठी होऊ लागला. कवीच्या शब्दांत ‘सीता’ पुन्हा वनवासी झाली व जमिनीच्या कुशीत समावली. शिक्षा आणि ज्ञानाचा प्रसार संपूर्ण भरतभूमी वर पसरला.  अश्या रीतीने रामराज्यात चारी वर्णाचे लोक आणि अरण्यवासी प्रजाजन सुखी झाले.  

No comments:

Post a Comment