Thursday, April 18, 2024

किस्सा झीरो ऑईल मूगाच्या डाळीच्या गोळ्यांची कढ़ी

 दोन एक महिन्यांपूर्वी यू ट्यूब वर झिरो ऑइल गोळ्यांची कढ़ी कशी करतात वाचले होते. सौ.ला अनेकदा बिना तेलात तळलेल्या गोळ्याची कढ़ी करायला विनंती केली होती. सवयी  प्रमाणे माझ्या विनंतीला तिने व्हिटो केला. अर्थात केराच्या टोपलीत टाकले. चिरंजीवांना माझ्या खाद्य प्रयोगांची भीती वाटते. तो सदैव सौ.ची अर्थात  आईंची घेतो. पण आज सोन्याचा दिवस उगवला वरक् फ्रॉम होम असले तरी चिरंजीव आठवड्यातून दोन दिवस तरी ऑफिसला जातात. सौच्या बीसीची वेळ सकाळी 11 असते. अर्थातच जिच्या घरी जमतात तिथे जेवणाचा कार्यक्रम असतो. या शिवाय गप्पा-टप्पा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जनकपुरी- विकासपुरी भागातील सांस्कृतिक चळवळींचे आदान-प्रदान करून, पोटातला भार हलका करून तीन एक वाजेपर्यंत सर्व  प्रसन्न मनाने घरी परततात.



सकाळी  लवकर उठून स्वैपाक केला कारण चिरंजीव आठ वाजता निघणार होते. चिरंजीव गेल्यावर सौ.अंघोळीला गेली. हा मौका साधून तृतीयांश वाटी मूग डाळ एका वाटीत गरम पाण्यात भिजवली. वाटी बैठीकीच्या खोलीत माझ्या पुस्तकांची रेक आहे. त्यात ठेऊन दिली. माझ्या बाबतीत सौ.चे नाक कान आणि डोळे अत्यंत  तीष्ण तरी तिला वास लागला नाही. अकरा वाजता सौ. बीसीला गेली आता तीन वाजेपर्यंत काळजी नव्हती. वाटी आणून स्वैपाक घरात ठेवली. 

दुपारी बारा वाजता गच्चीवर जाऊन कढीपत्ता तोडून आणला. डाळ धुवून पाणी निथळायला चहाच्या गाळणीत ठेवून दिली.  दोन चमचे  दही आणि त्यात एक चमचा बेसन घालून मिक्सीत फेटाळून घेतले आणि ४०० ml दहा रू वाली छाज मध्ये मिसळून कढईत टाकले. त्यात अंदाजे हळद, मीठ, चिमूट भर हिंग, एक चहाचा चमचा जिरे आणि सौंप, दोन लाल मिर्च्या, कढी  पत्ता आणि आले किसून टाकले. गॅस लावला. आता मिक्सर मध्ये चार लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची आणि चार पाच काळी मिरी टाकून  भिजलेली डाळ पिसून घेतली. मिश्रण एका भांड्यात काढून त्यात हळद, गरम मसाला, मीठ आणि एक मोठा चमचा बेसन मिश्रण एक जीव आणि घट्ट केले. कढईत टाकलेली कढी उकळू लागल्यावर त्यात  मिश्रणाचे दहा एक छोटे-छोटे गोळे टाकले. तीन एक मिनिटात गोळे वर दिसू लागले. आता मिश्रणाच्या भांड्यात अर्धा वाटी पाणी टाकून उरलेले मिश्रण ही कढीत टाकले. दोन एक मिनिटात  कढ़ीचा रंग बदलून पिवळा झाला. आता एक गोळा काढून तपासला. थोडा कच्चा वाटला. थोडे पाणी आणि चिमूटभर मीठ स्वाद ठीक करण्यासाठी टाकले. दोन एक मिनिटांनी एक चहाचा चमचा काश्मिरी लाल मिरची टाकली. कढ़ी  थोडावेळ उकळू दिली. गॅस बंद केला. मोबाईल वर कढईतल्या कढ़ीचा फोटो घेतला. समाधान झाले नाही. पुन्हा नेहमीसारखा फोटू घेतला. 

कढ़ी खरोखर मस्त झाली होती. अर्धी सौ. आणि चिरंजीवासाठी ठेवली.  दोघांना आवडली. 


Monday, April 15, 2024

बद्ध लक्षण समासाचे निरूपण

 जय जय रघुवीर समर्थ


आज श्रीमद् दासबोधातील बद्ध निरूपण समासाचे निरूपण करण्याचा प्रयत्न मी आपल्या अल्पबुध्दीने करत आहे. समर्थ म्हणतात सृष्टीत अनंत जीव आहेत तथापि त्यांचे चारच वर्ग आहेत.  बद्ध,  मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. पहिला प्रश्न मनात घेणार बद्ध म्हणजे काय? बद्ध म्हणजे बांधलेला जीव. याचे एक छोटेसे उदाहरण, एक माणूस कुत्र्याला साखळीने बांधून सकाळी फिरायला जातो. साखळीने बांधलेला कुत्रा प्रशिक्षित असेल तर तो मालकाच्या मागे निपुटपणे चालतो. पण प्रत्यक्षात आपण काय पाहतो. कुत्रा पुढे-पुढे पळत आहे आणि मालक त्याच्यामागे कसे तरी धडपडत साखळी पकडून कुत्र्याच्या मागे चालण्याचा प्रयत्न करताना दिसतो. कधी- कधी कुत्रा साखळी तोडून पळू लागतो. कुणालातरी चावतो. मग वादावादी, हाणामारी, ज्याला चावला त्याचा उपचाराचा खर्च, कधी-कधी कोर्ट केसेस इत्यादी ही मालकाच्या नशिबी येतात. कुत्रा पाळण्याचे सुख त्याला मिळत नाही. पण मनस्ताप मात्र नशिबी येतो. दुसऱ्या शब्दांत इथे कुत्र्याच्या मोहात पडून कुत्र्या ऐवजी मालकच साखळीने बद्ध झालेला आहे. आपल्यापाशी  नाक, कान, डोळे, स्वाद, स्पर्श, हात, पाय इत्यादी इंद्रिय रुपी कुत्रे आहेत. आपण जर या इंद्रिय रूपी कुत्र्यांच्या मोहात बद्ध झालो तर हे कुत्रे स्वैराचार करू लागतील. आपली दशा कुत्र्याच्या मालका सारखी होईल.


चौऱ्यांशी लक्ष योंनीत भटकल्या नंतर आपल्याला मानव जन्म मिळतो. मानवाला देवाने बुद्धी दिलेली आहे. आपण या बुध्दीचा उपयोग जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी परमार्थ साधण्यात करणे अपेक्षित. समर्थांनी, आपल्याला परमार्थ साधण्याचा सोपा मार्ग कळला पाहिजे आणि आपल्या इंद्रिय रुपी कुत्र्यांना  मोह- माया पासून दूर ठेवण्यासाठी या समासात बद्ध लक्षणांचे वर्णन केले आहे. समर्थ म्हणतात:


आता बद्ध तो जाणिजे ऐसा 

अंधारींचा अंध जैसा. 

चक्षुविण दाही दिशा.

शून्याकार.


ज्याच्या डोळ्यांसमोर सर्वत्र अंधकार आहे त्याला:


न कळे सारासार विचार.

न कळे स्वधर्म आचार.

न कळे कैसा परोपकार.

दानपुण्य.


न कळे भक्ती न कळे ज्ञान.

न कळे वैराग्य न कळे ध्यान.

न कळे मोक्ष न कळे साधन.

या नाव बद्ध.


डोळे नसलेल्या माणसाला सर्वत्र अंधारच दिसतो. त्याच प्रमाणे बद्ध माणूस अंधारातच चाचपडत असतो. त्याला धर्माचा मार्ग माहीत नसतो. त्याला कर्माचा मार्ग माहीत नसतो. स्वधर्म, आचार, विचार माहीत नसतो. तीर्थ, व्रत, दान, पुण्य,ज्ञान, वैराग्य  तो जाणत नाही. दया, करुणा,  मैत्री, शांती, क्षमा त्याला माहित नसते. तो सदैव इंद्रिय जनित स्वार्थ सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतो. तो सदा सर्वकाळ काम, क्रोध, गर्व, मद, मत्सर आणि असूयात बुडालेला असतो.  अश्या बद्ध व्यक्तीचे वर्णन करताना समर्थ म्हणतात:

नैंत्री द्रव्यधारा पाहावी. 

श्रवणी द्रव्यदारा ऐकावी. 

चिंतनी द्रव्यदारा चिंतावी

 या नाव बद्ध.


समर्थ म्हणतात, असा व्यक्ती काया, वाचा, मनसा द्रव्य दारेच्या भजनात व्यस्त असतो. स्वार्थापोटी सदैव अविचार त्याच्या मनात येत राहतात. तो कपट- कारस्थान रचतो, भ्रष्टाचार करतो, निष्ठुर  होऊन दुसऱ्यांचा जीव ही घेतो. सर्व प्रकारचे पातक तो करतो. शेवटी कोर्ट, कचेरी जेल यात्रा त्याच्या नशिबी येते.  


इंद्रिय सुखांचा बहु आनंद घेतल्याने अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधींनी माणूस ग्रस्त होतो.  सांसारिक भोगांचा आनंद ही त्याला घेता येत नाही. अश्या बद्ध जीवाला परमार्थ साध्य होण्याच प्रश्नच येत नाही. त्याची स्थिती कुत्र्याच्या मालका सारखी होते त्याला मालक आपण आहोत की कुत्रा हेच कळत नाही. अश्या व्यक्तींसाठी समर्थ म्हणतात:


न कळे परमार्थाची खूण.

न कळे अध्यात्म निरूपण.

न कळे आपणास आपण. 

न कळे तत्वतः केवळ.

या नावबद्ध


साडे तीनशे वर्ष आधी समर्थांनी ज्या बद्ध लक्षणांची वर्णने केली आहे ती आज ही आपण सर्वत्र पाहतो. आज आपण घर राहण्यासाठी नाही तर इंद्रियांना सुख देणाऱ्या एसी, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन इत्यादींनी सजविण्यासाठी घेतो. डोळ्यांना घर सुंदर दिसावे म्हणून भिंतींवर रासायनिक पेंट लावतो. अंघोळ शरीर स्वच्छ करण्यासाठी नाही, तर शरीर सुंदर दिसण्यासाठी करतो. त्यासाठी रासायनिक साबण, शेंपू, क्रीम वापरतो. केसांना कलर करतो. जेवण शरीराच्या पोषणासाठी ऋतु अनुसार नव्हे, तर जिभेच्या स्वादासाठी करतो. पित्झा, बर्गर, चॉकलेट, केक, मैग्गी, इत्यादी खातो. स्टेटससाठी एसी कार वापरतो. स्वतःच्या अपरमित अनंत ईच्छा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात नवरा बायको दोन्ही जीवापाड मेहनत करतात. क्षण भराचा अवकाश ही त्यांना मिळत नाही.


 इंद्रिय भोगात आत्मकेंद्रित झाल्याने ते अति व्यवहारी बनतात.  त्यांना आई वडील ही इंद्रिय सुखाच्या मार्गात बाधा वाटतात. काहींना तर मुल-बाळ ही नकोसे वाटतात. कुत्रा पाळून हौस भागवतात. आजच्या या अश्या पिढीसाठीच बहुतेक समर्थांनी साडे तीनशे वर्षापूर्वी म्हंटले आहे:


जागृति स्वप्न रात्रि दिवस

ऐसा लागला विषय ध्यास.

नाही क्षणाचा अवकाश.

या नाव बद्ध.


अश्या परिस्थितीत परमार्थ  देव धर्माचा विचार ही त्यांच्या मनात येणे  शक्य नाही.


पण शेवटी परिणाम काय.  त्वचेचे आजार,  वायू प्रदूषणामुळे होणारे अस्थमा  इत्यादी श्वसनाचे आजार. प्रदूषित पाणी आणि जेवणामुळे मधुमेह, हृदय रोग, कॅन्सर, इत्यादी आजार. लिव्हर किडनी खराब होतात. शरीराचे अवयव दुर्बल होतात. डोळे तर जवळपास सर्वांचे खराब होतात. जीवापाड मेहनत करून कमविलेला पैसा आजारात खर्च होतो. परिस्थीती अशी आहे जवळ पैसा असला तरी ५० टक्केहून जास्त वरिष्ठ नागरिक भविष्यात वृद्धाश्रमात दिसतील. आज जवळपास संपूर्ण समाज इंद्रिय सुखानसाठी बद्ध झाला आहे. माणसाच्या अति उपभोगामुळे पृथ्वीचे पर्यावरण बिघडले आहे. त्याचे वाईट परिणाम ही आपण भोगतो आहे. शेवटी बद्ध व्यक्ती संसारात तर अपेशी राहतोच, पण त्याला परमार्थ ही साध्य होत नाही.त्याची स्थिती ‘धोबी का कुत्ता ना घर का, ना घाट का’ सारखी होते.


समर्थांनी आजच्या पिढीला सावध करण्यासाठी आणि आपल्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय रुपी कुत्र्यांना परमार्थाच्या मार्गावर चालण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी, पहिली पायरी म्हणून या समासात जवळपास  १०० बद्ध लक्षणांचे विस्तृत वर्णन केले आहे. एकदा आपल्याला आपले इंद्रिय जनीत दोष कळले की आपण त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करूच. हे दोष कसे दूर करायचे याचे वर्णन समर्थांनी पुढील मुमुक्षु लक्षण या समासात केले आहेत.


जय जय रघुवीर समर्थ




Wednesday, April 3, 2024

वाढदिवस स्पेशल आलू बोंडे

आज माझा ६३वां  वाढदिवस. सौ. ने  वाढदिवस साजरा करण्यासाठी सकाळी नाश्त्यात शिरा आणि आलू बोंड्यांचा बेत केला. सौ. ने सकाळी अंघोळ करून  गायीच्या तुपात रव्याचा शिरा केला. काजू बदाम ही त्यात तळून घातले होते. पूजेत  शिऱ्याचा नैवैद्य दाखविला. नंतर आलू बोंड्याची तैयारी सुरू केली.


पाच-सहा बटाटे कुकर मध्ये उकडायला ठेवले. कोथिंबीर, कैरी, पुदिना (घरचा), आले, लसूण आणि भरपूर हिरवी मिरची टाकून झणझणीत हिरवी चटणी बनवली. एक कांदा, चार टॉमेटो, लसूण, आले, आणि  थोडे तिखट टाकून थोडी टॉमेटोची लाल रंगाची सौम्य चटणी बनवली.

उकडलेले बटाटे थंड पाण्यात टाकून थंड करून किसले (असे केल्याने स्वाद उत्तम राहतो), त्यात १०० ग्राम पनीर ही किसून टाकले (पनीर हे पाहिजे, त्याशिवाय मज्जा नाही), थोडी फुल गोबी ही किसून टाकली.(चव मस्त येते). कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक कापून टाकली. हळद, आंबट, तिखट, गरम मसाला आणि चवीसाठी मीठ टाकून मिश्रण एक जीव केले. हळद आणि मीठ टाकून बेसनाचा घोळ तैयार केला. मिश्रणाचे गोळे करून बेसनात बुडवून तेलात तळले.  सौ. ने सोम बाजारातून कमी तिखट वाल्या मोठ्या हिरव्या मिरच्या आणल्या होत्या. उरलेल्या बेसनाच्या घोळात बुडवून मिरचीचे भजे केले. आलू बोंड्या सोबत चवीसाठी काही मिरच्या तेलात तळल्या. त्या मिरच्यांवर लिंबू पिळले.

झणझणीत भजे खाल्यानंतर. शिऱ्यावर ताव मारला. अश्या रीतीने आजच्या दिवसाची सुरुवात झाली. 

Thursday, February 22, 2024

वार्तालाप (३१):: गजेंद्रू महासंकटि वाट पाहे

 जय जय रघुवीर समर्थ 

गजेंद्रू महासंकटि वाट  पाहे
तया कारणे श्रीहरी धांवता आहे.
उडी घातली जाहला जीवदानी 
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी.(११८)

समर्थ म्हणतात, एकदा महा बलशाली गजेंद्र एका सरोवरात आपल्या परिवारासंगे जल क्रीडा करत होता. अचानक एका मगराने त्याचे पाय धरले आणि त्याला पाण्यात ओढू लागला. गजेंद्र जमिनीवर भल्या मोठ्या वृक्षांना सोंडेने उपटून टाकू शकत होता. सिंहलाही आपल्या पायदळी तुडवू शकत होता. पण पाण्यात या शक्तींचा काही एक उपयोग नव्हता. स्वतःचा जीव वाचविण्यासाठी गजेंद्रने भगवंताचे स्मरण केले आणि मदतीची याचना केली. गजेन्द्रची आर्त हाक ऐकून भगवंत धावत गेले आणि गजेंद्रला मगर पाशातून मुक्त केले.

अनेक सुशिक्षित लोकांची ही धारणा असते, पुराण कथा म्हणजे भाकड कथा. प्रत्यक्षात पुराण कथा आपल्याला सांसारिक भोग भोगून ही परमार्थाच्या प्राप्तीचा मार्ग दाखवितात. 

गजेंद्र म्हणजे बुद्धिमान मानव. सरोवरातील जलक्रीडा म्हणजे सांसारिक भोग. मगरपाश म्हणजे कधी न तृप्त होणारी भोगलिप्सा. भोगलिप्सेत बुडालेल्या मानवाच्या नशीबी अखेर फक्त सांसारिक दुःखच येतात. त्याला जन्म मरणाच्या  चक्रातून त्याला मुक्ती मिळणे अशक्यच. 

आजच्या घटकेला मानवाला आपल्या शक्ती आणि बुध्दीचा अहंकार झाला आहे. अहंकार सोबत मद, मोह, मत्सर आणि वासना ही बलवती होतेच. मानवाला वाटते सर्व पृथ्वी फक्त आपल्याच भोगण्यासाठी आहे. आपल्या अपरिमित इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण समस्त वनस्पती आणि जीव सृष्टीचे विनाश करतो आहे. एक उदाहरण, कीटक, पशु-पक्षी शेतीला त्रास देतात. पशु - पक्षी, जनावरांना मारून टाका. जमिनीत जहर टाका, विषाक्त रसायन हवेत उडवा. कीटकांचा विनाश करा. असे करताना आपण विसरून जातो की हे विषाक्त अन्न आपल्यालाच खायचे आहे. मानवाचा अहंकार तर एवढा मोठा की जो कोणी माझ्या भोग मार्गात आडवा येईल त्याला मी नष्ट करणार, मग तो मानव का असेना. एवढे सर्व करून मानवाची भोगलिप्सा शांत झाली आहे का. उत्तर नाही. पण या सर्व मानवीय दुष्कृत्यांचा परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. पृथ्वी मातेच्या अति दोहनामुळे अन्न जल आणि वायू दूषित झाले आहे. ग्लोबल वॉर्मिग मुळे पृथ्वीच्या वातावरण बिघडले आहे. अतिवृष्टी, दुष्काळ रोजचे झाले आहे. हजारो लोक दरवर्षी युद्धात मरत आहे, वनस्पती जीव सृष्टी वेगाने नष्ट होत आहे. दर दुसरा व्यक्ती  शारीरिक आणि मानसिक व्याधीने ग्रस्त आहे. आपण असेच भोगरुपी मगर पाशात अडकून राहू तर सांसारिक सुख मिळणार नाहीच आणि परमार्थ सिद्ध होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.  याशिवाय  मानव जातीच नष्ट झाली तर अब्जावधी वर्षे आपल्याला लक्षावधी हीन योनीत भटकावे लागेल. कारण मोक्ष मार्गावर चालण्याची बुद्धिमत्ता फक्त मानवापाशी आहे, असे विद्वानांचे मत आहे.

प्रश्न मनात येणारच, या भोगरूपी मगर मिठीतून मुक्तीसाठी कुणाला याचना करायची.  समर्थ म्हणतात,  

दीनानाथ हा राम कोदंडधारी
पुढें देखतां काळपोटीं भरारी.
जना वाक्य नेमस्त हें सत्य मानी
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. (२८)

जेंव्हा श्रीराम हातात धनुष्य बाण  घेऊन दुःखी भक्तांच्या मदतीला धावत येतात, तेंव्हा काळाचेही काही चालत नाही. कारण कोदंडधारी राम आपल्या भक्ताची  कधीही उपेक्षा करीत नाही. समर्थ पुढे म्हणतात,"नुपेक्षी कदा राम दासाभिमानी" माझे वाक्य १०० टक्के सत्य आहे.

भगवंताचे नामस्मरण सांसारिक भोगातून मुक्तीचा सर्वात सौपा उपाय आहे. गजेंद्रने भगवंताचे नामस्मरण केले आणि तो मोह पाशातून मुक्त झाला. भगवंताचे  नाव घ्यायला काहीही खर्च येत नाही. कोणत्याही विधि- विधानाचे पालन करावे लागत नाही. जेंव्हा ही वेळ मिळेल, तेंव्हा उठता-बसता, जेवता, काम करता भगवंताचे  नामस्मरण करता येते. सतत नामस्मरण केल्याने हळू-हळू आपली वृत्ती पालटते. अहंकार नष्ट होतो. सांसारिक जीवनात उभोगाची आणि वासनेची मर्यादा आपल्याला कळते. भगवंताने निर्मित केलेल्या समस्त जीवसृष्टी प्रति प्रेम उत्पन्न होते. उपनिषदात स्वयं भगवंत म्हणतात, जो सर्व प्राण्यांमध्ये मला पाहतो, कुणाशीही घृणा करत नाही, सर्वांच्या जगण्याचा अधिकार जपतो, तोच मला प्राप्त करतो. असा व्यक्ती पूर्ण आयुष्य जगतो आणि सांसारिक मोहपाशातून मुक्त होतो. भगवंताच्या नाम स्मरणाने परमार्थाचा मार्ग सहज सुगम होतो. एवढेच नव्हे तर या मार्गावर चालून आपण समस्त मानव जातीला ही विनाशापासून वाचविण्यात हातभार लावू शकू. माझ्या मते समर्थांनी मनाच्या या श्लोकाच्या माध्यमाने मानव जातीला हाच उपदेश केला आहे.



Monday, February 5, 2024

वार्तालाप (३०): अहल्या शिळा राघवे मुक्त केली

अहल्या शिळा राघवे मुक्त केली 
पदी लागतां दिव्य होऊनी गेली. 
जया वर्णिता सिणली वेदवाणी
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी.

समर्थ म्हणतात, श्रीरामांच्या चरणांचा स्पर्श होताच शिळा रुपी अहल्या मुक्त झाली. हा श्लोक वाचतना, अनेक प्रश्न मनात आले. अहल्या खरोखर शिळा झाली होती का? श्रीरामांच्या चरणाचा स्पर्श होतास ती पुन्हा मूळ स्वरूपात आली, हे कसे संभव आहे?  समर्थांच्या या श्लोकाचा भावार्थ वाल्मिकी रामायणातील कथेत शोधण्याचा प्रयत्न मी आपल्या अल्प बुध्दीने केला आहे.

महर्षि विश्वामित्र, राम, लक्ष्मण आणि अनेक ऋषी मुनीं सोवत मिथिलेत पोहोचले. श्रीरामांना तिथे एक ओसाड निर्जन आश्रम दिसले. श्रीरामाने महर्षि विश्वामित्रांना विचारले या आश्रमात ऋषी, मुनी, आचार्य, ब्रह्मचारी इत्यादी कोणीच का दिसत नाही? ऋषी विश्वामित्र म्हणाले, हे आश्रम गौतम ऋषींचे आहे. पूर्वी  देवराज इंद्राने महर्षि गौतम ऋषींच्या पत्नी अहल्येवर बलात्कार केला होता. अहल्या निर्दोष होती तरी समाजाने अहल्येलाच दोषी ठरवले आणि गौतम ऋषींच्या आश्रमावर बहिष्कार टाकला. आज ही परिस्थिती विशेष बदललेली नाही. स्त्रीवर अत्याचार झाला तरी लोक स्त्रीलाच दोष देतात. त्यावेळी ही समाजाने इंद्रासोबत अहल्येलाही दोषी ठरवले. तिला वाळीत टाकले.

एकदा समाजाने ज्या व्यक्तीशी "रोटी आणि बेटीचा" व्यवहार बंद करून वाळीत टाकले की त्या व्यक्तीची स्थिती एखाद्या वाळवंटातील दगडा सारखीच होते. अहल्येची स्थिती अशीच झाली होती म्हणून समर्थाने तिला शिळा असे संबोधित केले. समाजाने बहिष्कृत केले तरी काय झाले, परमेश्वरापासून तिला कोणीच दूर करू शकत नव्हता. माता अहल्येने श्रीरामांच्या भक्तीत जगण्याचा आधार शोधला. आपले दुःख आणि पीडा विसरून ती तपस्वी,  प्रभुरामचंद्रांच्या  नाम  स्मरणात दंग झाली. असो.

समाजातील वरिष्ठ, प्रतिष्ठीत लोकांना, उदा. गावातील सरपंच ते राजा इत्यादींना,  बहिष्कृत व्यक्तिला पुन्हा समाजात घेण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार होता. पण निर्णय राबविण्यासाठी समाजाने त्या व्यक्तीचे आतिथ्य स्वीकार करून त्याला पुन्हा समाजाने  स्वीकार केले याची पावती देणे ही गरजेचे. बहुधा यासाठीच बहिष्कृत व्यक्तीने समाजाला किंवा गाव जेवण देण्याची परंपरा सुरू झाली. सौप्या शब्दांत बहिष्कृत व्यक्तीचे आतिथ्य स्वीकार करणे म्हणजे समाजाने त्याला स्वीकार करण्याची पावतीच.

माता अहल्या निर्दोष आहे, समाजाने तिच्या स्वीकार केला पाहिजे या हेतूने श्रीराम गौतम ऋषींच्या आश्रमात आले. गौतम ऋषी आणि माता अहल्याने सर्वांची पाद्यपूजा करून स्वागत केले. स्वतः माता अहल्याने पाण्याने श्रीरामांचे चरण धुऊन ते वस्त्राने पुसले. श्रीरामाच्या चरणांचा स्पर्श अहल्येला झाला. त्याचेच वर्णन समर्थांनी  श्लोकात केले आहे. श्रीराम आणि लक्ष्मणाने  माता अहल्या आणि गौतम ऋषींचे चरण स्पर्श करून त्यांना नमस्कार केला. श्रीराम, महर्षि विश्वामित्र, सहित अनेक ऋषी मुनींनी त्यांचे आतिथ्य स्वीकार केले. ते दृश्य पाहून स्वर्गातील देवतांनी पुष्पवृष्टी करून श्री रामांच्या कृतीचे समर्थन केले. असे वर्णन वाल्मिकी रामायणात आहे. माता अहल्येवर समाजाने टाकलेला बहिष्कार संपला. तिला पुन्हा समाजात मान ताठ करून जगणे शक्य झाले. गौतम ऋषींच्या आश्रमात पुन्हा ऋषी, मुनी आचार्य आणि  शिक्षणासाठी ब्रम्हचारी  येऊ लागले. पूर्वी प्रमाणे आश्रमात यज्ञादी कार्य पुन्हा सुरू झाले. असो.

अहल्या उध्दार ज्ञात इतिहासातील एकमेव अद्वितीय घटना आहे, जिथे एक राजा, एका पीडित निर्दोष स्त्रीला न्याय देण्यासाठी स्वयं तिच्या घरी गेला. तिचे आतिथ्य स्वीकार केले. समर्थ पुढे म्हणतात, श्रीराम आपल्या भक्तांची कधीच उपेक्षा करत नाही. वंचित, पीडित समाजाला न्याय देण्यासाठी श्रीरामचंद्र सदैव तत्पर असतात. अश्या भक्तवत्सल प्रभू रामाचे वर्णन करताना वेदवाणी ही शिणली, त्यात आश्चर्य काय.