Sunday, December 7, 2014

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।


कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। 

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ २-४७

भगवंत म्हणतात:
१. माणसाला कर्म करण्याचा अधिकार आहे 
२. कर्मफळ माणसाच्या हातात नाही. 
३. कर्मफळाची आशा न ठेवता अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे.


भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातल्या ह्या श्लोकाला वाचताना मनात गोंधळ हा निर्माण होतोच. बहुतांना असे वाटते हा श्लोक माणसाला कर्मापासून परावृत्त करून भाग्यवादी बनवितो.  पण हे खरे नाही. आपल्याला नेहमीच असे वाटते, आपण जर कर्म केले तर त्याचे फळ मिळायलाच पाहिजे. हेच योग्य आणि न्यायपूर्ण. जर कर्माचे फळ मिळणार नसेल तर कर्म कशाला करायचे, असा प्रश्न मनात येणारच. मग भगवंतांनी गीतेत कर्म फळावर, कर्म करणार्याचा अधिकार नाही, हे का म्हंटले आहे? हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

आपण पाहतोच मुलाने उत्तम अभ्यास केला तर त्याला परीक्षेत उत्तम गुण मिळतात. उत्तम अभ्यास = उत्तम गुण सहज सोपी नियम आहे. पण नेहमीच असे होत नाही.  कुणी विद्यार्थी आजारी पडतो आणि पेपर देऊ शकत नाही. कुणाला अपघात होतो, परीक्षा केंद्रावर पोहचू शकला  नाही.  कुणाला पेपर तपासताना क्वचित होणाऱ्या चुकी मुळे ९० च्या जागी ०९ मार्क मिळतात.  तो चक्क नापास होतो.  SSCचा टायपिंगचा पेपरात नेहमीचेच आहे, प्रत्येक केंद्रात २-३ परीक्षार्थी  केवळ  टाईपरायटर  खराब झाल्या मुळे  अयशस्वी होतात. त्यांना सरकारी नौकरी मिळत नाही. त्यांची तैयारी व्यर्थ जाते.  शेतकरी ही उत्तम बियाण्यांची पेरणी करतो, शेतात जातीने लक्ष देतो,  खत,  पाणी व  मशागत सर्व उत्तम प्रकारे करतो, पिक ही भरपूर येते, पण कित्येकदा गारपीट, अवेळी पावसामुळे त्याचे अतोनात नुकसान होते. त्याला ही पाहिजे तसे फळ मिळत नाही.    


वरील उदाहरणांनी एक बाब स्पष्ट होते, सर्वांनी उत्तम कर्म केले पण तरी ही त्यांना फळ मिळाले नाही.  कर्म करणे माणसाच्या हातात आहे, पण आपल्या कर्मावर प्रभाव टाकणाऱ्या इतर बाबींवर आपले नियंत्रण नसतेदेश, काळ, राजनीतिक परिस्थिती एवं इतरांच्या कर्मांचा प्रभाव ही आपल्या कर्मांवर पडतो.  समर्थांनी या आपल्या कर्मांवर प्रभाव  टाकणार्या इतर  बाबींचे वर्णन, "अध्यात्मिक ताप"  (देह,  इंद्रिय आणि प्राण यांच्या संयोगाने होणारे ताप - शारीरिक व मानसिक व्याधी इत्यादी ) आणि "आधिभौतिक ताप" (सर्व पंचभूतांच्या संयोगाने जे त्रास होतात अर्थात सर्व प्रकारचे बाह्य कारणे  - अपघात, सर्पदंश, चोरी, डकैती, आग, अतिवृष्टी, पूर, परचक्र, राजा एवं अन्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून छळ इत्यादी)   [दशक , समास ६ आणि ७] असे केले आहे. या सर्व बाबींवर कर्म करणार्याचे नियंत्रण नसते, म्हणूनच भगवंतानी म्हंटले आहे, कर्मफळावर कर्म करणाऱ्याचा अधिकार नाही, केवळ कर्मावर त्याचा अधिकार आहे

कर्मांचे फळ मिळाले नाही तर माणूस निराश होतो. आज ह्या मुळेच अनेक शेतकरी आत्महत्या करतात, पेपर मध्ये नापास झाल्याने विद्यार्थी ही आत्महत्या करतात. किंवा लोक कर्म करणे सोडून देतात.  मृत्युलोकाला 'कर्मलोक' ही म्हणतात, इथे कुणाला ही कर्म चुकलेले नाही. कर्म हे करावेच लागणार,  त्या शिवाय या लोकात कुणी जगू शकत नाही.   म्हणूनच भगवंतानी गीतेत म्हंटले आहे, अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे.  असे  कर्म  केल्याने आपल्या कर्माचे आपल्याला पाहिजे तसे फळ मिळाले नाही तरी ही आपल्याला त्याचा जास्त त्रास होणार नाही.


कर्माची अपेक्षा न ठेवता उत्तम  रीतीने कर्म करणे, हे जर शेतकरी राजाला कळले, तर तो कुठल्या ही परिस्थितीत निराश होणार नाही.  आत्महत्या न करता पुन्हा पुढच्या पिकाच्या तैयारीला लागेल. विद्यार्थी ही पुन्हा जोमाने अभ्यास करून, परीक्षेत उत्तम गुण मिळविण्याचा प्रयत्न करेल. हेच भगवंताना गीतेत सांगायचे असेल.










No comments:

Post a Comment